‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
संयमाचा अभाव
तुम्ही एखादा व्यवसाय सुरु करता… पहिले दोन तीन महिने व्यवसाय नीट चालत नाही, अपेक्षित उत्पन्न मिळत नाही… तुम्ही निराश होतात आणि चार पाच महिन्यातच तो व्यवसाय बंद करून दुसरा व्यवसाय सुरु करता…. तोही तीन चार महिने काही मनासारखा चालत नाही, पुन्हा तो बंद करता आणि तिसरा व्यवसाय सुरु करता… असं करत करत दोन तीन वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येत कि आपण शून्य प्रगती केलेली आहे. आपला व्यवसाय आजही चालत नाहीये, तेव्हाही चालत नव्हता. जी परिस्थिती दोन वर्षांपूर्वी होती तशीच परिस्थिती आजही आहे. आणि मग हे अपयश तुम्हाला निराश बनवते. व्यवसायिक आयुष्यात बऱ्याच नवउद्योजकांकडून नकळत होणारी हि चूक आहे.
व्यवसाय सुरु करण्याआधी व्यवसाय म्हणजे काय, तो कसा करायचा, त्याचे प्राथमिक नियम काय हे शिकून घेणे, समजून घेणे आवश्यक असते. कोणताही व्यवसाय पहिले एक वर्ष तुमच्या अपेक्षेप्रमाणे चालत नसतोच… सामान्यपणे पहिले वर्ष तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी जाते, दुसरे वर्ष त्या ग्राहकांना तुमच्यापर्यंत येण्यासाठी जाते आणि तिसरे वर्ष त्या ग्राहकांच्या मार्फत नवीन ग्राहक जोडण्यासाठी जाते. म्हणजेच तिसऱ्या वर्षी तुमचा व्यवसाय जोर धरत असतो.
पण आपल्याकडे संयमाचा इतका अभाव आहे कि व्यवसाय सुरु झाल्यांनतर दुसऱ्याच दिवसापासून आपल्याला हजारो लाखो रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असते आणि नाही मिळाले कि मग निवडलेला व्यवसाय चुकीचा आहे असे गृहीत धरून आपण बंद करून टाकतो. हा व्यवसाय बंद केला कि दुसऱ्या व्यवसायाचा शोध सुरू होतो. मग लोकांच्या सांगण्यावरून व्यवसाय निवडला जातो किंवा दुसरा कुणी कोणत्या व्यवसायात यशस्वी झालाय हे पाहून व्यवसाय निवडला जातो… पण पुन्हा आपली घाई आडवी येते आणि दोन चार महिन्यात हा व्यवसाय सुद्धा चालत नाही म्हणून बंद केला जातो…. मी एक होमिओपॅथी डॉक्टर पहिले होते ज्यांनी एक आठवड्यात त्यांचे शहरात नवीनच सुरु केलेले क्लिनिक पेशंट येत नाही म्हणून बंद गावाकडे निघून गेले होते. आता आपल्याकडे काही महिनेही थांबण्याचा संयम नसेल तर व्यवसाय कसा चालणार?
यशाचे शिखर गाठण्यासाठी आपल्याला एक एक पायरी चढत वर जायचे असते. त्यासाठी यशाची एकेक वीट रचत आपल्या पायऱ्या वाढवायच्या असतात… पण आपण काय करतोय? आपण एका विटेवर उभे राहतोय, काही काळाने ती वीट फेकून देतो आणि दुसऱ्या विटेवर उभे राहतो… असं कितीही काळ करत राहिलात तरी तुम्ही जमिनीवरच राहतात, अपेक्षित उंचीवर जाऊच शकत नाही. म्हणजेच आपण कितीही काळ व्यावसायिक आयुष्यात व्यतीत केला तरी आहे तिथेच राहतो. आपली प्रगती शून्य असते.
सारखे सारखे व्यवसाय बदलणे हे आपल्या व्यवसायिक करिअर साठी अतिशय घातक आहे. अशाने तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकत नाही. व्यवसाय यशस्वी होण्यासाठी एक ठराविक वेळ द्यावाच लागतो. व्यवसाय एखाद्या लहान बाळाप्रमाणे असतो. त्याला चालायला एक दीड वर्ष लागतं, चांगलं बोलण्यासाठी दोन वर्षे लागतात, चांगलं समजण्यासाठी तीन चार वर्षे लागतातच… म्हणून तुम्ही थोडा धीर धरणे आवश्यक असते. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी संयम आवश्यक असतो. ज्यावेळी व्यवसायाचे पुढे जाण्याचे सर्व मार्ग संपलेत असे वाटेल त्यावेळी तुम्ही त्या व्यवसायाच्या जोडीला आणखी एखादा व्यवसाय सुरु करू शकता पण तो लगेच बंद करण्याचा विचार करू नका, आणि तीन चार महिन्यात तर बिलकुलच नाही…
सारखे व्यवसाय बदलण्याचा आणखी एक मोठा तोटा तो म्हणजे प्रत्येक व्यवसायासाठी वाया गेलेला वेळ. तुम्ही पहिला व्यवसाय सुरु केला, पाच महिने चालवला… तो बंद करून दुसरा व्यवसाय सुरु केला तोही पाच सहा महिने चालवला… असं करत करत चार पाच व्यवसाय सुरु केले बंद केले.. प्रत्येकासाठी पाच पाच महिने जरी तुमचे खर्च झालेले असतील तरी तुमचे जवळजवळ दोन वर्षे वाया गेलेली असतात, आणि एवढं होऊनही तुम्ही काहीच मिळविलेले नसते.
यापेक्षाही जास्त महत्वाचे म्हणजे एकच व्यवसाय दोन वर्षे चांगला चालवला तर एवढ्या काळात तो व्यवसाय तुम्हाला चांगला परतावा द्यायला सुरुवात करत असतो. म्हणजे तुमचे दोन वर्षे वाया गेली, कोणताही व्यवसाय स्थिर स्थावर नाही, हाती पुरेसे उत्पन्न नाही, नवीन व्यवसाय सुरु केला कि त्यालाही स्थिर करण्यासाठी दोन वर्षे जाणार… म्हणजेच तुम्ही किमान ४ वर्षे पिछाडीवर गेलेले असतात. व्यवसायात आर्थिक नुकसान झाले तरी चालते पण काळाच्या मागे पडण्यासारखे मोठे नुकसान दुसरे कोणतेही नाही.
तुम्ही दोन चार वर्षात पाच सात व्यवसाय चालू करून बंद केले असतील तर तुमच्या व्यवसायिक अपयशासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात हे लक्षात घ्या, यात तुम्ही निवडलेल्या व्यवसायाचा काहीही दोष नाही.
नवनवीन व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करणे आणि सारखे सारखे व्यवसाय बदलणे यात फरक आहे हेही इथे लक्षात घ्यावे. नवनवीन व्यवसाय सुरु करणे हा व्यवसायाचा एक भाग आहे. जास्तीत जास्त प्रयत्न तुमच्या यशाची शक्यता वाढवतात. पण संयमाच्या अभावामुळे सारखे सारखे व्यवसाय बदलणे तुमच्या अपयशाची शक्यता वाढवतात.
व्यवसाय सुरु केल्यांनतर सुरुवातीच्या काळात आर्थिक नफ्याकडे लक्ष देऊ नका. तुमची ग्राहक संख्या वाढत आहे का, उलाढाल वाढत आहे का याकडे लक्ष द्या. या दोनीही बाबतीत तुम्ही प्रगती करत असाल तर तुमचा व्यवसाय योग्य मार्गाने चाललेला असतो. तसेच वर्षातील तीन चार महिने मंदीचेच असतात हेही लक्षत ठेवा. पहिले सहा महिने तर तुम्ही नुकसानच सहन करायचे असते, त्याला पर्याय नाही. किमान एक वर्षांनंतर तुमच्या व्यवसायाची पुढची वाटचाल कशी असेल याचा अंदाज येत असतो. आणि किमान अडीच वर्षानंतर व्यवसायाचा यशाचा आलेख कशा पद्धतीने पुढे जाणार आहे याचा अंदाज येतो. व्यवसायाला थोडा वेळ द्या, घाई करू नका.
संयमाचा अभाव असल्यामुळे सारखे सारखे व्यवसाय बदलणे हि घोडचूक यासाठीच आहे कि तुम्ही कितीही वर्षे व्यवसायात असलात तरी तुम्ही शून्य प्रगती साधलेली असते. हा लेख वाचणारे कितीतरी असतील ज्यांनी या चुका केलेल्या आहेत. काहींनी चुकांतून बोध घेतलेला असेल तर काहींनी आपले व्यवसायिक आयुष्य संपुष्टात आणलेले असेल, पण ज्यांनी नवीनच व्यवसाय सुरु केलेला आहे, व्यवसायिक आयुष्यात पाऊल ठेवलेले आहे त्यांनी यावर नक्कीच विचार करावा, आणि चुका होण्याआधीच स्वत सावरावे…
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Very nice sir
I am pleased to say it’s an exciting post to read. I learn new information from your article, and you are doing a great job. Keep it up