लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
वॉरेन बफे यांनी साठ सत्तर वर्षांपूर्वी आलेल्या जागतिक महामंदीमधे मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर्स अगदी कवडीमोल भावात विकत घेतले होते. ज्यावेळी सगळे गुंतवणूकदार मार्केटमधून बाहेर पडत होते त्यावेळी बफे यांनी शेअर्स खरेदीचा धडाका चालवला होता
९०-९५ साली जिथे लोकांना ऑनलाईन सेलिंग काय असते हे माहित नव्हतं त्यावेळी जेफ बेझोस यांनी ऑनलाईन सेलिंग व्यवसाय सुरु केला होता
जग्वार – लँड रोव्हर विकत घेताना, यामुळे टाटा कंपनी डबघाईला येईल असा सगळ्या मार्केटचा अंदाज होता, या डील नंतर टाटा मोटर्स चे शेअर्स चांगलेच आपटले होते, तरीही टाटांनी हा व्यवहार पुढे रेटला होता
बिल गेट्स कडून ऑपरेटिंग सिस्टीम विकत घेतल्यानंतर जेव्हा इंटेल ने त्यांना त्यांची फी विचारली तेव्हा गेट्स यांनी एकरकमी शुल्क न मागता रॉयल्टी मागितली. इंटेलच्या प्रत्येक विकल्या जाणाऱ्या कॉम्प्युटर मागे ठराविक रॉयल्टी..
ज्या काळात देशात प्रस्थापित उद्योजक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेले लोक वगळता इतर कुणालाही व्यवसायात उतरण्याची संधी नव्हती त्या काळात धीरूभाईंनी व्यवसायात पाऊल ठेवले होते, आणि सामान्य जनतेला सोबत घेऊन कापड व्यवसायात पदार्पण केले होते
स्टीव्ह जॉब्जने जेव्हा Apple मध्ये पुनर्प्रवेश केला त्याकाळात साधे बटनाचे मोबाईल फोन सुद्धा भारी वाटायचे. जॉब्ज यांनी काळाच्याही पुढे असणारे फोन मार्केटमधे उतरवले.
सडे तीन वर्षांपूर्वी १ MBPS इंटरनेट स्पीड सुद्धा चांगलं वाटायचं आणि दोनशे रुपयांना १ GB बॅलन्स मिळत होता, आणि एवढं घेऊनही टेलिकॉम कंपन्या तोट्यात चालल्या होत्या, अशा काळात मुकेश अंबानींनी ४G लाँच करून अमर्याद इंटरनेट बॅलन्स द्यायला सुरुवात केली होती
वेगवेगळ्या व्यावसायिकांची माहिती प्रिंटेड डिरेक्टरी व्यक्तिरिक्त इतर ठिकाणीही मिळू शकेल असं एखादं माध्यम तयार होऊ शकत असा कुणी विचारही केलेला नव्हता तेव्हा तेव्हा जॅक मा यांनी अलिबाबाची सुरुवात केली होती
आज हे कोणत्या स्थानी विराजमान आहेत, हे सगळ्यांनाच माहित आहे…
काय समान धागा आहे या सगळ्या उदाहरणांमधे ?
या सगळ्या उद्योजकांना भविष्य बघण्याची कला अवगत होती; आणि आजही आहे… यांनी भविष्य पाहिलं होतं… आजचा विचार न करता येत्या दहा, वीस, पन्नास वर्षात जगात काय बदल होणार आहेत याचा वेध घेण्याचे कौशल्य या लोकांना आत्मसात आहे. आणि याच जगभरातील उद्योगविश्वावर राज्य करत आहेत.
फेसबुक चं उदाहरण घ्या… फेसबुक मध्ये नावीन्य नसेल, त्याआधी ऑर्कुट होतं… पण WhatsApp लाँच झाल्यानंतर फेसबुक ने ते तात्काळ विकत घेतले. इंस्टाग्राम लाँच झाल्यानंतर फेसबुक ने ते दोनच वर्षात विकत घेतले.. हे दोन App जर फेसबुक च्या मालकीचे नसते तर आज याच App नि फेसबुक ला मोठी टक्कर दिली असती. फेसबुकचा मार्केट शेअर आत्तापेक्षा कितीतरी जात टक्क्यांनी कमी झालेला दिसला असता. या App चं भविष्य फेसबुक ने पाहिलं होतं, पण त्यांच्या फाऊंडरलाच ते दिसलं नव्हतं…
हे भाविषय आपल्याला बघता यायला हवं. आज काय मिळेल यापेक्षा भविष्यात काय संधी उपलब्ध आहेत याचा विचार करून निर्णय घेता यायला हवेत.
कोणताही निर्णय घेताना त्याचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो याचा अंदाज बांधता यायला हवा. भविष्यातील मार्केट पोटेन्शियल लक्षात घेऊन व्यवसायाची निवड करता यायला हवी. मार्केटमधे संधी कुठे आहे, पोकळी कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी नजर सतत भिरभिरती असायला हवी. जुने मार्ग सुरक्षित वाटू शकतात पण ते तुम्हाला फक्त तिथपर्यंतच घेऊन जाऊ शकतात जिथपर्यंत सगळेच पोचलेले असतात. जिथे खूप कमी लोक पोहोचतात तिथे पोहोचायचं असेल तर आपले मार्ग आपल्यालाच तयार करावे लागतात, यासाठी नवनवीन मार्ग शोधण्याची दृष्टी असायलाच हवी.
आज मीसुद्धा जेव्हा माझ्या क्लायंट ला किंवा संपर्कातील लोकांना एखादी व्यावसाय संकल्पना सांगतो, किंवा काही बीझनेस ऑफर्स देतो तेव्हा मार्केटमधील पोकळी किंवा भविष्यातील संधी पाहून ते पर्याय दिलेले असतात. आजपर्यंत काय चालत आलंय यापेक्षा पुढे काय चालणार आहे याचा विचार करूनच या संधी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्या व्यवसायात यश किती आहे हे भविष्यातच दिसणार असते, आज तशी सुतारामही शक्यता नसते, आणि त्यामधून मिळालेले यश दाखवायला उदाहरणंही नसते किंवा खूप कमी उदाहरणे असतात. त्यामुळे मी ज्यांना ज्यांना अशा संधींबद्दल सांगतो त्यांच्यापैकी फक्त २-३ टक्के लोकांकडूनच सकारात्मक प्रतिसाद मिळतो. मला यात वावगेही काही वाटत नाही. कारण भविष्य पहाण्याची दृष्टी मुळातच खूप कमी लोकांना मिळालेली असते.
येता काळ इंटरनेटचा आहे… लोकांना जोडणारा आहे… सर्व्हिस इंडस्ट्रीचा आहे… लोकांच्या आळसाचा व्यवसाय करणारा आहे… रोबोटिक्स चा आहे… वाहतूक पर्यायांचा आहे… पर्यावरण संरक्षणाचा आहे… नवीन टेक्नॉलॉजीचा आहे… अंतराळाचा आहे… अन्नधान्याचा आहे… अशा कितीतरी संधी भविष्यात निर्माण होणार आहेत. यातल्या कित्येक क्षेत्रांत आज जास्त संधी दिसत नसतील, पण भविष्य यांचंच असणार आहे. या संधीचा अभ्यास करून त्यात आज-आत्ता पाऊल ठेवणाराच पुढे या क्षेत्रावर राज्य करताना दिसणार आहे.
यशस्वी लोकांच्या पंक्तीत बसायचं असेल तर भविष्य पाहण्याची दृष्टी तुमच्याकडे असायला हवी हि मुख्य पात्रता आहे. हि कला तुमच्याकडे नसेल तर ती आत्मसात करा, त्याशिवाय मोठं यश मिळणे शक्य नाही. सामान्य लोकांसारखा विचार करताल तर सामान्यच बनून रहाल…
भविष्य पहा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील