नशीब फक्त, नशीब न मानणाऱ्यांनाच साथ देतं…


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

प्रत्येकालाच असं वाटतं कि आपण जेवढं कमवू शकलो तेवढंच फक्त प्रामाणिकपणे कमावता येतं, आपल्यापेक्षा श्रीमंत असलेला एक तर नशिबाने श्रीमंत झालेला असतो किंवा त्याने काहीतरी बेईमानी करूनच पैसे कमावलेले असतात. पण, एखाद्याच्या यशाला नशीब संबोधने म्हणजे त्याच्या कष्टाचा, बुद्धीचा अपमान करण्यासारखे आहे.
याचवेळेस आपणही कुणापेक्षा तरी श्रीमंतच आहोत हे विसरलं जातं, आणि त्यांच्या दृष्टीने आपलं यश हे नशिबाचीच देण आहे हे लक्षात घेतलं जात नाही…
आता विचार करा, आज तुम्ही जे काही लहान मोठं यश मिळवलंय त्याला कुणी नशिबाने मिळालंय असं म्हटलं तर तुम्हाला चालणार आहे का? समोरचा तुमच्या यशाला नशीब म्हणतो त्यावेळी तो तुमची तेवढं यश मिळवण्याची लायकी नाही असं म्हणत असतो, हे तुम्हाला चालणार आहे का?

एखाद्याच्या यशाला नशीब म्हणताना खरं तर आपण आपली क्षमता सांगितलेली असते, आपण आपलीच लायकी काढलेली असते हे आपण लक्षात घेत नाही. त्याच्या यशाला नशीब म्हणताना माझी तेवढं यश मिळविण्याची क्षमता नाही असंच आपण मान्य केलेलं असतं…

नशीब हि संकल्पना मानसिक आहे, जिथे आपल्याला आपली क्षमता संपताना दिसते तिथे आपण नशिबाची अपेक्षा करायला लागतो. नशिबाच्या भरवश्यावर राहणे म्हणजे आपणच आपल्या दुर्दशेचा महामार्ग निर्माण करण्यासारखे आहे.

जरा आसपास पाहिलं तर जाणवल कि कित्येक यशस्वी लोक कधीकाळी अतिशय गरीब होते. माझ्या अगदी जवळचे काही लोक कधीकाळी अगदी हमालाचं, मजुराचं काम करत होते, आज ते हजारो कोटींचे मालक आहेत. ती नशिबाची देण नक्कीच नाही, ती त्यांच्या कष्टाची, दूरदृष्टीची, नियोजनाची, कार्यक्षमतेची, बुद्धिमत्तेची, लढाऊ वृत्तीची देण आहे…

नशीब हि काल्पनिक, मानसिक संज्ञा आहे. जिथे आपण यशाचे मूल्य ओळखण्यात किंवा अपयशाचे कारण शोधण्यात कमी पडतो तिथे आपण नशिबाचा आधार घेतो. नशीब म्हणजे आयुष्य. ते आपल्या सोबतच वाटचाल करत असतं. चांगलं नशीब, वाईट नशीब या संज्ञा फक्त परिस्थितीदर्शक आहे. खरं तर यशाच्या बाबतीत ज्याला आपण नशीब म्हणतो त्या संधी असतात. या संधी प्रत्येकालाच मिळत असतात. आपणच त्या संधी साधण्यात कमी कुठेतरी पडत असतो. या संधी सोडण्याचा प्रकार तर मला नेहमीच दिसतो. कन्स्लटिंगच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो लोकांच्या संपर्कात आलोय, यातल्या कित्येकांनी आपल्या नकारात्मक विचारांमुळे कितीतरी चांगल्या चांगल्या व्यवसायाच्या संधी सोडल्याचे मी मागच्या तीन चार वर्षात पाहिलेले आहे. कितीतरी जणांना लहान लहान संकटांमुळे व्यवसायातून माघार घेताना पाहिलं आहे… याला नशिबाच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर त्यांचं नशीब वाईट होत कारण त्यांना संधी साधता अली नाही… म्हणजेच त्यांचं नशीब त्यांच्या निर्णयक्षमतेवर अवलंबून असतं, ते नशिबावर अवलंबून नाहीत..

नशीब असेल ना… मी त्याला मानत नाही हा माझा विचार आहे, कुणी त्याच अस्तित्व मान्य करत असेल हा त्याचा विचार आहे… पण हे नशीब असलं, तरी तेसुद्धा त्यालाच साथ देतं जो माघार घ्यायला नकार देतो, जो संधींना कधीही सोडत नाही, जो सतत नवनवीन प्रयोग करत असतो, जो नेहमीच भविष्याचा विचार करत असतो… अशांना नशीब नक्कीच साथ देतं… बाकीचे त्याच यश नशिबामुळे मिळालेलं आहे, आपल्याला ते शक्य नाही असाच विचार करून आपलं आयुष्य कंठत बसतात. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो कि जो नशिबाच्या भरवश्यावर बसत नाही, जो नशिबाचं अस्तित्वच मानत नाही, नशीब त्यालाच साथ देतं… व्यक्तिशः मला तरी यशाला किंवा अपयशाला नशिबाची देण समजणं हे खूपच नाकारात्मक मानसिकतेचं लक्षण वाटतं… यात वास्तवापासून दूर पाळण्याची, स्वतःलाच कमी लेखण्याची मानसिकता मानसिकता दिसते. किमान नवउद्योजकांनी, करिअरची सुरुवातंच करत असलेल्यांनी नशिबाची भाषा कधीच वापरू नये असं मला तरी वाटतं…

इथं प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपले विचार बाळगण्याचा अधिकार आहे, अगदी या “उद्योजक मित्र” पेज वर सुद्धा नकारात्मक प्रतिक्रियांचा सुद्धा आदर केला जातो, पण यशस्वी लोकांच्या यशाला नशिबाची देण म्हणणं हे नक्कीच चुकीचे आहे, त्यांच्या कष्टाचा अपमान आहे…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!