‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनचा आर्थिक विकासदर डिसेंबरअखेरच्या तिमाहीत ६.४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
चीनचा हा गेल्या २८ वर्षांतील नीचांकी विकासदर ठरला आहे. सध्या अमेरिका आणि चीन या आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये सुरू असणारे व्यापारयुद्ध आणि निर्यातीत झालेली घट यांमुळे आर्थिक विकासदर खाली आला आहे.
चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्यूरोने (एनबीएस) जाहीर केलेल्या तपशीलानुसार चीनचा आर्थिक वृद्धी दर २०१८ मधे ६.६ टक्के होता. १९९० नंतर नोंदवण्यात आलेला हा चीनचा सर्वांत कमी विकासदर आहे. आर्थिक वर्ष २०१७ मधे तो ६.८ टक्क्यांपेक्षाही कमी होता. १९९० मध्ये चीनचा आर्थिक वृद्धी दर ३.९ टक्क्यांवर होता. ‘एनबीएस’च्या तपशीलानुसार चीनची अर्थव्यवस्था सुमारे साडेसहा टक्क्यांनी वाढण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यात २०१८ च्या सुरुवातीपासूनच व्यापारी आघाडीवर तणावाचे वातावरण होते. दोन्ही देशांनी एकमेकांच्या आयात वस्तूंवर कराचा बोजा टाकण्यास सुरुवात केली. सोमवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जागतिक आर्थिक संकटानंतर प्रथमच चीनच्या विकासदरात इतक्या मोठ्या प्रमाणात घट नोंदवण्यात आली आहे.
२८ वर्षांनी भारताची आघाडी
आर्थिक विकासदराच्या बाबतीत भारताने अठ्ठावीस वर्षांनंतर चीनला पीछाडीवर टाकले आहे. डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत चीनचा विकासदर ६.६ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे दिसून आले आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या दुसऱ्या तिमाहीअखेर भारताचा आर्थिक विकासदर ७.१ टक्क्यांवर घसरला. पहिल्या तिमाहीअखेर हा दर ८.२ टक्क्यांवर होता. भारताची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ७.३ टक्क्यांनी तर, आगामी दोन आर्थिक वर्षांमध्ये साडेसात टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. हा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर अन्य अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वाधिक असेल.
_
उद्योजक मित्र