‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
FMCG क्षेत्रातील देशातील अग्रगण्य कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरने आपल्या उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये १०० टक्के पुनर्वापरयोग्य (रिसायकल्ड) प्लास्टिकचा वापर करण्याचे धोरण स्वेच्छेने जाहीर केले आहे.
एक जबाबदार उद्योगसमूह म्हणून हा निर्णय स्वेच्छेने घेतल्याचे कंपनीने सांगितले. २०२५ पासून कंपनीच्या एकूण प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये २५ टक्के पॅकेजिंग हे रिसायकल्ड स्रोतांपासून आलेले असेल. कंपनीकडून दरवर्षी तब्बल ६० हजार टन प्लास्टिकचा आपल्या विविध उत्पादनांच्या पॅकेजिंगसाठी केला जातो.
प्लास्टिकच्या शोधाने जनसामान्यांचे जीवनमान सुखकर बनविले असले, तरी प्लास्टिक कचरा रस्त्यावर, नदी-नाल्यात फेकून दिल्याने आज मोठय़ा संकटाचे रूप धारण केले आहे. तथापि या संकट स्थितीतही संधीची वाट खुली होताना दिसत असून, प्लास्टिक कचरा वेगळा काढून त्याच्या पुनर्वापरातून मोठय़ा अर्थकारणाला चालना दिली जाऊ शकते, असे हिंदुस्तान युनिलिव्हरचे अध्यक्ष संजीव मेहता यांनी ‘प्लॅस्टिक बनेगा फँटॅस्टिक’ या प्लास्टिकच्या पुनर्वापराबाबत जनजागृती मोहिमेचे अनावरण करताना सांगितले. या मोहिमेसाठी HUL ने अजय देवगण आणि काजोल या जोडीला सदिच्छा दूत म्हणून नियुक्त केले आहे.
हिंदुस्तान लिव्हरने गेल्या वर्षभरात तब्बल २३ हजार टन प्लास्टिक कचरा गोळा केला आणि त्याच्या पुनर्वापरातून अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू विविध भागीदाराच्या साहाय्याने बनविल्या आहेत. त्यापासून प्रेरणा घेत मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली या तीन महानगरांमध्ये पुढील चार महिने ‘स्टार्ट अ लिटिल गुड’ या नावाने प्लास्टिक कचरा संग्रहणाची मोहीम कंपनीने सुरू केली आहे.
या मोहिमेत स्थानिक समुदाय, विविध स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालयांना अधिकाधिक सामावून घेतले जाईल. जेणेकरून या मर्यादित कालावधीच्या मोहिमेने दिलेल्या संदेशाचे शाश्वत परिणाम दिसून येतील, असा विश्वास हिंदुस्तान युनिलिव्हरच्या चिरंतनता विभागाचे संचालक प्रसाद प्रधान यांनी व्यक्त केला.
_
उद्योजक मित्र