व्यवसायातील घोडचूका (भाग ५) :: आपल्याच व्यवसायाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघणे


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

आपल्याच व्यवसायाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची घोडचूक बहुतेक नवउद्योजकांकडून होत असते.

एक तर आपल्यापैकी बहुतेकांनी इतरांचे यश पाहून व्यवसाय सुरु केलेला असतो. कुणीतरी खूप पैसा कमवतंय म्हणून आपणही तोच सुरु करावा अशी मानसिकता असते. एखाद्या नोकरीप्रमाणे फिक्स उत्पन्न देणारे साधन म्हणून व्यवसायाकडे पहिले जाते. यामुळे ज्याचे यश पाहून आपण व्यवसाय सुरु केलाय त्याला महिन्याला लाख रुपये मिळतात मग आपल्याला पन्नास हजार मिळाले तरी पुरे अशीच बऱ्याच नवउद्योजकांची मानसिकता दिसून येते. पण त्या यशस्वी उद्योजकाने व्यवसाय यशस्वी करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत हे आपण पहातच नाही.

सुरुवात केल्यानंतर पहिले दोन-तीन वर्षे कोणताच व्यवसाय सुरळीतपणे चालत नसतो, किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे उत्पन्न देत नसतो. अशावेळी आपला व्यवसाय चुकला असंच बऱ्याच नवउद्योजकांना वाटतं. इतरांचे व्यवसाय आपल्यापेक्षा जास्त चांगले आहेत, आपण चुकीचा व्यवसाय निवडला अशीच मानसिकता होत असते. आणि आपल्याच व्यवसायाकडे नकारात्मक दृष्टीने बघण्याची सुरुवात होते. एखाद्या सेटल व्यवसायाशी आपण आपल्या व्यवसायाची तुलना सुरु करतो. कधीही, कुठेही असलो, एखाद्या चर्चेत असलो तरी व्यवसायाचा विषय निघताच आपण ‘व्यवसायाचं काही खरं’ नाही अशाच मानसिकतेतून व्यवसायाबद्दल बोलतो, यात नकारात्मक मानसिकतेचा गोतावळा सोबत असेल तर विषयच संपला. आपण आपल्याच व्यवसायाविषयी जमेल तेवढं नकारात्मक बोलायला लागतो.

या सगळ्याचा परिणाम आपला आपल्याच व्यवसायाविषयी नकारात्मक दृष्टिकोन तयार होण्यात होतो. व्यवसायात मन लागत नाही, वागण्यात नेहमीच निराशा दिसायला लागते, ग्राहकांपर्यंतही तुमची नाकारात्मक ऊर्जा पोहोचायला लागते, ग्राहकांचाही प्रतिसाद कमी व्हायला लागतो, व्यवसायाचा आलेख खाली यायला लागतो. आणि हळूहळू आपला व्यवाय पूर्णपणे चुकीचा आहे आणि यात आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही अशी मानसिकता तयार होते.

अशातच इतरांचे व्यवसाय चांगले चालताना दिसत असतात. खरं तर ते चांगले चालत असतात यापेक्षा ते उद्योजक आपल्या व्यवसायाबद्दल नेहमी सकारात्मक असतात हे आपल्या लक्षात येत नसतं. मग आपण आपल्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या व्यवसायासारखे व्यवसाय सुरु करण्याच्या मागे लागतो. पण तोही व्यवसाय स्थिरस्थावर होण्यासाठी दोन तीन वर्षे घेणारच असतो. या नादात पहिल्या व्यवसायाकडे दुर्लक्ष होतं. दुसरा व्यवसाय तरी लगेच भरपूर उत्पन्न देईल अशी अपेक्षा असते, तिथेही अपेक्षाभंग होतो. पुन्हा मागचे चक्रे सुरु होते आणि हाही व्यवसाय चुकला असं वाटायला लागतं.
याचा परिणाम, स्वतःच्या कौशल्यावर आपल्याला शंका यायला लागते. आपल्या व्यवसायाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघता बघता आपण आपल्या कार्यक्षमतेकडेच नकारात्मक दृष्टिकोनातून बघायला सुरुवात करतो.

खूप, जवळ जवळ ७०%, नवउद्योजकांकडून हि चूक होत असते. सुरु होणाऱ्या एकूण व्यवसायांपैकी व्यवसाय यशस्वी होण्याचे प्रमाण फक्त २०% आहे. ८०% व्यवसाय अपयशी ठरतात. हे व्यवसाय अपयशी ठरण्याचे मुख्य कारण असते आपल्याच व्यवसायाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची मानसिकता.

खरं तर कोणताही व्यवसाय स्थिरस्थावर होण्यासाठी किमान तीन वर्षे द्यावे लागतात. पाहिलं वर्ष तर पूर्णपणे तोट्याचे असते. हे सर्व आपल्याला माहीतही असते, पण समजून घ्यायचे नसते. हा नियम मला लागू नाही अशाच मानसिकतेत नवउद्योजक असतात, परिणामतः आपल्याच व्यवसायासाठी मृत्यूचं जाळं तयार करतात, आणि या जाळ्यात स्वतःही अडकतात.

आपल्या व्यवसायाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघणे यासारखे घातक व्यवसायासाठी दुसरे काहीच नाही. हा नकारात्मक दृष्टिकोन तुमच्या व्यवसायाला, आणि तुमच्या व्यावसायिक करिअरलाही पूर्णपणे संपवू शकतो. तुम्ही जर अशा नकारात्मक मानसिकतेमधे अडकले असाल तर तात्काळ त्यातून बाहेर पडा. नकारात्मक विचारांचे लोक जवळ असतील तर, ते कितीही जवळचे असो, त्यांच्यापासून लगेच दूर व्हा. तुमचा व्यवसाय स्थिरस्थावर व्हायला वेळ घेणार आहे, त्याला त्याचा अपेक्षित वेळ द्या. किमान तीन वर्षे खस्ता खाव्याच लागणार आहेत हे डोक्यात घट्ट बसवून घ्या, आणि याच मानसिकतेने व्यवसाय करा. पहिले दोन-तीन वर्षे जर तुम्ही पार केले तर तुमच्या व्यवसायाला काहीच धोका रहात नाही, आणि तो अपेक्षेप्रमाणे उत्पन्नही द्यायला सुरुवात करतो. खूप कमी व्यवसाय चौथ्या पाचव्या वर्षांनंतर बंद पडतात, पण हे प्रमाण अतिशय कमी आहे. दुसऱ्या – तिसऱ्या वर्षांनंतरही जर व्यवसाय योग्य प्रकारे चालत नसेल तर मात्र तुमचे नियोजन कुठेतरी चुकत आहे हे लक्षात घ्यावे. पण तरीही व्यवसाय चुकलेला आहे असं बिलकुल नाही, फक्त व्यवसायात काही बदल घडवून आणणे आवश्यक असते, इतकेच.

नकारात्मकता टाळा, व्यवसायाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघू नका. तुमचा दृष्टिकोन तुमच्या कर्मचाऱ्यांपर्यंत आणि ग्राहकांपर्यंत पाझरत असतो. त्यांची मानसिकता तुमच्या व्यवसायाविषयी नकारात्मक झाली तर तुमच्या व्यवसायाला कुणीच वाचवू शकत नाही.

सकारात्मक मानसिकता तयार करा, सकारात्मक विचार करा, काही प्रॉब्लेम असतील तरी ते सगळीकडे सांगत फिरू नका, फक्त अतिशय जवळच्या अनुभवी व्यक्तीला, मार्गदर्शकाला, सल्लागाराला सांगावेत. इतरांशी व्यवसायाविषयी चर्चा करताना चांगलीच करा, व्यवसायाविषयी नकारात्मक शब्द चुकूनही उच्चारू नका. तुमचा व्यवसाय तुमच्या विचारांवर अवलंबून असतो. तुमचे विचार तुमच्या व्यवसायाचं भवितव्य ठरवणार असतात, म्हणून विचारांवर ताबा ठेवा.

(व्यवसायातील घोडचूका हि लेखमालिका मुख्यत्वे नवउद्योजकांसाठी आहे. व्यावसायिक पार्श्वभूमी नसलेल्या नवउद्योजकांकडून या चुका होण्याचे प्रमाण मोठे आहे, म्हणूनच नवउद्योजकांना त्यांच्याकडून नकळतपणे होऊ शकणाऱ्या चुका आधीच सांगून संभाव्य धोक्यापासून वाचवणे हा या लेखमालिकेचा उद्देश आहे. मागील चार भाग www.udyojakmitra.com या वेबसाईटवर लेखसंग्रह मधे लेखमालिका या विभागात मिळतील.)

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!