दूरदृष्टी काय असते ? TATA – JLR Deal


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

११ वर्षांपूर्वी टाटा मोटर्स ने जग्वार आणि लँड रोव्हर या दोन जगप्रसिद्ध पण तोट्यात असलेल्या कंपन्या खरेदी करण्याची घोषणा केली. रतन टाटांच्या व्यावसायिक आयुष्यातील हा एक महत्वाकांक्षी करार होता. पण रतन टाटा वगळता हा व्यवहार टाटा मोटर्स साठी घाट्याचा व्यवहार आहे अशी संपूर्ण मार्केटची धारणा होती.

याचा परिणाम टाटा मोटर्स च्या शेअर्स मध्ये घसरण सुरु झाली. मार्केट कॅपिटल खाली आले. टाटा मोटर्स ने हा व्यवहार रद्द करावा यासाठी गुंतवणूकदारांकडून दबाव वाढायला लागला. ब्लॉगर्स, लेखक, व्यावसायिक न्यूज चॅनल्स, मार्केटमधील मोठे गुंतवणूकदार अशा सर्वांनी टाटा – JLR व्यवहार कसा चुकीचा आहे हे सांगायला सुरुवात. याचा परिणाम टाटा मोटर्स चे शेअर्स आणखी घसरण्यात झाला, आणि दबाव वाढायला लागला. मी शेअर मार्केट क्षेत्रामधे नुकताच प्रवेश केलेला होता. त्यामुळे मलाही रतन टाटांनी ने चुकीचा निर्णय घेतलाय असेच वाटत होते. ब्रिटनमधे तर या डील विरोधात लाट अली होती, ज्या देशावर दीडशे वर्षे राज्य केलं त्या देशातल्या एका कंपनीने आपल्या सर्वोत्तम दोन कंपन्या घ्याव्यात हे काही ब्रिटन ला खपलं नव्हतं. ब्रिटनने सुद्धा डील थांबवून इतर कुणी खरेदीदार मिळतंय का हे शोधण्याचा प्रयत्न केला होता. पण JLR साठी टाटा मोटर्स ने जी रक्कम दिली होती ती इतर कुणालाही योग्य वाटत नव्हती, त्यामुळे त्या रकमेत JLR खरेदी करण्यासाठी कुणीही तयारी दर्शविली नाही. यामुळे तर आपल्याकडे हा व्यवहार घाट्याचा सौदा आहे हि मानसिकता आणखी वाढायला लागली.

पण या सगळ्या विरोधाच्या वातावरणात आपल्या निर्णयावर ठाम असणारा एकंच माणूस होता, तो म्हणजे “रतन टाटा”.

हा व्यवहार रतन टाटांच्या दूरदर्शीपणाचा एक अप्रतिम नमुना म्हणता येईल.

या डील नंतर काही काळ टाटा मोटर्स आर्थिक अडचणीत अली होती. पण हळूहळू कंपनी स्थिरस्थावर झाली आणि मग टाटा – JLR डील चं महत्व मार्केटला समजायला लागलं. या डील मुळे JLR चं आधुनिक तंत्रज्ञान टाटा मोटर्स ला अतिशय सहजासहजी उपलब्ध झालं. ज्या तंत्रज्ञानासाठी टाटा मोटर्स ला अब्जावधी रुपये मोजावे लागले असते ते तंत्रज्ञान अतिशय कमी खर्चात उपलब्ध झालं. टाटा ला जगभरातील मोठ्या मार्केट्मधे सहज प्रवेश मिळाला. मागच्या तीन चार वर्षात तर टाटा मोटर्स मधे आमूलाग्र बदल झाले आहेत, ते सुद्धा या डील चाच परिणाम म्हणता येईल. टाटाने आत्ताच लाँच केलेली हॅरिअर SUV याच एक चांगलं उदाहरण म्हणता येईल.

एका ठरावीक साच्यात गाड्या बनवण्याच्या सवयीने टाटाला एका मर्यादित प्रतिमेमधे अडकवून ठेवलं होतं. हि प्रतिमा आता बदलायला लागली आहे. JLR चं डिझाईन पासून सर्व तंत्रज्ञान टाटाला आपल्या विकासात कामी येत आहे. गाड्यांच्या डिझाईन पासून इंटेरिअर, इंजिन टेक्नॉलॉजी पर्यंत सर्व गोष्टींत टाटा मोटर्स आता आंतरराष्ट्रीय मार्केटमधील मोठमोठ्या आणि आलिशान कंपन्यांना टक्कर देण्यास सज्ज झाली आहे. टाटा मोटर्स आता बदलत आहे. काही महिन्यांपूर्वी एका एक्सपोमधे लाँच केलेली इलेक्ट्रिक कार तर या बदलाचे चे सर्वोत्तम उदाहरण म्हणता येईल. आर्थिकदृष्ट्या एका ठराविक क्लास पुरती, उच्च-मध्यमवर्गीयांपुरती मर्यादित असणारी टाटा मोटर्स आता आर्थिकदृष्ट्या श्रमांत वर्गालाही खुणावू लागली आहे, हा एक मोठा बदल गेल्या दहा वर्षात झाला आहे.

यापेक्षाही या डील चा आणखी एक मोठा परिणाम झाला. भारतीय कंपन्या जगावर राज्य गाजवू शकतात हे जगभरातील औद्योगिक महासत्तांच्या लक्षात आले, यांचा भारतीय उद्योगक्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागला. सोबतच देशातील इतरही उद्योजकांमधे एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला. यानंतर जगभरातील मोठमोठ्या कंपन्या ताब्यात घेण्याची आपल्याकडे स्पर्धाच सुरु झाली. मोठं होण्यासाठी फक्त कष्ट करून जमत नाही, मी इतरांपेक्षा सरस आहे अशी मानसिकता असणेही महत्वाचे असते. हि मानसिकता देशातील उद्योगक्षेत्रामध्ये निर्माण झाली.

रतन टाटांची दूरदृष्टी आज टाटा मोटर्स ला एका वेगळ्याच मार्गावर घेऊन आली आहे. पुढच्या दहा वीस वर्षांमधे टाटा मोटर्स मधे आमूलाग्र बदल झालेले दिसतील. हि दूरदृष्टी दहा वर्षांपूर्वी इतरांकडे नव्हती म्हणून ते टाटा JLR डील कसून विरोध करीत होते, त्यांना दहा – वीस – तीस वर्षांनंतर टाटा मोटर्स ला या डील चा काय फायदा होऊ शकतो याचा अंदाज आला नाही, पण रतन टाटा आपल्या विचारांवर ठाम होते, त्याचा परिणाम आज बघायला मिळत आहे.

फोर्ड ने अपमान केला म्हणून JLR विकत घेऊन टाटांनी त्याचा बदल घेतला असं बऱ्याच जणांना वाटतं. पण हे प्रकार फक्त चित्रपटातच बघायला मिळतात. किंवा प्रसिद्धी मिळविण्यासाठी लिहिलेल्या ब्लॉग मध्ये वाचायला मिळतात. टाटांसारखे उद्योजक कशाचातरी बदला घेण्यासाठी गुंतवणूकदारांचे हजारो कोटी पणाला लावत नाहीत. हे लोक खूप संयमी असतात, कोणतीही गोष्ट कुठपर्यंत ताणायची, कुठपर्यंत मनावर घ्यायची, कुठे सोडून द्यायची याच भान या लोकांना चांगलं असतं, म्हणून हे सर्वोच्च स्थानवापर्यंत गेलेले असतात. फोर्ड ने टाटांना अपमानास्पद वागणूक दिली होती, आणि त्यांची परतफेड करण्याची संधी टाटांना दहा वर्षांनी मिळाली असं आपण म्हणू शकतो. पण या डील चा उद्देश बदला घेण्याचा नव्हता तर आपल्या कंपनीला जास्तीत जास्त मोठं करण्याचा होता.

यशस्वी होण्यासाठी दूरदृष्टी खूप आवश्यक असते. हि दूरदृष्टी टाटा अंबानी यांच्यासारख्या उद्योजकांकडे आहे म्हणून ते आज सर्वोत्तम आहेत. हे लोक आज उद्याचा विचार करत नाहीत, तर दहा वीस चाळीस पन्नास वर्षांनी काय घडू शकतं याचा विचार करतात. हे लोक भविष्य पाहत असतात. हा भविष्य पाहण्याचा गुण त्यांना सर्वोत्तम बनवत असतो. हि दूरदृष्टी त्यांना जगज्जेता बनवत असते. आणि हीच दूरदृष्टी तुम्हालाही जगज्जेता बनवू शकते…


(ता. क. ६-४-२१ – दोन वषांपूर्वी हा लेख लिहिला होता तेव्हा टाटा मोटर्स चा शेअर १७५ वर होता. मागच्या दोन वर्षात शेअर ६०० वरून १७५ वर आला होता. त्यामुळे माझी मांडणी चुकीची आहे असा आक्षेप बहुतेकांनी घेतला होता. यानंतर दोनच दिवसांनी टाटा मोटर्स ला २५ हजार कोटींचे नुकसान झाल्याची बातमी आली आणि शेअर १७५ वरून १३० वर आला. या दिवशी सुद्धा बऱ्याच जणांनी पोस्ट वर कमेंट करून माझा लेख चुकीचा आहे, टाटांनी चूक केली अशा कमेंट केल्या. यानंतर पुन्हा काही काळासाठी शेअर २५० पर्यंत गेला. पुन्हा १२५ पुन्हा २०० असा फिरत राहिला. मागच्या वर्षी च्या मोठ्या पडझडीमधे शेअर ६५ रुपयांपर्यंत खाली आला. पण आज तोच शेअर वर्षभरामध्ये ६५ पासून ३५० पर्यंत गेलाय… पुढच्या वर्षभरात ५०० पर्यंत नक्कीच जाईल. मागील दोन वर्षात JLR मुळे मिळालेल्या तंत्रज्ञानामुळे टाटामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे, आणि याचाच परिणाम म्हणून कंपनी नव्या दमाने मार्केटमधे उतरायला तयार झाली आहे. दोन वर्षांपूर्वी जी पडझड खूप मोठी वाटत होती ती आता कधीच मागे पडली आहे. मी या लेखात याच दूरदृष्टीबद्दल बोललो होतो. टाटा जर जुन्याच पद्धतीला चिटकून राहिले असते आणि JLR ची रिस्क घेतली नसती तर आज टाटा मोटर्स पूर्णपणे डबघाईला आलेली दिसली असती.)

(२०२४ अपडेट्स… २०१९ मध्ये लेख लिहिला तेव्हा शेअर १७५ रुपयांवर होता, २०२० मध्ये तो ६५ वर आला आणि आता १००० वर आहे)

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

2 thoughts on “दूरदृष्टी काय असते ? TATA – JLR Deal

  1. Even after 10 years we can not say definitely that JLR range Rover takeover was successful one…at least not by looking at the share price.. considering share gave negative returns at the end of those 11 years ! थोडक्यात अजूनही ह्या गोष्टीचा शेवट गोड झालेला नाही..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!