‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
विविध बँकांचे ४६,००० कोटी रुपयांचे कर्ज डोक्यावर असलेल्या ADAG ग्रुप च्या रिलायन्स कम्युनिकेशन्स या दूरसंचार कंपनीने दिवाळखोरी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कंपनीने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाकडे धाव घेतली आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्सवर ४६,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. मालमत्ता विक्रीतून २५,००० कोटी रुपये उभे करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र, हा प्रयत्न फसला. तसेच अनिल अंबानी यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्सचे स्पेक्ट्रम विकत घेण्याची तयारी दर्शवली होती, परंतु तिथेही जुनी देणी थकीत असल्यामुळे व्यवहार बारगळला.
प्रचंड कर्जभार असलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीविरोधात स्वीडिश दूरसंचार सामग्री निर्माता एरिक्सननेही गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. रिलायन्सने सुमारे ५५० कोटी रुपये थकवल्याचा दावा एरिक्सनने केला होता. या याचिकेचाही निकाल RCom विरोधात लागण्याची शक्यता होती.
या सर्व शक्यतांचा पार्श्वभूमीवर शुक्रवारी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नव्याने रक्कम उभारण्याबाबत अपयश आल्याने रिलायन्स कम्युनिकेशन्स दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिवाळखोरी कायद्यामुळे आता बँकांना आपली थकीत कर्जे वसूल करणे सोपे जाणार आहे.
_
उद्योजक मित्र