‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
रिलायन्स कम्युनिकेशनने शुक्रवारी कंपनी दिवाळखरीत काढण्याची प्रक्रिया सुरु केली. दिवाळखोरी कायद्यान्वये आता कंपनीची दिवाळखोरीची कार्यवाही सुरु होईल. तोट्यातील कंपनी कायदेशीररित्या दिवाळखोरीत काढणे हि कंपनी, कामगार, गुंतवणूकदार, कर्जदार अशा सर्वांसाठीच चांगली बाब असते हे बऱ्याच जणांना माहित नाही. त्यामुळे कित्येकांना RCom दिवाळखोरीत निघाली म्हणजे काय झाले हि बातमीच कळलेली दिसत नाही.
RCom ला उतरती कळा आठ दहा वर्षांपूर्वीच लागली होती, मागच्या पाच वर्षांपासून ती वेगवेगळ्या लफड्यांत अडकत अडकत दिवाळखोरीकडे हळूहळू वाटचाल करत होती. लाखो गुंतवणूकदारांना, कामगारांना अधांतरी ठेवण्यापेक्षा, काल तिचा काय घ्यायचा तो निर्णय कंपनीने घेतला.
असो, एके काळी देशातील टेलिकॉम क्षेत्राचे नेतृत्व करू पाहणारी कंपनी आज दिवाळखोरीत निघाली हा खरं तर उद्योजकांसाठी चर्चेचा विषय असायला हवा, पण आपल्याला अशा मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा करण्यापेक्षा राजकीय टीकाटिपणी करण्यातच धान्यावर मानतो आहोत हे विशेष. उद्योजक मित्र वर रिलायन्स कम्युनिकेशन च्या दिवाळखोरीची बातमी पोस्ट केली, तर त्यावर कुणीही “कायद्याने दिवाळखोरी” काय असते, RCom च्या या अवस्थेचे कारण काय, कंपनी कुठे चुकली, उद्योजकांनी यातून काय धडा घ्यावा, अशा कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याची तसदी घेतली नाही, पण राजकीय पोस्ट करण्यात मात्र सगळे पुढे आहेत. खरं तर सर्व्हिस खराब झाली तर तुमचं कसं दिवाळं वाजू शकतं याच रिलायन्स कम्युनिकेशन हे एक उदाहरण म्हणता येईल, आणि यावर चर्चा व्हायला हवी.
GSM कंपन्या मिनिटाला तीन चार रुपये कॉल दर आकारत असताना टाटा डोकोमो ने CDMA मधे एक एक पैसा सेकंद असा कॅल दर सुरु करून टेलिकॉम स्पर्धेची सुरुवात केली होती, परंतु CDMA टेक्नॉलॉजी स्पर्धक नसल्यामुळे GSM कंपन्यांनी डोकोमो ला गांभीर्याने घेतले नाही. यानंतर मात्र रिलायन्स ने सेकंदाला एक पैसा असा दर GSM मध्ये सुरु केला आणि सगळ्या स्पर्धक कंपन्यांना जमिनीवर आणलं.
रिलायन्स कम्युनिकेशन च्या लॉन्चिंग नंतर देशात खऱ्या अर्थाने टेलिकॉम क्षेत्रात स्पर्धा सुरु झाली. यानंतर काही वर्षे रिलायन्स चा मार्केटमधे वरचष्मा होता. निम्म्यापेक्षा जास्त लोकांकडे रिलायन्स चे मोबाईल दिसत.
कंपनीला टेलिकॉम क्षेत्रावर वर्चस्व गाजवण्याची संधी होती, पण अचानक कंपनीच्या सर्व्हिस मधे प्रॉब्लेम यायला लागले. कस्टमर ला चांगली सर्व्हिस मिळणे बंद झाले. पोस्टपेड कस्टमर ला भरमसाठ बिले यायला लागली, त्याचे निराकरण करणारी कोणतीही यंत्रणा कंपनीकडे नव्हती. कॉल सेंटर कडून खराब वागणूक मिळायला लागली, काहीवेळेस तर कॅल सेंटर वाले कॉलंच उचलत नसत. नेटवर्क मिळणे कमी झाले. शहराशहरात असणारे RCom चे स्टोअर मधून कुठलीही सेवा मिळेनाशी झाली. त्यावेळी नंबर पोर्टिबिलिटी सेवा नव्हती. कंपनीकडून कुठलीच सेवा मिळत नसल्याने हजारो लोकांना दिलेले आपले नंबर लोकांना बंद करावे लागले. कित्येकांचे व्यावसायिक नुकसान झाले.
यानंतर मात्र कंपनीचा मार्केट शेअर झपाट्याने खाली आला. नवीन ग्राहक येणे बंद झाले, जे होते तेही सोडचिट्ठी द्यायला लागले. रिलायन्स चा मोबाईल किंवा सिम घ्यायचं म्हटलं तरी लोकांच्या अंगावर काटा यायचा. कुणी फुकट सिम वाटत असला तरी लोक नको म्हणत. रिलायन्स चा ब्रँड या काळात अतिशय खराब झाला होता. या खराब ब्रॅण्डिंग चा परिणाम रिलायन्स नाव असणाऱ्या इतर व्यवसायावरही झाला. हा सगळा गोंधळ थांबवून सेवा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी कंपनीने कोणतीही पावले उचलली नाहीत. जणू काय हा व्यवसाय कंपनीने पूर्णपणे सोडून दिलेला होता, फक्त कागदोपत्री कंपनी चालू दिसली पाहिजे म्हणून थोडफार नेटवर्क दिलं जात होतं.
आठ दहा वर्षातच कंपनीचं मार्केटमधून नामोनिशाण मिटलं. स्टॉक मार्केटमधील अस्तित्व सोडलं तर कंपनी कुठेच दिसेनाशी झाली. लोकांना रिलायन्स कम्युनिकेशन च्या सर्व्हिस चा इतका फोबिया झाला होता कि रिलायन्स जिओ च्या लॉन्चिंग वेळी सुद्धा कित्येक जण साशंक होते. दोनीही कंपन्या वेगवेगळ्या ग्रुप च्या आहेत हे कित्येकांना लवकर उमजलं नव्हतं.
खराब सर्व्हिस ने देशातील एक मोठी कंपनीच संपवली. सर्व्हिस च महत्व सांगणारे यापेक्षा जास्त चांगले उदाहरण कदाचितच सापडू शकेल. RCom ची दिवाळखोरी हे अनिल अंबानींच एक मोठं अपयश आहे. एका मोठ्या उदयोग घराण्यातून आलेल्या व्यक्तीने स्वतःची आणि स्वतःच्या कंपनीचीही इतकी खराब प्रतिमा निर्माण होत असताना काहीच पावले उचलू नयेत हे आश्चर्यजनक आहे. मी मुकेश अंबानींचा जेवढा चाहता आहे त्याच्या १% हि अनिल अंबानींचा नाही, याचे कारणही RCom ची पाहिलेली ट्रॅजेडी हेच आहे. मागच्या दोन तीन वर्षात मला कधीही अनिल अंबानींचा उल्लेखही करावासा वाटलं नाही तो RCom मुळेच.
कंपनी तोट्यात जाऊ शकते, दिवाळखोरीत निघू शकते… यात वावगं काहीच नाही. पण आपल्याच चुकीने कंपनीचं दिवाळं वाजवणं मात्र धक्कादायक आहे. कदाचित एका पायरीवर अनिल अंबानींना कंपनी वाचवण्याबद्दल काही वाटलंही असेल पण वेळ त्यांच्या हातून गेली होती.
खराब सर्व्हिस या कंपनीला डुबवूनच शांत झाली. RCom उदाहरण समोर ठेवता, उद्योजकांनी आपल्या सेवेबद्दल किती जागरूक असायला हवे हे वेगळे सांगायला नको. ग्राहक हाच सर्वोच्च असतो, त्याच्या समाधानासाठी कोणत्याही थराला जाणारी कंपनीच मोठी होत असते. मी स्वतः स्कोडा ऑटो आणि भारती एक्सा जनरल इन्शुरन्स यांच्या सर्व्हिस मुळे परेशान झालेलो आहे. या दोन कंपन्यांचं नव घेतल तरी कंपन्यांच्या उद्धारार्थ दोन चार अपशब्दांचा मारा आपोआपच होतो. सर्व्हिसला महत्व न देणारी कंपनी जास्त काळ टिकू शकत नाही हेच RCom च्या या दिवाळखोरीवरून लक्षात येते. नवउद्योजकांनी यापासून काही धडा घेतल्यास उत्तम.
सर्व्हिस आणि गुणवत्तेशिवाय शिवाय व्यवसाय नाही. व्यवसाय करायचा असेल तर या दोन गोष्टींवर कधीही तडजोड केली जाणार नाही याची काळजी प्रत्येक उद्योजकाने घेतलीच पाहिजे.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील