भागीदारी व्यवसाय…. फायदे, अपयशाची कारणे, उपाय, कायदेशीर बाबी… सर्व माहिती


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

भागीदारी व्यवसाय म्हणजे जळता निखाराच असतो. ठराविक अंतर राखून बसलात तर उब मिळते आणि खूपच जवळ जाण्याचा किंवा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर हात पोळून निघतो.

भागीदारी व्यवसाय अपयशी ठरण्याचे प्रमाण खूप मोठे आहे, मुख्यत्वे महाराष्ट्रात याचे प्रमाण खूप जास्त आहे. आजही दररोज कितीतरी भागीदारी व्यवसाय सुरु होत आहेत, आणि कितीतरी बंद पडत आहेत. व्यवसाय सुरु झाल्यानंतर तीन ते चार वर्षात भागीदारी संपुष्टात येऊन व्यवसाय बंद पाडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. भागीदारी मुख्यतः नातेवाईकांत किंवा जवळच्या मित्रातच केली जाते, तरीही तिचा अंत होतो. इतक्या जवळचे असूनही भागीदारी व्यवसाय का बंद होत असावा? कालपर्यंत एकमेकांचे मित्र असणारे भागीदार आज अचानक समोरासमोर उभे ठाकतात…

सगळं चांगलं चाललेलं असूनही भागीदारी व्यवसाय का बंद पडत असावेत याचा शोध घेण्याचा कुणी प्रयत्न करताना दिसत नाही. देशभरात यशस्वी ठरलेली पद्धत आपल्याकडे अपयशी का ठरत आहे याचा उहापोह करण्याची तसदी कुणी घेताना दिसत नाही. हा उहापोह आवश्यक आहे…

भागीदारी व्यवसाय बंद पडण्याची करणे काय आहेत? यावर उपाय काय? भागीदारी व्यवसायाचे फायदे काय आहेत? भागीदारी व्यवसाय उभा करताना काय काळजी घ्यावी ? या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर पाहुयात…

भागीदारी व्यवसाय संपुष्टात येण्याचे मुख्य कारण आहे भागीदारांमध्ये असलेला समन्वय संपुष्टात येणे.

काय आहेत याची कारणे ?

१. भागीदारी व्यवसाय बंद पाडण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे “मी” पणाचा झालेला शिरकाव. व्यवसाय माझ्यामुळेच चालतोय असं ज्यावेळेस तुम्हाला वाटायला लागतं त्यावेळेस तुमची भागीदारी संपुष्टात यायला सुरुवात झालेली असते.
२. बऱ्याच वेळा भागीदारी सुरु करताना व्यवसायातील कोणते क्षेत्र कुणी सांभाळायचे यावर निर्णय झालेला असतो, पण कालांतराने एखाद्याला आपले काम अवघड आहे आणि दुसऱ्याचे सोपे असे वाटायला लागते, याचा सुरुवातीला त्याला राग येतो, रागाचे रूपांतर तिरस्कारात होते, तिरस्काराची रूपांतर वादात होते, साहजिकच भागीदारी संपुष्टात यायला सुरुवात झालेली असते.
३. कोणताही व्यवसाय पहिली दोन वर्षे बाल्यावस्थेतच असतो, यामुळे भागीदार सर्वस्व झोकून काम करत असतात. हळू हळू व्यवसाय नफ्यात यायला लागतो. मग कुणालातरी हा नफा फक्त आपल्यामुळे मिळतोय असे वाटायला लागते, त्यात जर एखादा भागीदार प्रत्यक्ष व्यवसाय सांभाळत असेल तर त्याला या नफ्याचा मुख्य हक्कदार मी आहे असे वाटायला लागते, मग दुसऱ्याशी असहकार सुरु होतो, सारासार विचार न करता आर्थिक व्यवहार करण्याचे प्रमाण वाढते, भागीदाराशी चर्चा न करता आर्थिक निर्णय घेण्याचे प्रकार सुरु होतात, व्यवसायातून जास्तीत जास्तीत उत्पन्न स्वतःला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होतात, त्यासाठी कुठेतरी फेरफार केली जाते, हळूहळू भागीदारी संपुष्टात यायला सुरुवात झालेली असते.


४. काहीवेळेस एखादा भागीदार दुसऱ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, अशावेळेस त्याचा गैरफायदा घेऊन आर्थिक अपहार केले जातात, पण असे प्रकार उघडकीस यायला वेळ लागत नाही.
५. इतरांकडे, व्यवसाय माझ्यामुळेच चालू आहे दुसरा फक्त बसून पैसे घेतोय अशा तक्रारी करायला सुरुवात झाली कि भागीदारी व्यसाय संपुष्टात यायला सुरुवात झालेली असते.
६. काही वेळेस काही “शुभचिंतक” (?) तुम्हाला तुमच्या भागीदाराविरुद्ध भडकवण्याचे काम करत असतात. हि पद्धत लक्षत येणार नाही अशी असते. यातील एक ठळक उदाहरण म्हणजे जेव्हा जेव्हा ते तुमच्यासोबत असतील तेव्हा तेव्हा ते तुम्हाला हा व्यवसाय फक्त तुमच्यामुळे चालू आहे दुसरा फक्त तुमच्या जीवावर मजा मारतोय असे नकळतपणे सांगून तुमच्या मनात भागीदाराविषयी द्वेष निर्माण करण्याचे सत्कार्य करत असतात. त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला कि भागीदारी संपुष्टात यायला सुरुवात होते.

यासाठी वापरली जाणारी काही छान वाक्ये –
भाऊ फक्त तुझ्यामुळे कंपनी चालू आहे, तुझ्या पार्टनरची एकट्याने कंपनी सांभाळायची ताकद नव्हती
तू नसता तर कंपनी चालूच शकली नसती, तुझ्या पार्टनरला काय येतंय
तू आहेस म्हणून तुझा पार्टनर पैसे कमावतोय नाहीतर उपाशी मेला असता
जर अख्खी कंपनी तू सांभाळतोय, मग नफ्यात वाटेकरी कशाला पाहिजे ?
तो तिकडे मजा मारतोय आणि तू इकडे कष्ट करतोय, तू बोलायला पाहिजे त्याला काहीतरी.
कशाला त्याच्या नदी लागतो, माझ्याकडे जास्त चांगल्या ऑफर्स आहेत… याच्यापेक्षा जास्त कमावशील.
हि सर्व वाक्ये नकळत तुमच्या मनात भागीदाराविषयी तिरस्कार निर्माण करत असतात, हि प्रक्रिया हळूहळू होते, पण परिणामकारक असते.

७. सर्व भागीदारांना मिळणारे उत्पन्न एकट्यालाच मिळावे अशी लालसा जेव्हा निर्माण होते आणि त्यादृष्टीने पावले टाकायला सुरुवात होते त्यावेळेस भागीदारी संपुष्टात यायला सुरुवात होते.
८. एक भागीदार प्रामाणिकपणे कष्ट करून व्यवसाय वाढवतोय आणि दुसरा व्यवसायाकडे दुर्लक्ष करत असेल तर साहजिकच प्रामाणिक काम करणाऱ्यावर अन्याय होतो, अशा वेळेस तो वेगळा होण्याचा विचार करतोच.
९. स्वतःला मोठेपणा मिळावा या हव्यासापायी छोट्या छोट्या कारणावरून एकमेकांना सुनवयाला सुरुवात झाली कि भागीदारी लवकरच संपुष्टात येणार हे समजून घ्यावे
१०. अनोळखी लोकांच्या मधील भागीदारी मोडण्याचे प्रमाण कमी आहे कारण त्यांना फक्त पैसे मिळण्याशी मतलब असते, त्यामुळे ते व्यवसायात ढवळाढवळ करत नाहीत, आणि शक्यतो त्यांच्यात एखादा समन्वयक असतो, पण ओळखींमध्ये समन्वयक नसतो, अशावेळेस एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रमाण वाढते, एकमेकांच्या क्षेत्रात ढवळाढवळ करण्याचे प्रकार सुरु होतात, अविश्वास दाखवण्याचे प्रमाण वाढते, आणि अंताची सुरुवात होते.
११. भागीदार एकमेकांशी स्पर्धा करू लागले कि भागीदारी व्यवसाय लवकरच संपुष्टात यायला सुरुवात होते. कारण या स्पर्धेमध्ये सर्वात आधी बळी पडतो तो म्हणजे व्यवसाय.
१२. भागीदाराविषयी अविश्वास निर्माण होणे हे भागीदारी संपुष्टात येण्याचे एक मोठे कारण आहे.
१३. व्यवसायात भागीदारांच्या कुटुंबीयांनी ढवळाढवळ करणे हेसुद्धा भागीदारी मोडण्याचे महत्वाचे कारण आहे.

भागीदारी टिकून राहण्यासाठी काय करायला हवे ?

१. “मी” पणा सोडावा. मोठेपणाचा हव्यास, अहंभाव तुम्हाला इतरांपासून लांब नेतो.
२. जबाबदारीच वाटप निश्चित करा, इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका.
३. तुमच्या भागीदारीवर, व्यवसायावर जळणारे भरपूर असतात. ते तुम्हाला भागीदाराविरोधात भडकवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात, अशा लोकांपासून सावध राहा. वर काही वाक्ये सांगितली आहेत, ती वाक्ये कानावर अली कि सावध व्हा.
४. इतरांनी भागीदारासंबंधी दिलेली नकारात्मक माहिती लगेच खरी मनू नका, शहानिशा करा, थेट भागीदाराशी चर्चा करण्याला प्राधान्य द्या.
५. शंका असलेल्या प्रश्नांवर भागीदाराशी वेळोवेळी चर्चा करा, त्यांच्याबाबतीत अंदाजे आडाखे बंधू नका.
६. पैशाचा हव्यास बाळगू नका. जे मिळतंय त्यात सर्वांचं कष्ट आहे हे लक्षात ठेवा.
७. व्यवसायासंबंधी सर्व भागीदारांनी नेहमी सविस्तर चर्चा करावी. या चर्चेत होणारे वाद वैयक्तिक समजू नका. ते बैठकीपुरतेच मर्यादित ठेवा.
८. फक्त माझ्यामुळे व्यवसाय चालू आहे असा विचार चुकूनही मनात आणू नका


९. यशाचे श्रेय भागीदाराला द्या. आणि तुम्हाला मिळालेल्या श्रेयाने हुरळून जाऊ नका.
१०. थोडीसुद्धा आर्थिक अफरातफर करू नका, १ पैशाचा गैरव्यवहार सुद्धा तुमच्याबद्दल कायमचा अविश्वास निर्माण करतो.
११. आर्थिक बाबतीत पारदर्शक राहा. आर्थिक निर्णय शक्यतो सर्वांच्या सहमतीने घ्या.
१२. कुटुंबियांना व्यवसायापासून लांब ठेवा. कुटुंबियांच्या सल्ल्यानुसार वागण्यापेक्षा स्वतःला योग्य वाटेल असे निर्णय घ्या.
१३. भागीदार चुकत असेल तर समजावून सांगा, त्यांना दटावण्याचा प्रयत्न करू नका.
१४. नकळत चूक झाली असेल तर मान्य करा, चुकीचे समर्थन करू नका


१५. भागीदारांबद्दल त्रयस्थांशी वाईट बोलू नका. उलट तो आहे म्हणून व्यवसाय चालू आहे असेच सर्वांना सांगा. भागीदाराला श्रेय दिल्याने तुम्ही लहान होत नाहीत.
१६. व्यवसायात नफा तोटा होतंच असतो, त्यासाठी सर्वच सारखे जबाबदार असतात. कुणा एकावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करू नका.
१७. भागीदारीत शक्यतो नातेवाईक, मित्र असतात. पण या नातेसंबंधांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नका व इतरांना याबद्दल आधीच स्पष्टपणे सांगा.
१८. बरेच भागीदार गुप्तपणे स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु करून भागीदारी व्यवसायाकडे येणारे ग्राहक स्वतःकडे वळवण्याचा अप्रामाणिक प्रयत्न करतात. हा प्रकार सुरुवातीला यश मिळवून देणारा असला तरी उघड झाल्यावर संपूर्ण व्यवसायाचं ठप्प होत असतो.
१९. इतर भागीदारांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक जण व्यवसायाचा सारखाच मालक असतो, त्यामुळे व्यवसायावर किंवा भागीदारावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो.
२०. लहान लहान चुका गांभीर्याने घ्या पण त्याचा बाऊ करू नका. समस्या शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. वादविवाद टाळा आणि व्यवसायिक वातावरण नेहमी खेळकर राहील याची काळजी घ्या.

भागीदारी व्यवसायाचे फायदे

१. व्यवसाय सांभाळण्यासाठी एका पेक्षा जास्त व्यक्ती असल्यामुळे कामाचे नियोजन योग्य पद्धतीने करता येते.
२. कामांची विभागणी करता येते. प्रत्येकाला आपापली जबाबदारी पार पडायची असल्यामुळे इतर कामांकडे लक्ष द्यायची गरज पडत नाही.
३. एकाच व्यक्तीकडे सगळे कौशल्य कधीच नसते. प्रत्येकाकडे वेगवेगळे कौशल्य असते. पण सर्वांचे मिळून एक चांगले आणि सर्व गुण संपन्न युनिट उभे राहू शकते.
४. सर्व भागीदारांचे वैयक्तिक संपर्क व्यवसायाला लवकर वाढण्यासाठी मदत करतात.
५. महत्वाची कामे कर्मचाऱ्यांकडे सोपवण्याची गरज पडत नाही.
६. सर्वांच्या सहकार्याने कमी वेळात मोठ्या गुंतवणुकीचा प्रोजेक्ट उभा करता येऊ शकतो.
७. समस्यांवर मार्ग शोधण्यासाठी एकमेकांचे सहकार्य मिळते.
८. स्वतःसाठी वेळ देता येतो.
९. पर्याय उपलब्ध असतात.
१०. एकीचे बळ नेहमीच फायद्याचे असते.

भागीदारी करताना टाळावयाच्या व लक्षात घ्यावयाच्या बाबी

१. नातेवाईक वा जवळचे मित्र यांच्याशी भागीदारी करणे टाळा.
२. भागीदारीचा योग्य कायदेशीर करार करा. कराराचा मसुदा तज्ज्ञ वकिलाकडून बनवून घ्या.
३. एका शब्दावरून वा अगदी स्वल्पविरामावरून सुद्धा मोठमोठे कायदेशीर पेच उभे रहात असतात. त्यामुळे कराराचा मसुदा काळजीपूर्वक बनवावा.
४. भागीदारी करार करतानाच सर्वांच्या जबाबदारीचे वाटप करून घ्यावे, गुंतवणूक नफा तोटा याची योग्य नोंद करून घ्यावी.
५. शक्यतो LLP करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. LLP म्हणजे Limited Liability Partnership. हा भागीदारीचाच परंतु जास्त सुरक्षित प्रकार आहे. याबद्दल CA, CS किंवा वकिलांकडून जास्त चांगली माहिती मिळू शकेल.
६. भागीदारी संपुष्टात आणण्याचे नियम सुद्धा योग्य प्रकारे ठरवून घ्यावेत.
७. फक्त पैशासाठी अडाणी, अनुभव नसलेले, पैशाला हपापलेले भागीदार निवडू नका.

भागीदारी व्यवसाय करताना जपून पावले उचलावी लागतात. कोणताही प्रश्न संयमाने हाताळणे आवश्यक असतो. तुम्हाला पैसे मिळवण्याचे आणि व्यवसाय मोठा होण्याचे मुख्य उद्दिष्ट सार्थ होण्याशी मतलब असावे, यामध्ये काही बाबींमधे तडजोड स्वीकारण्याची तयारी असणे आवश्यक आहे. भागीदारी व्यवसाय, व्यवसायाच्या दृष्टीने चांगला आहे. एकट्यापेक्षा जास्त व्यवसायिकांनी एकत्र येऊन केलेली गुंतवणूक हि तुम्हाला अल्पावधीत मोठा व्यवसाय उभारायला मदत करत असते, तसेच जास्त कुशल मनुष्यबळ हाती असल्यामुळे आणि ते स्वतः मालक असल्यामुळे कामात दुर्लक्ष होत नाही अर्थातच यामुळे भागीदारी व्यवसाय लवकर मोठा होतो. पण भागीदारी व्यवसाय मोठा होत असताना त्यात वर सांगितल्याप्रमाणे चुका झाल्या तर व्यवसाय बंद पडायला काहीच वेळ लागत नाही. तसेच व्यसाय बंद पडण्याची सुरुवात २-३ वर्षांनी होत असते. त्यामुळे व्यवसाय बंद पडला तर तुम्ही आर्थिक व इतर बाबतीत पुन्हा ३-४ वर्षे मागे जाता. जे सर्वांसाठीच घातक असते. त्यामुळे व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने कायम प्रयत्न करत राहायला हवेत. गरज भासल्यास शक्यतो समन्वयकाची, मध्यस्थाची किंवा सल्लागाराची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. त्रयस्थ व्यक्ती तुमच्या समस्यांचे तटस्थपणे अभ्यास करून योग्य निर्णय देऊ शकतो, तसेच तुम्हा सर्वांना एका धाग्यात बांधण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे यांची मदत घ्यायला कचरू नका.

भागीदारी व्यवसाय चांगला असला, कमी वेळात मोठा व्यवसाय उभारणीसाठी फायदेशीर असला तरी तो योग्य पद्धतीने चालवला तरच दीर्घायुषी असतो. व्यवसाय मोठा करण्यासाठी सतत प्रयत्न करा, उत्पन्न मिळण्याशी मतलब ठेवा, व्यवसायाच्या सुदृढतेसाठी सांगितलेल्या प्राथमिक नियमांचे पालन करा, भागीदारी व्यवसाय तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा…. “भागीदारी व्यवसाय म्हणजे जळता निखारा असतो. ठराविक अंतर राखून बसलात तर उब मिळते आणि खूपच जवळ जाण्याचा किंवा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर हात पोळून निघतो”

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

4 thoughts on “भागीदारी व्यवसाय…. फायदे, अपयशाची कारणे, उपाय, कायदेशीर बाबी… सर्व माहिती

  1. Sir आम्ही दोघे सख्खे भाऊ आहे आम्ही पार्टनर मधे business करु शकतो का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!