हजार रुपयाच्या वस्तुपेक्षा दहा रुपयाची वस्तु विकायला सोपं असतं…


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

हजार रुपयाची वस्तूविकण्यापेक्षा दहा रुपयांची वस्तू विकणे नेहमीच सोपे असते. म्हणुनच FMCG सेक्टरमधील कंपन्या लवकर मोठ्या होतात… लहानश्या किराणा शॉप वाला बघता बघता श्रीमंत होतो. भेळ पाणीपुरीची गाडी चालवणारे, वडा पाव, चहा, समोसे विकणारे, अगदी पानटपरी चालवणारे महीन्याला लाखो रुपये सुद्धा कमावतात.

वस्तू जेवढी स्वस्त तेवढी विकायला सोपी. म्हणूनच पारले सारख्या कंपन्यांनी आपल्या बिस्किटच्या पाकिटाची किंमत न वाढवता त्यातील बिस्किटांची संख्या कमी केली, पण रेट पाच रुपयेच ठेवला. वेफर्स ची पाकिटे सर्वात जास्त पाच आणि दहा रुपयांचीच खपतात. ग्राहक कोणत्या रकमेला गांभीर्याने घेतो हे महत्वाचे असते. पाच दहा वीस रुपयांपर्यंतचा खर्च ग्राहकाला काहीच विशेष वाटत नसतो, पण तीस रुपये जास्त वाटतात. त्या दहा वीस मधे काय आणि किती मिळत याचा विचार केला जात नाही, ते दहा वीस रुपयात मिळतं हेच जास्त महत्वाचं असतं. एखाद्या कंपनीचा टर्नओव्हर वर्षभरात दोन पाच टक्क्यांनी वाढला तरी खूप मोठी गोष्ट समजली जाते, इथे तर दर सहा महिन्याला २०-३०% वाढ केली जाते. यामुळेच या कमी किमतीच्या उत्पादनांचे व्यवसाय लवकर मोठे होताना दिसतात.

लोकांना रुपयाच्या भाषेतला हिशोब कळतो, टक्क्यांच्या भाषेत नाही. दहा रुपयांचा चहा २ रुपयांनी वाढून १२ ला झाला तरी आपल्याला विशेष काही वाटत नाही, पण हजार रुपयाच्या वस्तुत २०० रुपये वाढ झाली तर ती खुप मोठी वाढ वाटते… प्रत्यक्षात दोन्हीतही २०% च वाढ आहे. तरीही एकाची भाववाढ सामान्य वाटते तर एकाची अतिरिक्त. कमी किंमतीच्या प्रोडक्ट मधे लवकर मोठं होण्याची संधी यामुळेच जास्त असते. ग्राहकाला त्यात झालेली मोठी वाढ सुद्धा लहानच वाटत असते, किंवा ती वाढ होऊनही जी रक्कम असते ती सुद्धा त्याच्या दृष्टीने नगण्यच असते, कारण ती रुपयाच्या भाषेत अगदीच सामान्य असते.

लहान लहान उत्पादने, सेवा शोधा. सामान्यांच्या आवाक्यातील वस्तूंचा विचार करा. त्यांना किती खर्च करायला योग्य वाटतं, आणि त्यात आपण काय देऊ शकतो याचा विचार करा. हि इंडस्ट्री स्वस्त वाटली तरी खूप मोठी आहे. सव्वाशे कोटी लोकसंख्या आहे देशाची, एवढं मोठं मार्केट हातचं जाऊ देऊ नका.

हा विषय ग्राहकांना डिस्काउंट देण्याचा नाहीये हे लक्षात घ्या. किंवा स्वस्त देण्यासाठी कमी गुणवत्तेचे प्रोडक्ट ग्राहकांच्या माथी मारा असाही याचा अर्थ होत नाही. लोकांना १०-२० रुपये खर्च करताना विशेष काही वाटत नाही, ती रक्कम त्यांच्या दृष्टीने इतकी नगण्य असते कि सहज खर्च केली जाते. म्हणून कमी किमतीच्या वस्तूंमधे धंदा खूप मोठा होतो असा या लेखाचा सारांश आहे. आणि त्यात टक्क्यांच्या प्रमाणात झालेली मोठी भाववाढही आकड्यांमधे इतकी नगण्य असते कि ग्राहकांना त्यातहीविशेष काही वाटत नाही. त्यामुळे धंद्यावर काहीच परिणाम न होताही उलाढाल वाढत असते.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!