सरकारच्या योजना, स्कीम पाहून व्यवसाय निवडायचा नसतो


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

कोणत्या व्यवसायासाठी सरकारच्या काय योजना आहेत हे पाहून व्यवसाय निवडत नसतात…. तुमच्यासाठी योग्य काय आहे हे पाहून व्यवसाय निवडायचा असतो, त्यानंतर त्यासाठी काही योजना उपलब्ध असतील तर उत्तम आणि नसतील तर काहीही फरक पडत नाही. फक्त सबसिडी मिळवण्यासाठी व्यवसाय सुरु करत नसतात.

जे आहे त्यासोबत… जे नाही त्याशिवाय… हेच तुमच्या व्यवसायाचे सूत्र असायला हवे.

एक साधी संकल्पना… काहीतरी विकायचंय… स्किल, उत्पादन, सेवा, ज्ञान, माहिती, कला… जे शक्य आहे ते विकायचं… इतकी साधी व्यवसायाची व्याख्या. पण आपण योजना, कर्ज, सबसिडी, फंडिंग, स्टार्टअप, स्टँडअप असल्या भानगडीत अडकून पडलोय, जणू काय या स्कीम भेटल्या नाही तर आपला व्यवसाय सुरूच होऊ शकत नाही, किंवा आपण यशस्वीच होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी बिनकामाच्या आहेत. या फक्त व्यवसायाचा भाग आहेत, व्यवसाय नाही. आणि यांचा फायदा नाही झाला तरी काही फरक पडत नाही. उलट कुबड्यांना जेवढे दूर ठेवाल तेवढे स्वतःचे पाय मजबूत कराल… आणि पाय मजबूत असतील तर तुमची वाटचाल रोखायची जगात कुणाची हिम्मत नाही.

चोवीस तास व्यवसाय सोडून सबसिडीचे गणित उगाळणाऱ्यांचं खरं तर हसू येतं… मिळाली सबसिडी, आणि व्यवसाय चाललाच नाही… मग काय चाटायचंय त्या सबसिडीला? नुसते पैसे हातात आले म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असं कुणी सांगितलं ? काल करोडोत खेळणारे कितीतरी, सबसिडी अनुदाने मिळूनही, आज भिकेला लागलेत… कशामुळे? दुसऱ्यांकडून काहीतरी मिळेल या आशेवर जगल्यामुळे.

सबसिडी हा तुमचा इन्कम नसून फक्त प्रोजेक्ट कॉस्ट कमी करण्याचं काम करते, याव्यतिरिक्त तिचा दुसरा उद्देश नाही.

व्यवसाय चालणं, यशस्वी होणं हे तुमचं अंतिम उद्दिष्ट असायला हवं. तुम्ही चोवीस तास फक्त व्यवसायाचाच विचार करायला हवा. याव्यतिरिक्त कोणतेही विचार हे तुम्हाला व्यवसायापासून लांब नेणारे असेल… आणि तुमच्या व्यवसायाला संपवणारे असेल…

सरकारी योजना या फक्त तुम्हाला व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी असतात तुम्हाला यशस्वी करण्यासाठी नाही, यशस्वी होण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत. व्यवसायाचं मार्केट पोटेन्शियल बघा, तुम्हाला कोणता व्यवसाय शक्य आहे हे बघा, त्याला किती सबसिडी मिळते याकडे लक्ष देऊ नका. मार्केट पोटेन्शियल असेल तर कोणत्याही सरकारी स्कीम ची अपेक्ष न करता व्यवसाय सुरु करा. असेल काही योजना तर चांगलंच, आणि नसेल तरी काहीच फरक पडत नाही.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!