खाद्यसंस्कृती : तुमच्या हातात चविष्ट खाद्यपदार्थ बनविण्याची कला आहे? तिला व्यवसायाचं रूप द्या…


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

खाद्यपदार्थ बनवण्याची प्रत्येकाच्या हाताची कला वेगळी असते. प्रत्येकाच्या हाताला एक विशिष्ट चव असते. म्हणजे, चहा बनवण्याचा एकच फॉर्म्युला वापरून दोन जणांनी चहा बनवला तरी दोघांच्याही चहाला वेगळी चव असेल. नकळतपणे आपल्या हातात ती चव आलेली असते. काहींकडे काही ठराविक पदार्थांची स्पेशॅलिटीचं असते. माझ्या काकूंच्या हातची काळ्या आमटीच्या बटाट्याची भाजी मला खूप आवडते, आमच्या शेतातल्या वस्तीवरील मावशींच्या हातच्या भाजीला एक वेगळीच टेस्ट आहे, किंवा माझ्या आईच्या हाताची काळ्या मसाल्याची आमटी आणि भाकरी मी अतिशय आवडीने खातो. प्रत्येकाच्या हाताला एक विशिष्ट चव असते. अशी काही वेगळी चव जर तुमच्या हातात असेल तर तिला तुम्ही व्यवसायाचं रूप नक्कीच देऊ शकता. एक स्वयंरोजगाराच्या दृष्टीने तुम्ही तुमच्या कलेला विकसित करू शकता.

लोकांना चविष्ट खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी मोठं हॉटेलच पाहिजे असते असे काहीच नाही. खवय्यांना चांगली चव असणारे पदार्थ हवे असतात, आवडीच्या पदार्थांचे स्रोत ते कुठूनही शोधून काढू शकतात. फक्त त्यांना हवी असलेली चव देण्याची क्षमता तुमच्या हातात असली पाहिजे. तुमचा व्यवसाय चालणारच याची खात्री बाळगा.

अशावेळी तुम्हाला खूप मोठे हॉटेल सेटअप करावे लागते, खूप काही खर्च करावा लागतो ते बिलकुल नाही. अगदी लहानातील लहान जागेतही तुम्ही सुरुवात करू शकता. काही पदार्थ तर घरी बनवून विकू शकता. मोठ्या पसाऱ्यापेक्षा लहानश्या जागेत असलेल्या स्नॅक सेंटर कडे लोकांचा आता ओढा जास्त आहे. त्यात जर ते एका दोन ठरावीक पदार्थांसाठीच असेल तर खवय्ये ठरवून अशा ठिकाणी जातात. आता सुरुवात घरातून करायची, एखाद्या छोट्याश्या शॉप पासून करायची कि इतर काही मार्गांनी, हे सर्वकाही तुम्ही काय बनवू शकता यावर ठरेल.

काही उदाहरणे पाहुयात…

तुम्ही स्वतः काही पदार्थांची रेसिपी शोधली असेल तर त्याला स्पेशलायझेशनचे रूप देऊ शकता
खास चव असलेले पालक भजे कुठे मिळत नाहीत… सुरु करू शकता. ग्रामीण भागात मिरची भाजे खूप खातात, पण शहरात कुठे मिळत नाहीत, त्याचाही विचार करू शकता.
तुम्ही चांगले चाट पदार्थ बनवू शकत असाल तरत्यातही संधी आहेत.
चटणी सारखे पदार्थ घरीच बनवून विकू शकता. किंवा एखादे लहानसे चटणी सेंटर मधूनही विक्री करू शकता. चविष्ट चटणीच्या चाहत्यांची संख्या कमी नाही मार्केटमधे.
कुणी पिझ्झा छान बनवतं, ते घरपोच डिलिव्हरीच्या रूपाने घरातूनही विकत येईल, किंवा एक चांगले शॉप पाहून सुरुवात करू शकता.
कुणाच्या हातात नॉन-व्हेज ची चव असू शकते, त्यासाठी तर घरातून सुरुवात केली तरी चालू शकते. मसाला आपला स्वतःचा ठेऊन फक्त नॉन-व्हेज शिजवून देण्याची सेवा जरी सुरु केली तरी खूप प्रतिसाद मिळेल.
याप्रमाणेच काही शाकाहारी पदार्थांचा सुद्धा विचार करता येईल.
अगदी घरगुती स्वयंपाक सुद्धा लोकांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या घरी जाऊनच बनवून देण्याचा तुम्ही विचार करू शकता
दुधाचे काही खव्यासारखे पदार्थ आहेत ज्याची प्रत्येक उत्पादकाची चव वेगळी असते. पाथर्डी तालुक्यातील करंजी चा कुंदा यामुळेच प्रसिद्ध आहे.
तुमच्या भागातील एखादी खास रेसिपी असेल, त्यालाही व्यवसायाचे रूप देऊ शकता.

खूप पदार्थ आहेत, आणि हे सगळे पदार्थ कुणा एकाच्याच हाताने शक्य नाही. पण असे पदार्थ जे लोक उभ्या उभ्यानेच खाऊ शकतात किंवा पार्सल घेऊन जाऊ शकतील.

यातल्या बऱ्याचश्या गोष्टी महिलांशी निगडित आहेत, थोडक्यात हा लेख महिलांसाठी काही वेगळ्या पठडीतले स्वयंरोजगार सुचविण्यासाठीच आहे असंही म्हणता येईल.

खूप काही बनवण्यापेक्षा एक स्पेशल पदार्थ शोधा जो तुम्ही आणि फक्त तुम्हीच एका विशिष्ट चवीमधे बनवू शकता…. खाद्यसंस्कृतीला मरण नाही, फक्त त्यात काहीतरी वेगळेपण हवे.

बर, वर सांगितलेल्या काही उदाहरणांसाठी आणि यासारख्या आणखीही कित्येक स्टार्टअप साठी मोठ्या जागेची गरजही नाही. अगदी शॉप ची गरज पडलीच तर शंभर स्क्वे.फु. पेक्षा जास्त जागेची गरजही पडणार नाही. हॉटेलसारखे लोकांना बसण्याची खूप जागा असण्याची गरज नाही अशाच प्रकारे सेटअप असावा. लोकांनी तुमच्या शॉप मधून पदार्थ घेऊन बाहेर उभे राहून खाऊ द्या, काही फरक पडत नाही. थोडक्यात, पण एकदम सुटसुटीत, छानसे असे गोंडस शॉप तुम्ही अतिशय कमी गुंतवणुकीत सेटअप करू शकता. लोकेशन चांगले असेल तर उत्तमच पण तसे नसेल तर थोड्याश्या आडमार्गालासुद्धा तुमचा व्यवसाय चांगला चालू शकतो. फक्त आपल्याला एक खास मार्केटिंग प्लॅन तयार करावा लागेल जो तुम्हाला खवय्यांपर्यंत पोचवू शकतो. किंवा याहीपेक्षा वेगळा मार्ग म्हणजे फिरत्या गाडीवर व्यवसाय करणे. यात तर तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी व्यवसाय करू शकता, आणि यात आणखीही पठडीबाहेर जाऊन काही कलात्मक प्रेझेंटेशन करता येईल.

स्वतःला ओळखा, स्वतःमधील खाद्यसंस्कृतीला ओळखा. यात स्पर्धा नाही हेही लक्षात घ्या. कलेचा कुणी स्पर्धक नसतो. कला नेहमीच युनिक असते. तुमच्यासारखे फक्त तुम्हीच असता, तुमच्यातील कोणत्याही कलेची कॉपी कुणीही करू शकत नाही.

एखाद्या, रांगेत चार मोठे हॉटेल असणाऱ्या ठिकाणी, शेजारीच एक झोपडी उभारा. बाहेर, इथे फक्त तव्यावरचं पिठलं, चुलीवरची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मिळेल एवढाच बोर्ड लावा आणि सुरुवात करा… त्या शेजारच्या मोठया हॉटेलपेक्षाही जास्त गर्दी तुमच्या झोपडीवजा हॉटेलमधे दिसू शकते. आणि तुम्ही जर खास टेस्ट देऊ शकलात तर हि गर्दी दिवसेंदिवस वाढतानाच दिसेल, त्यात काही कमी होऊ शकत नाही, कारण तुम्ही देत असलेली चव युनिक आहे दुसरा कुणी तीच चव देऊ शकत नाही, त्या दुसऱ्याची चव वेगळी काहीतरी असेल, त्याचं मार्केट स्वतंत्र असेल. कलेच्या, ज्ञानाच्या क्षेत्रात स्पर्धा नसते, करण प्रत्येकजण आपल्यातच एक युनिक, अद्वितीय कलाकार असतो. आणि खाद्यपदार्थ बनवण्याची कला असेल तर प्रश्नच राहत नाही…

खाद्यसंस्कृती कधीही, कुठेही आणि कोणत्याही प्रकारे संधी निर्माण करते. तुमच्या हाताला असणारी चव व्यवसायात रूपांतरित करा. या खाद्यसंस्कृतीचा भाग व्हा. स्वयंरोजगाच्या दृष्टीने सुरुवात करून भविष्यात मोठा ब्रँड करण्याचे नियोजन करा.

(खाद्य संस्कृतीमधील मागील लेख लहानश्या पण पठडीतल्या आणि स्पेशल हॉटेल / सेंटर बद्दल आहे आणि हा लेख स्वयंरोजगाराच्या दृष्टीने लहान लहान सेटअप सुरु करण्यासंबंधी आहे. दोन्हीत गल्लत नको.खाद्यसंस्कृतीवर आणखीही बरीच माहिती आहे, ती पुढील लेखांत)

उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!