‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
व्यवसायात पर्चेस विभाग खूप महत्वाचा असतो. कच्चा माल, इतर साहित्य खरेदी करताना, बार्गेनिंग मधील तज्ज्ञ व्यक्ती तुमचे वर्षाला लाखो रुपये वाचवू शकतो.
बऱ्याचदा नवउद्योजक पर्चेस विभागाला जास्त गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. लहान व्यवसाय असेल तर शक्यता खरेदीसाठी कुणी तज्ज्ञ नियुक्त केला जात नाही. ते काम स्वतःच केले जाते. पण अशावेळी या क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. एक तर टक्केवारीत हिशोब करण्याची आपल्याला सवय नाही. बार्गेनिंग ची सवय नाही. बार्गेनिंग करणारा भिकारी असतो, बार्गेनिंग मुळे स्टेटस कमी होते अशी काहीशी आपली मानसिकता. महिलांच्या बार्गेनिंग स्किल ला प्रचंड प्रमाणात हेटाळण्याची आपल्याकडे पद्धत… पण हे बार्गेनिंग स्किल व्यवसायात किती महत्वाचे आहे हे कित्येकांच्या लक्षातच येत नाही.
एखादा कच्चा माल दहा रुपयाला मिळत असेल आणि समोरचा बारा रुपयावर अडून बसला असेल तर आपण सहज, जाऊदे ना दोन रुपयांनी काय फरक पडतोय, कुठं दोन रुपयांसाठी त्रास करून घ्यायचा, असं म्हणून समोरच्याच रेट मधे खरेदी करतो; किंवा एक दोन वेळा बार्गेनिंग चा प्रयत्न करून पाहतो विक्रेता खाली उतरला तर ठीक नाहीतर तो म्हणेल त्या रेट मध्ये खरेदी करून मोकळे होतो. हेच जर तिथे तज्ज्ञ व्यक्ती नियुक्त असेल तर तो त्या दोन रुपयांसाठी दोन दोन तास बार्गेनिंग करेल.
माझ्या एका कंपनीसाठी मी आणि माझा पार्टनर १-१ मीटर च्या प्लास्टिक ट्यूब खरेदी करण्यासाठी अशीच बार्गेनिंग करायचो. १ मीटर प्लास्टिक ट्यूब, सप्लायर २ रुपये २५ पैशाला सांगायचा तर आम्ही ती ट्यूब २ रुपये २२ पैशाला मिळावी म्हणून दोन तीन तास सहज बार्गेनिंग करायचो. आणि शेवटी ती ट्यूब २ रुपये २३ पैशाला मिळवायचो. दोन पैसे वाचवण्यासाठी आम्ही तीन तीन तास बार्गेनिंग करायचो. दोन पैसे वाचले, रक्कम लहान वाटेल पण टक्क्याच्या हिशोबात ती ०.८८% बचत होते, म्हणजे जवळ जवळ एक टक्का वाचवायचो आम्ही. आणि तयार प्रोडक्ट च्या विक्री किमतीवर आमचा नफा असायचा ६%… म्हणजे हा अर्धा पाऊण टक्का सुद्धा आमच्यासाठी किती महत्वाचा होता याचा तुम्हाला अंदाज येईल… हीच बार्गेनिंग आणि हेच वाचवलेले अर्धा पाव टक्के आपलं उत्पन्न शेकडो हजारो पटींनी वाढवू शकते.
व्यवसायात पर्चेस विभागात नेहमीच तज्ज्ञ व्यक्ती असावा. ज्याला मार्केट रेट चांगले माहित आहेत, जो तासोंतास बार्गेनिंग करून आपल्याला हव्या त्या गुणवत्तेचं प्रोडक्ट आपल्याला हव्या त्या रेट मधे खरेदी करू शकतो, असा एक व्यक्ती आपल्याकडे असायलाच हवा. आणि जर तुमचा व्यवसाय लहान असेल, त्यासाठी स्पेशल व्यक्ती नियुक्त करणे शक्य नसेल तर हे स्किल तुमच्याकडे असायला हवे. पर्चेस ला गांभीर्याने न घेतल्यामुळे किंवा पर्चेस चं गांभीर्य न ओळखल्यामुळे कित्येक उद्योगांचा प्रोडक्शन कॉस्ट आणि सेल कॉस्ट याचा मेळच बसत नाही. यामुळे कितीतरी उद्योग बंद पडलेले आहेत.
पर्चेस आणि गुणवत्ता हे दोन विभाग व्यवसायातील खूप महत्वाचे भाग असतात. लहान उद्योगात हे सगळं स्किल उद्योजकाकडे असायला हवे, आणि मोठ्या व्यवसायात हे स्किल असणारी तज्ज्ञ मंडळी तुमच्याकडे कामाला असायला हवीत. काही काळ जमिनीवर रेंगाळल्यावर व्यवसाय एकदम मोठी झेप का घेतो? कारण या प्रवासात हे स्किल असणारी वेगवेगळी मंडळी व्यवसायात गोळा झालेली असतात. आणि जेवढे तज्ज्ञ मेंदू एका ठिकाणी असतील तेवढी व्यवसायची वाढ जोमाने होत असते.
व्यवायातील इतर तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व पुढील भागात
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील