‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
फोर्ब्स मॅगेझीन… न्यू जर्सीतील जगप्रसिद्ध अमेरिकन बिजनेस मॅगेझीन.. एक ब्रँड… जगभरातील सर्वोच्च श्रीमंत असणारे उद्योग, उद्योगपती, नवउद्योजक आणि इतर सर्व क्षेत्रांतील मान्यवरांची मांनाकनं, याशिवाय फायनॅन्स इंडस्ट्री, गुंतवणूक, मार्केटिंग व इतरही महत्वाचे घटक जसे, तंत्रज्ञान, संवाद, सायन्स, कायदा आणि राजकारण आदीची सखोल माहिती. या फोर्ब्स मॅगेझीन मध्ये नाव असणे म्हणजे स्टेटस सिम्बॉल…
फोर्ब्स मॅगझीन चा इतिहास म्हणजे एका व्यक्तीकडे असलेल्या गुणांची, जिद्दीची, आलेल्या संकटांवर चिकाटीने संघर्ष करून प्राप्त केलेल्या यशाचा रोचक प्रवास… बी.सी. फोर्ब्स, फोर्ब्स मॅगझीन चे संस्थापक…
सन १९१७… अमेरिकेचा महायुद्धात प्रवेश… अशा काळात एक मासिक सुरू करणे म्हणजे तद्दन वेडेपणाच ठरावा ही परिस्थिती… पण मूळचे स्कॉटिश अन स्वतः व्यवसायिक लेखक असलेल्या बी. सी. फोर्ब्स यांना त्यांची आंतरिक उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. स्वतः स्वतःचा बॉस होणे हे त्यांचे ध्येय…
लेखनाची सुरुवात
सुरूवातीला ते दक्षिण आफ्रिका येथे गेले. तेथे New Rand Daily Mail चे संपादक असलेल्या एडगर वॉलेस (नंतर ब्रिटन आणि अमेरिकेत नावारूपास आलेले प्रतिथयश कादंबरीकार) यांच्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. पण लवकरच दक्षिण आफ्रिका हे त्यांच्यासाठी एखाद्या लहान डबक्यासारखे असल्याची जाणीव त्यांना डाचू लागली.
सन १९०४ मध्ये ते अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आले. तिथे नवीन नोकरी मिळविण्यासाठी त्यांना खूप कष्ट पडले, पण काहीही झाले तरी फोर्बस यांना घरी परत जायचे नव्हतेच. केवळ स्वतःचे मूल्य लोकांना समजावे म्हणून त्यांनी एका एडिटरकडे विनामूल्य लिखाण चालू केले. त्याही नोकरीची त्यांना शाश्वती नव्हती, पण त्यांनी जिद्दीने नशीब आजमावले. पक्के व्यावसायिक असल्याने दरम्यानच्या काळात त्यांनी कधी पगाराचीही मागणी केली नाही.
शेवटी या चिकाटी अन धैर्याने त्यांना व्यावसायिक लेखनासाठी मानांकन मिळाले. आणि आणखी एका पब्लिकेशन मध्ये दुसरी नोकरीही मिळाली.
दोन संपादकांची लिखाण, आणि त्याच दोन संपादकांमधे बेस्ट एडिटर मानांकनासाठी स्पर्धा..
दोन्ही संपादकांचे काम बी.सी. च करायचे आणि गम्मत म्हणजे बेस्ट एडिटर मानांकनासाठी याच दोन्ही संपादकांची एकदा हमरी तुमरीही झाली. पण याची परिणीती फोर्ब्स यांच्या लेखनशैलीची माहिती अमेरिकेला होण्यात झाली. अल्पावधीतच बी.सी. फोर्ब्स हेच अमेरिकेतील ख्यातनाम लेखक ठरले. सातत्याने नवनवीन यशस्वी उद्योजकांबद्दल लिहून लिहून फोर्ब्स यांनाच प्रेरणा मिळाली अन जातिवंत स्कॉटिश असल्याने त्यांनी आपल्याकडे जमा असलेल्या सर्व महितीचा, अनुभवाचा अन व्यावसायिक लेखनबुद्धीचा योग्य वापर केला.
स्वतःची प्रकाशन संस्था सुरु केली
आपली स्वतःची प्रकाशन संस्था काढण्यासाठी हीच योग्य वेळ आहे हे त्यांनी जाणले व Doers & Doings या नावे संस्था सुरूही केली. त्या वेळच्या प्रचलित काळानुसार नंतर फोर्ब्स ने स्वतःचेच आडनाव वापरायचे ठरवले. उद्योजकीय भांडवलशाहीवर फोर्ब्सचा प्रचंड विश्वास होता. फोर्ब्समासिकाच्या पाहिल्याच अंकात ते म्हणतात की व्यवसाय म्हणजे आनंदनिर्मिती होय. त्यांनी आपल्या नेतृत्वगुणाच्या आणि कठोर कर्तव्य तत्परतेच्या जोरावर कामगारांची पिळवणूक करणाऱ्या व अकार्यक्षम उद्योजकांचे कुठलीही भीडभाड न ठेवता वाभाडे काढले.
अडचणीचा काळ
१९२० च्या सुमारास फोर्ब्स अगदी पूर्ण भरात होते. त्यावेळी भल्याभल्यांनी अगदी करोडो डॉलर्स मोजून फोर्ब्स ला विकत घेण्याचा प्रयत्न केला पण फोर्ब्स विकले गेले नाही. पुढे १९३२ साली मात्र कंपनी दिवाळखोरीत निघण्याची वेळ आली कारण सन १९३० मधे बाजारात आणखी दोन नवीन मासिकांची एन्ट्री झाली होती, बिझनेस वीक आणि फॉर्च्युन या दोन्ही मासिकांनी बरेचसे मार्केट काबीज केले होते. फोर्ब्स कंपनीचे ८०% उत्पन्न हे जाहिरातींवर अवलंबुन होते. स्पर्धेमुळे जाहिरातींचा स्त्रोत विभागला आणि मंदावला. या काळात सर्वांनाच निराशेने ग्रासले होते. पण बी.सी. फोर्ब्स यांनी धीर सोडला नाही. उत्पन्नासाठी ते इतर अनेक मासिकांसाठी लिहीतच राहीले. त्यांना कामगारांच्या पगारात २५% कपात करावी लागली. त्यांनी स्वतः पण अनेक वर्षे पगारच घेतला नाही. या कठीण काळात त्यांच्या कामगारांनी त्यांना मोलाची साथ दिली.
आणखी एका मॅगझीन ची सुरुवात आणखी यशाकडे वाटचाल
त्यांचा मुलगा ब्रुस हा त्यांच्यासोबत काम करत होताच, मग सन १९४५ मधे त्यांचा आर्मीमधे मशीन गनर असलेला आणि युध्दात जबर जखमी झाल्यामुळे रिटायर झालेला मुलगा माल्कम सुध्दा कंपनीत रुजु झाला. त्याने कंपनीत पूर्णवेळ व्यावसायिक संपादक व लेखकांच्या नियुक्त्या करुन, फोर्ब्स इन्व्हेस्टर हे नवीन साप्ताहिक सुरु केले. ज्यामधे शेअरबाजारातील भाव, चढउतार, अंदाज, फायदेशीर सौदे यांची अभ्यासपूर्ण विश्लेषणं दिलेली असत. महत्वाचे म्हणजे ज्यावेळी फोर्ब्स सबस्क्रिप्शन मात्र ४$ होते, त्यावेळी या फोर्ब्स इन्व्हेस्टर चे सबस्क्रिप्शन माल्कम ने ३५$ ठेवले. तरीही अल्पावधीतच हे साप्ताहिक यशस्वी झाले अन् फोर्ब्सला नवसंजीवनी मिळाली.
काळानुसार प्रगतीचा हा आलेख उंचावतच राहिला. माल्कम म्हणजेच MSF यांनी १९८२ मधे अमेरिकेतील ४०० सर्वोच्च श्रीमंतांची यादी प्रसिध्द केली. ती परंपरा फोर्बस आजही जपतेय…
_
उद्योजक मित्र
www.udyojakmitra.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील