तुमचा व्यवसाय कशासाठी ओळखला जातो हे महत्वाचे आहे…


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

पुण्याहून नगरकडे जाताना शिरूरचा घोडनदीचा पूल पार केला कि निघोज फाट्याला चहा नाश्त्याच्या हॉटेलची रांग लागते. तेच हे इमेजमधील ठिकाण. काल पुण्याहून येताना इथे चहा प्यायला थांबलो होतो, चहा पिता पिता थोडं निरीक्षण केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या, आणि मग फोटो घेतला.

पुणे नगर मार्गाने प्रवास करणाऱ्यांना इथे सांगितलेल्या दोन्ही ठिकाणांचा संदर्भ लक्षात येईल, ज्यांना हि ठिकाणे माहित नाही त्यांनी फक्त लोकेशनचा अंदाज घ्यावा. बाकी मुद्दा काय आहे हे वाचताना लगेच लक्षात येईल.

मागील दोन वर्षात हे निघोज फाटा लोकेशन चहा नाश्त्यासाठी बऱ्यापैकी ओळखलं जातंय. खरं तर पुण्याकडून येताना याच्या आधी पाच किलोमीटर वर सरदवाडी गाव लागतं. मागील कित्येक वर्षांपासून नगर पुणे रस्त्याने जाणाऱ्यांसाठी चहा नाश्त्यासाठी थांब्याचं म्हणून हे ठिकाण ओळखलं जात. आजही सरदवाडीला थांबणाऱ्या प्रवाशांची गर्दी खुप मोठी आहे. पण असं असूनही या निघोज फाट्यावर सुद्धा आता बऱ्यापैकी प्रवासी थांबत आहेत. पण फक्त चहा नाश्त्यासाठीच; जेवणासाठी नाही. इतके वर्ष सरदवाडी ज्यासाठी ओळखलं जात होतं ती ओळख आता हे ठिकाण घेऊ पाहतंय. पण यामुळे सरदवाडीच्या मार्केटला प्रॉब्लेम नाहीये.

सरदवाडीचं मार्केट आता पुढच्या पातळीवर जाऊन जेवण्यासाठी थांबण्याचे ठिकाण म्हणून ओळख मिळवतंय. इथे आता २०-२५ चांगले हॉटेल झालेत. पंजाबी, साऊथ इंडियन पदार्थ भरपूर मिळतात. पण इथला चहा भलताच महागडा आहे. वीस रुपयांना लहानश्या कपात चहा पिताना जरा जास्तच किंमत आहे असं वाटतंच.

आपल्याला लुबाडलं जातंय असं वाटलं कि ग्राहक पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतोच आणि इथल्या हॉटेल चालकांनाही आपल्याकडे आता चहा पिणाऱ्यांनी थांबू नये असंच वाटतंय… साहजिकच ग्राहक पर्याय शोधायला लागले आणि निघोज फाट्याच्या या व्यावसायिकांनी तो पर्याय द्यायला सुरुवात केली. मागील दोन वर्षात इथे लहान लहान पण चांगले नाश्ता सेंटर सुरु झालेत आणि पुढील दोन वर्षात इथल्या मार्केटमधे चांगली वाढ झालेली दिसेल.

आता मुद्द्याकडे वळू… तुमच्या व्यवसायाला किंवा मार्केटला एक ओळख असावी. तुम्ही कशासाठी आहात, तुम्हाला नक्की कशासाठी ओळखायला हवं हे लोकांच्या लगेच लक्षात यायला हवं. हि ओळख तयार करणे हे तुमचे व्यावसायिक वाटचालीत एक महत्वाचे काम असते. तुम्हाला, तुमच्या व्यवसायाला, तुमच्या मार्केटला ज्यासाठी लोळखलं जातं लोक त्यासाठीच तिथे येतात. तिथे मिळणाऱ्या इतर गोष्टींमधे त्यांना स्वारस्य नसतं. वर सांगितलेल्या दोन गावांचं उदाहरण पहा… या दोन्ही ठिकाणांच्या मार्केटची ओळख अभ्यासा.

खूप वर्षांपासून चहा नाश्त्यासाठी ओळखलं जाणारं सरदवाडी गाव आता जेवणासाठी ओळखलं जातंय. इथे लोक जेवणासाठी हमखास थांबतात. पण चहासाठी लोक पर्याय शोधात होते. तो पर्याय या निघोज फाट्यावरील व्यावसायिकांनी द्यायला सुरुवात केली. आता हे ठिकाण दहा मिनिटांच्या चहा स्टॉप साठी ओळखलं जातंय. या मार्केटला जेवणाच्या थांब्यासाठी ओळख मिळणे सध्यातरी शक्य नाही. ती ओळख सरदवाडीला आहे. येत्या वर्ष दोन वर्षात या रस्त्याने जाणारा प्रवासी चहा प्यायचा तर निघोज फाट्याला थांबण्याचा विचार करेल आणि जेवण करायचं तर सरडवाडी लोकेशनचाच विचार करेल. तोटा दोघांचही नाही, यात फायदाच आहे. दोन्ही मार्केटनी आपला ग्राहकवर्ग ठरवून घेतला असेल आणि तो त्यांनाच सेवा पुरविण्याचे काम करेल.

लोक स्वतःहून एखाद्या मार्केटची किंवा व्यवसायाची ओळख ठरवतात, किंवा काहीवेळेस आपण आपल्या मार्केटची किंवा व्यवसायाची ओळख विचारपूर्वक नियोजनपूर्वक तयार करतो. पण हि ओळख तयार होणं महत्वाचे असते.

कापड बाजार, गंज बाजार, भाजी बाजार अशी मार्केटची नाव आपल्या शहरात असतातच. हि नाव म्हणजेच त्या मार्केटची ओळख असते. त्यासंबंधी काही खरेदी असेल तर लोक त्याच मार्केटमधे जाण्याचा विचार करतात.

वैयक्तिक व्यवसायाचा विचार करताना सुद्धा हाच नियम लागू होतो. इथे तर हा नियम जास्त प्रभावीपणे लागू होतो. लोक ठराविक ब्रँड ला ठरावीक प्रोडक्टशीच जोडून घेतात. त्याव्यतिरिक्त इतर प्रोडक्ट लोकांना नको असतात.

महिंद्रा चांगल्या SUV बनवतं कार नाही, मारुती मध्यमवर्गीय लोकांसाठी बजेटमधील गाड्या बनवते महागड्या गाड्या नाही; या कंपन्यांचे त्यांच्या इमेजला तोडू पाहणारे प्रयोग लोकांनी नाकारले आहेत. कोका-कोला ने पिझा सेंटर सुरु केले तर चालणार नाहीत, लोक तिथे जाऊनही कोका-कोलाच मागतील. मॅक्डोनाल्ड ने पंजाबी किंवा साऊथ इंडियन हॉटेल सुरु करून जमणार नाही. रेमण्ड ने कपडेच विकावेत, शूज चप्पल विकून जमणार नाही, अगदी आमचा ब्रँड उच्चवर्गीय लोकांसाठी आहे हेच रेमण्ड स्वतःहून सांगत असतं. बाटा ने फक्त शूज विकावेत, कपडे नाही. प्रसिद्ध इलेक्ट्रिकल ब्रँड ‘अँकर’ ने टूथपेस्ट बनवून पहिली, नाही जमलं. अगदी एखादा हॉटेलचा ब्रँड सुद्धा शुद्ध शाकाहारी किंवा मांसाहारी साठीच ओळखला जातो, त्याव्यतिरिक्त तिथे इतर गोष्टींना विशेष मागणी नसते.

प्रत्येक ब्रँड ची आपली स्वतःची ओळख आहे. हा काही नियम नाही. हि ओळख एक तर आपोआप तयार झालेली आहे किंवा त्यांनी स्वतःहून तयार केलेली आहे.
आणि याचा त्यांना फायदाच होतो. लोकांना प्रोडक्ट सुचलं कि त्यासोबत जोडलेला ब्रँड सुद्धा लगेच सुचतो. यातून एक ग्राहकवर्ग तयार होतो.

तुमचं एखादं शॉप असेल तरी ते कशासाठी ओळखलं जात हे महत्वाचे आहे. काही मोबाईल शॉप फक्त स्वस्तातल्या मोबाईल साठी ओळखले जातात तर काही फक्त महागड्या मोबाईल साठी. त्यांच्याकडे फक्त त्यासाठीच ग्राहक येतो. काही कपड्याची दुकाने खास लग्न खरेदीसाठीच ओळखली जातात तर काही शॉप्स लग्नखरेदीसाठी कामाची नाहीत पण इतर वेळेस खरेदीसाठी योग्य आहेत अशा प्रकारे ओळखली जातात. पुण्यातलं दुर्गा कॅफे कोल्ड कॉफी साठीच ओळखलं जात तर काटाकिर्रर झणझणीत मिसळ साठी. खान्देश खास भरीत भाकरी साठी ओळखलं जात तर विदर्भ डेझर्ट कुलर्स साठी. तुमच्या गावातील शहरातील मोठ्या व्यवसायांच निरीक्षण केलं तर लक्षात येईल कि प्रत्येकाची एक स्वतंत्र ओळख आहे, आणि ती ओळखच त्यांना ग्राहक मिळवून देत आहे. ज्या दिवशी ती ओळख संपेल त्यादिवशी तो व्यवसाय संपलेला असेल.

प्रत्येक शहराची एक ओळख असते, प्रत्येक माणसाची एक ओळख असते, प्रत्येक व्यवसायाची, प्रत्येक मार्केटची एक ओळख असते, प्रत्येक विभागाची प्रांताची अगदी देशाची एक ओळख असते. ती ओळख काय आहे त्यावर त्यांचे भवितव्य ठरत असते.

प्रत्येकाची आपली एक ओळख आहे, आणि तीच ओळख त्यांना मोठं बनवते.

तुमचा व्यवसाय किती लहान, किती मोठा किंवा तुमचं मार्केट किती लहान वा मोठं आहे हे महत्वाचे नाही. ते कशासाठी ओळखलं जातंय हे महत्वाचे आहे. लोकांनी त्या ओळखीसाठीच तिथं आलं पाहिजे. हि ओळख तयार करा. भरमसाठ गोष्टी स्वतःला चिटकवून घेण्यापेक्षा काही ठराविक गोष्टींसाठी ओळख तयार करा.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “तुमचा व्यवसाय कशासाठी ओळखला जातो हे महत्वाचे आहे…

  1. खूप सुंदर शब्दात मार्गदर्शन केले आहे सर धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!