उद्योजकांसाठी प्रेरणादायी., संभाजी राजांची जंजिरा लढाई…


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

जंजिरा… अरबी समुद्रातील एक अजिंक्य किल्ला. या किल्ल्याची रचनाच अशी कि किल्ला सहजासहजी जिंकणे अशक्यच… या किल्ल्यावर राज्य होते सिद्दीचे. हे सिद्दी म्हणजे आफ्रिकेतून आलेले हबशी. या किल्ल्याच्या बळावर ते परिसरावर राज्य करत होते. समुद्रावर आपले वर्चस्व राखून होते. यांचा स्थानिक नागरिकांना खूप त्रास असे. महिलांची तस्करी करणे, निरपराधांच्या हत्या करणे, अत्याचार असल्या बाबी नित्याच्याच झाल्या होत्या. याच सिद्दीला धडा शिकविण्याचे शंभू राजांनी ठरवले.

हा किल्ला अभेद्य होता. बाहेरून या किल्ल्याला हरवणे अशक्यच होते. म्हणून या किल्ल्याला आतून फोडण्याचे नियोजन केले गेले. कोंडाजी फर्जंद या मराठा सरदारासोबत काही निवडक मावळे सिद्दीला सामील झाले आणि जंजीऱ्यात राहू लागले. इशारा मिळताच किल्ल्यातील सर्व दारुगोळा उडवून द्यायचा आणि किल्ल्यावर बाहेरून हल्ला करायचा असा बेत होता. पण शेवटच्या क्षणाला बेत फसला. आपले मावळे सिद्दीच्या तावडीत सापडले. सगळ्यांच्या क्रूर कत्तली झाल्या. पण यातून एक मावळा बाहेर पडला, आणि सिद्दीच्या नजरेतून वाचून समुद्रातून पोहून महाराजांपर्यंत हि बातमी पोचवली.

एवढ्या दिवसांपासून नियोजन केलेला बेत फसला, सहकारी गेले पण शंभूराजे निराश झाले नाही. शंभूराजांनी आता जंजिऱ्यावर थेट हल्ला करण्याचे ठरवले. वीस हजार सैन्य आणि तीनशे गलबते घेऊन त्यांनी जंजिऱ्यावर हल्ला चढवला. मराठ्यांच्या तोफा तुफान आग ओकू लागल्या. कोंडाजी फर्जंद आणि मावळ्यांच्या बलिदानाचा बदला घेण्याच्या त्वेषाने मावळे पेटून उठले होते. जंजिरा जवळजवळ पडल्यातच जमा होता, पण समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला धावून आला. समुद्रात भरती आली, आणि मराठ्यांच्या सैन्याला मागे सरकावे लागले. पुन्हा एकदा हाती आलेली शिकार निसटली…

पण अपयशाने खचणारा शिवाजीचा छावा नव्हता. प्रत्येक अडचणींवर उपाय शोधण्याची वृत्ती शंभू राजांना नवनवीन मार्ग शोधण्यास प्रवृत्त करत होती. शेवटी शंभू राजांनी थेट समुद्रातच भराव टाकून जंजिऱ्यापर्यंत रस्ता तयार करण्याची योजना आखली. आणि त्यावर काम सुरु केले. हजारो मजूर परिसरातून दगड माती गोळा करून आणत आणि समुद्रात भराव टाकत. एकीकडे तोफांचा मारा आणि दुसरीकडे सेतू बांधणी… जवळ जवळ ६०-७०% भराव टाकून झाला होता… जंजिरा आता अवाक्यात आला होता…

जंजिरा परकीयांच्या जोखडातून मुक्त होणारच होता… पण जंजिरा पडला तर समस्त अरबी समुद्रावर मराठ्यांचे वर्चस्व निर्माण होईल याची औरंगजेबाला जाणीव झाली आणि त्याने उत्तरेकडून जंजिऱ्याच्या रक्षणासाठी फौज धाडली. यातील काही फौज स्वराज्याच्या दिशेने निघाली. स्वराज्यावर आलेले अनपेक्षित संकट पाहून शंभू राजांना शेवटच्या क्षणी माघार घ्यावी लागली आणि जंजिरा मराठ्यांच्या तडाख्यातून बचावला.

हि लढाई तशी इतिहासात दुर्लक्षित राहिलेली. कित्येकांना माहित नसेलही. कारण यात प्रत्यक्ष विजय मिळालेला नव्हता. पण हि लढाई विजयापेक्षाही जास्त महत्वाची होती. यानंतर सिद्दीला मराठ्यांची जरब बसली ती कायमचीच. समुद्रात भराव टाकणे आताच्या काळात सोपे वाटत असले तरी जंजिऱ्यासमोर उभं राहिल्यावर साडे तीनशे वर्षांपूर्वी या प्रचंड समुद्रात मातीचा भराव टाकून सेतू उभारण्याची कल्पना सत्यात उतरवणे किती कठीण काम असेल याची कल्पना येते

हीच लढाई का आठवावी? इतरही लढाया आहेत जिथे शंभू राजांनी प्रचंड यश मिळवलेले आहे. यातीलच एक लढाई पोर्तुगीजांविरोधातली. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्यावर महाराजांनी असा प्रखर हल्ला चढवला होता कि पोर्तुगीज जवळजवळ भुईसपाट झाले होते, पण इथेही औरंगजेब पोर्तुगीजांच्या मदतीला धावून आला होता. नाहीतर पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा शंभू राजांच्या काळातच स्वतंत्र झाला असता. पण व्यक्तिशः मला शंभू राजांची जंजिऱ्याची लढाई नेहमीच इतर लढायांपेक्षा जास्त भावली आहे. कारण हि लढाई शंभू राजांची निर्णय क्षमता दर्शवते, अडचणीत खंबीर राहून मार्ग शोधण्याची वृत्ती दर्शवते, अपयशाने खचून न जात जिद्दीने पेटून उठण्याची वृत्ती दर्शवते…

हि लढाई प्रत्येक तरुण मनाला ऊर्जा देणारी आहे… खचलेल्या मनाला ताकद देणारी आहे… अपयशावर मात करण्याची उर्मी देणारी आहे…
सगळीकडूनच अपयश येतंय, काय करू ? असं ज्याला ज्याला वाटतं अशा प्रत्येकासाठी हि लढाई प्रेरणादायी आहे…. 

नियोजन गडबडने हे उद्योजकांच्या वाट्याला नेहमीच येते. आपण एक नियोजन करतो आणि घडते भलतेच. एखादा फार जोमाने प्रयोग करतो आणि नेमका तोच अपयशी ठरतो असं बऱ्याचदा होतं… पण अशा कितीही अडचणी आल्या तरी माघार न घेता पुन्हा जोमाने उभा राहणाराच यशस्वी होतो… म्हणूनच शंभूराजांची हि जंजिरा लढाई समस्त उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!