‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
आपल्या आसपास भरपूर व्यवसायाच्या संधी असतात, पण निरीक्षणाची सवय नसल्यामुळे या संधी आपल्याला दिसत नाहीत. अशीच संधी आहे हायवेलागताच्या गावांना.
बऱ्याचदा हायवेने एखाद्या गावातून किंवा गावाजवळून जात असताना आपल्या एका ठराविक शेतमालाची विक्री करणारे बरेच स्टॉल दिसतात. कांदा उत्पादन करणारे गाव असेल तर सगळीकडे कांद्याच्या गोण्या भरून विक्रीसाठ ठेवलेले दिसेल, द्राक्ष उत्पादन करणारे क्षेत्र असेल तर द्राक्षाचे स्टॉल दिसतात. यातले बरेच स्वतः शेतकरीच असतात. पण रस्त्याने जाणाऱ्यांना मार्केट ओळखीचे झाल्यामुळे इतरही काही जण तशाच प्रकारचे स्टॉल सुरु करतात. काही महिन्यात संबंधित गावाला एक ओळख मिळून जाते. एखादं ठराविक प्रोडक्ट घेण्यासाठी प्रवासी तिथे थांबायला लागतात. आणि अल्पावधीतच तिथले मार्केट तयार होते.
याच प्रकाराला आपण थोड्या पुढच्या टप्प्यावर घेऊन जाऊ शकतो. हे रोडसाईड स्टॉल तसे खूपच साध्या पद्धतीने थाटलेले असतात. एखाद्या प्लास्टिक टेबलवर माल ठेवायचा आणि शेजारी खुर्चीवर बसायचे. पण यामुळे ना ते शॉप उठावदार दिसते नाही परिसराला शोभा येते. यामुळे प्रवाशांना तिथे वेगळेपण जाणवत नाही, आणि ते आकर्षितही होत नाहीत. फक्त गरज असेल तरच थांबतात. म्हणूनच याला थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण बघुयात.
दहा बारा जणांनी मिळून हायवेच्या बाजूने चार पाचशे मीटरच्या परिसरात छोटछोटे स्टॉल उभारणे आणि सामान्यपणे एकाच प्रकारचे प्रोडक्ट विकणे. यासाठी जास्त खर्च येत नाही. हे स्टॉल चौकोनी आकाराचे कापडी स्टॉल असावेत, जे सकाळी उभे करून संध्याकाळी पुन्हा आवरून घरी घेऊन जाता येतील… सोबतच्या इमेज मध्ये तुम्हाला या स्टॉल चे काही फोटो पाहून अंदाज येईल. स्टॉल चे कापड वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये घ्यावे. जेणेकरून स्टॉल उठावदार दिसेल, आणि पाहणाऱ्याला प्रसन्न वाटेल.

दहा पैकी ६ स्टॉल हे एकाच प्रकारचे प्रोडक्ट विकणारे असावेत आणि थोड्या थोड्या अंतराने उभे करावेत. चार स्टॉल हे इतर काही प्रोडक्ट विकणारे असावेत आणि या या सहा स्टॉल च्या जवळच उभे करावेत. यामुळे प्रवासी तुमच्या परिसराला एका प्रोडक्टशी जोडून त्यासाठी थांबतील आणि सोबतच या इतर प्रोडक्ट च्या स्टॉल मधून सुद्धा काही खरेदी करतील. सुरुवातील चार पाच जणांनी सुरुवात केली, प्रतिसाद मिळायला लागला कि हळूहळू आणखी स्टॉलधारकांची ची संख्या वाढत जाईल. काही काळाने प्रवाशांसाठी ते एक हक्काचे थांबायचे ठिकाण होऊन जाईल. पण स्टॉल जास्तीत जास्त आकर्षक, प्रसन्न आणि स्वच्छ राहतील याची खबरदारी घ्यावी.
आता प्रश्न राहतो तो इथे काय काय विकता येईल… बरेच पर्याय आहेत…
१. सर्वात आधी आपल्या परिसरातील शेतातील काय माल विकता येईल ते पाहावे. शक्यतो परिसरात फळबागा असतील तर त्याचेच स्टॉल सुरु करावेत. प्रवाशांना फ्रेश माल मिळतो, त्यामुळे ते जास्त प्रमाणात थांबतात. चांगल्या पॅकिंग मधे फळे विकल्यास मोठा ग्राहकवर्ग मिळेल. दोन तीन पेक्षा जास्त प्रकारची फळे ठेऊ नका.
२. जर परिसरात फळबागा नसतील तर इतर व्यवसायाची निवड करा. उदाहरणार्थ सर्वांनी मिळून उसाच्या रसाचे स्टॉल सुरु करा. उन्हाळ्यात चांगले मार्केट मिळेल, त्यांनतर इतर सिझन मधे त्याच स्टॉल ला चहा, ज्यूस अशा सेंटर मध्ये रूपांतरित करा.
३. सकाळी सकाळी नाश्त्याचे स्टॉल सुरु करू शकता. सकाळी रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना नाश्त्याची तल्लफ लागलेली असते. पोहे, उपमा, चहा सारख्या पदार्थांसाठी भरपूर आणि कायमस्वरूपी ग्राहक मिळतील. पदार्थ घरूनच बनवून आणावेत, गरम राहणाऱ्या डब्यात भरून ठेवावेत. सकाळी १०-११ पर्यंत चांगला व्यवसाय होईल. शहरात अशा प्रकारे सकाळी सकाळी नाश्ता विक्री बरेच जण करतात.
४. जर तुमच्या परिसरात काही स्थानिक नागरिकांकडून क्राफ्ट्स वा प्रदर्शनीय वस्तूंचे चे उत्पादन केले जात असेल तर स्टॉल मध्ये ते क्राफ्ट्स & डेकोरेटिव्ह प्रोडक्टस विक्रीसाठी ठेऊ शकता. यात काही वस्तू बाहेरून आणूनही ठेऊ शकता. तुमचे दहा वीस शॉप्स व्हरफ्ट्स चे मार्केट म्हणून ओळखले जातील.
५. काही ठराविक खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरु करू शकता, जसे कि फक्त भजे, समोसे इत्यादी. स्टॉल च्या जवळच हे पदार्थ बनवून स्टॉल मध्ये विक्रीसाठी ठेवावेत.
६. थांबलेल्या प्रवाशांना पाणी बॉटल हव्या असतातच. दिवसातून दहा वीस बॉटल विकल्या गेल्या तरी दीड-दोनशे रुपये सुटतात.
७. ब्रँडेड चिप्स ची पाकिटे सर्व स्टॉल मध्ये असावीत. ब्रँडेड चिप्स साठी ग्राहकवर्ग चांगला मिळतो.
८. परिसरात दूध उत्पादन होत असेल आणि तुमचे गाव शहराजवळ असेल तर एखाद-दोन स्टॉल दूध विक्रीचे असावेत. एक एक लिटरच्या पिशव्यात पॅक करून ताजे, भेसळ नसलेल्या दूध विक्रीला चांगला प्रतिसाद मिळू शकेल.
९. काही स्टॉल मध्ये काय विकायचे यात सीझननुसार बदल करण्याची तयारी ठेवा.
१०. वर जे दहापैकी चार स्टॉल वेगळया वस्तूंचे असावेत असे म्हटलेले आहे ते स्टॉल शक्यतो लहान मुलांची खेळणी, फॅशन ऍक्सेसरीज, डेकोरेटिव्ह प्रोडक्टस, घरगुती वापराच्या काही वस्तू अशा प्रकारचे असावेत. बाकीच्या स्टॉल वर थांबलेले प्रवासी या स्टॉल मधून इतर खरेदी करतील. लहान मुलांसाठी प्लास्टिक बॉल सारख्या खेळण्या जास्त विकल्या जातात.
११. जे काही विक्रीला ठेवाल ते तुमच्या स्थानिक भागाची खासियत अहे हे प्रवाशांना जाणवले पाहिजे याची काळजी घ्या. जे मला माझ्या शहरात मिळू शकत नाही असे काही तुमच्या परिसरात मिळतंय म्हणून मी तिथे थांबणार आहे… त्यामुळे स्थानिक झलक दिसली पाहिजे.

महत्वाचे…
१. या प्रयोगाला जास्त खर्च येणार नाही. दहा वीस हजारात सुरुवात होऊन जाईल.
२. स्टॉल आकर्षक रंगसंगतीमधे तयार केलेले असावेत
३. स्वच्छता चांगली असावी. हातात ग्लोव्ह्ज असावेत.
४. स्टॉल मधे पिवळ्या शेड चे बल्ब लावा. जुन्या प्रकारच्या बल्ब चा प्रकाश पिवळ्या पिवळसर असतो. ते बल्ब लावले तरी चालते. रात्रीच्या वेळेला पिवळ्या प्रकाशातील हे सगळे स्टॉल आकर्षक दिसतील. आणि जास्त प्रवासी थांबतील.
५. हायवेला स्टॉल आहे म्हणून रेट मार्केटपेक्षा जास्त असला पाहिजे असे नाही. रेट सामान्य ठेवा. मार्केटपेक्षा जास्त नको, आणि कमीही नको. थोडीफार बार्गेनिंग अपेक्षित धरून चला.
६. सर्व स्टॉल मोठ्या झाडांच्या सावलीखाली असावेत. स्टॉल च्या आसपास सतत थोडे पाणी मारून माती दाबून ठेवावी. स्टॉल जवळ आकर्षक रंगीबेरंगी खुर्च्या किंवा स्टूल ठेवावेत.
७. कोणत्याही स्टॉल ला नाव देऊ नका. फक्त जे प्रोडक्ट विकताय त्याचे लहान बॅनरचे फ्लेक्स बोर्ड तयार करून रस्त्याच्या बाजूने उभे करावेत. त्याखाली तुमचे नाव लिहावे.
८. नियोजन, बदल, प्रयोग यात सर्वांनी मिळून निर्णय घ्यावेत.
९. शेवटचा सर्वात महत्वाचा मुद्दा… जो मी नेहमीच सांगतो… एकमेकांत स्पर्धा करू नका, एकमेकांना स्पर्धक समजू नका, व्यवसायात राजकारण आणू नका, राजकारण करणाऱ्यांना बाजूला करा, एकजुटीने रहा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
खूप छान पद्धतीने आपण नवीन व्यवसायांचे तंत्र या लेखात मांडले आहे
खूप सुंदर आणि कमी भांडवलात सुरू करू शकतो आणि आपल्या परिसराची ओळख ही बनेल धन्यवाद असेच सुचवत रहा आपले आभारी आहोत
खूप छान संकल्पना आहे.मी अशा प्रकारचे स्टाँल पाहिलेले आहे, परन्तु क्लिक झाले नाही .आपल्या मार्गदर्शनामुळे डोक्यात प्रकाश पडला.
खुपच छान कल्पना नक्कीच यशस्वी होईल