‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणे रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे स्टार्टअप्स उभारत आहेत. एलॉन मस्क हे अमेरिकेत टेस्ला, स्पेसेक्सच्या माध्यमातुन इलेक्ट्रिक वाहने, रिसायक्लेबल रॉकेट्स तयार करत आहेत. नैसर्गिक संकटे टाळण्यासाठी आता इलेक्ट्रिक, सोलर आणि गो ग्रीन अशा गोष्टींचा वापर करणं अनिवार्य झालंय. भारतातही विशेष पाऊले या दिशेने पडत आहेत. त्यातीलच एक महत्वपूर्ण स्टार्टअप ‘युलू’.
‘युलू’ची सुरुवात १ नोव्हेंबर २०१७ ला अमित गुप्ता यांनी बेंगलुरूमध्ये केली (मागील भागामध्ये ‘विवर्क’ची संकल्पना मांडलेली. त्यांच्या ऑफिसमार्फत या ठिकाणी). अमित गुप्ता हे ‘युलू’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. अमित यांचं शिक्षण भारतातील प्रतिष्ठित महाविद्यालय ‘आयटी कानपुर’ येथे झाले आहे. त्यांनी २००० साली मेकॅनिकल इंजिनीरिंग पूर्ण केले असून त्यांनी आजपर्यंत भारतातील वेगवेगळ्या स्टार्टअप्सना ‘एंजल इन्व्हेस्टर’ म्हणून मदत केली आहे.
‘मायक्रो मोबिलीटी वेहीकल्स’ या वर्गवारीत ही वाहनसेवा कार्यरत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामुळे ट्रॅफिकसारखी समस्या, प्रदूषण हे कमी होण्यास मदत होते. भारतातील रस्ते तसेच सुरक्षा लक्षात घेऊन या बाईकची निर्मिती केलेली आहे. या वाहनामध्ये जीपीआरएस, जीपीएस आणि ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही बाईक भाडेतत्वावर शेअरिंग स्वरूपात उपलब्ध होते. हे सर्व अनुभवण्यासाठी आपल्याला ‘युलू’ हे अँप डाउनलोड करावे लागेल. अँड्रॉइड आणि आयओएस प्ले स्टोअरला हे अँप विनामुल्य उपलब्ध आहे.
या अँपमध्ये आपल्याला उपलब्ध असणाऱ्या युलू बाइक्सची ठिकाणे दिसतात. त्यांना ‘युलू झोन्स’ असे म्हणतात. त्यामध्ये स्क्रीनवरील ‘UNLOCK (अनलॉक)’चा आयकॉन दिसतो त्यावर क्लिक करून बाईकवर असणारा क्युआर कोड स्कॅन करावा लागतो. बाईकचे लॉक लगेच उघडते. यानंतर तुम्ही तुमच्या अपेक्षित प्रवासाला सुरुवात करू शकता. तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणार असाल तर त्याप्रमाणे ‘मल्टिपल स्टॉप्स’ निवडु शकता. यासाठी तुम्हाला PAUSE (पॉज) हा पर्याय निवडावा लागेल. किती वेळेसाठी थांबणार आहात ते नमूद करा आणि काम झाल्यानंतर ‘RESUME (रिज्युम)’ करा. तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ‘युलू झोन्स’ ना बाईक पार्क करा. या ठिकाणी तुम्हाला स्वतःला बाईक लॉक करावी लागेल. यानंतर ‘END RIDE (एन्ड राईड)’ हा पर्याय निवडा. आपण जेवढा वेळ ही बाईक वापरला आहात त्याप्रमाणे तेवढे पैसे तुमच्या वॉल्लेटमधून वजावट होतील.
युलूमध्ये २ प्रकारे चार्जेस आहेत. १. युलू मुव्ह २. युलू मिरॅकल. युलू मुव्हमध्ये पहिल्या ३० मिनिटांसाठी १० रु., नंतर प्रत्येक ३० मिनिटांसाठी ५ रु. चार्ज, पॉजसाठी रु.५ प्रति ३० मिनिटे व रु. ३० संध्याकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत (बाईक घरी असेल तर) चार्ज केले जातात. तर याउलट युलू मिरॅकलमध्ये अनलॉकसाठी १० रु., नंतर प्रत्येक १० मिनिटांसाठी १० रु., पॉजसाठी रु.५ प्रति ३० मिनिटे व रु. ९० संध्याकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत (बाईक घरी असेल तर) चार्ज केले जातात. युलू मुव्ह साठी रु. १०० तर युलू मिरॅकलसाठी रु. ५०० सुरक्षा ठेव म्हणून गुंतवावे लागते. ते तुम्हाला नंतर परतही मिळु शकते.
सध्या युलू बेंगलुरू, पुणे, मुंबई आणि भुवनेश्वर या ठिकाणी सेवा पुरवित आहे. १० मे पासून युलू मुंबई येथील पवई येथे कार्यरत झालेली आहे. उबेरने देखील युलूशी भागीदारी करून सेवा देण्यास सुरुवात केलेली आहे. आज युलूच्या ५०० ई बाईक्स तसेच ४५०० सायकल सेवा देण्यास तत्पर आहेत. २ वर्षांच्या या स्टार्टअपला जवळपास ७ मिलिअन अमेरिकी डॉलर्स गुंतवणूक स्वरूपात मिळालेले आहेत.
दिनेश कुडचे
Software engineer, tech enthusiast
security expert, fintech expert
writer @ दै. सकाळ, पुण्यनगरी
Director @ Technowell Web Solutions
_
संकलन
उद्योजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील