‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
तंत्रज्ञानाचा आवाका हा दिवसेंदिवस वाढतच आहे. या बदलानुसार दैनंदिन जीवनही तितक्याच वेगाने बदलतेय. तंत्रज्ञान काही अंशी बाधक जरी असले तरीदेखील त्याचे फायदे हे खुप आहेत. तंत्रज्ञानाची ही जोड सर्वच क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय ठरतेय जसे की शैक्षणिक, वित्त, शेती, परिपूर्ण गरजा, संप्रेषण आणि दळणवळण..!
शिक्षण पद्धतीत बदल हे फार गरजेचे आहेत. आजच्या या युगात, व्यावहारिक पद्धतीचे शिक्षण देणे अनिवार्य झाले आहे. आपण एक उदाहरण पाहू. समजा एक संस्था आपणांस शिष्यवृत्ती स्वरूपात काही रक्कम देण्यास तयार आहेत. पर्याय फक्त दोन. पर्याय एक : १२ कोटी रुपये – एकाच वेळी, एकाच व्यवहारात आणि फक्त एकदाच. पर्याय दोन : ६ लाख रुपये – प्रति महिना, आयुष्यभर. तर यापैकी आपण कोणता पर्याय निवडाल? वित्त आणि तत्वज्ञान क्षेत्रातल्या तज्ञ मंडळींनी याबाबत ऑनलाईन सर्व्हे केला. यामध्ये जवळपास ६२% लोक पर्याय क्र. २ निवडलेत. पण ज्यावेळी आपण आकडेमोड करतो त्यावेळी आपणास असे दिसून येते की आज बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉजिट्सना एका वर्षास ६ ते ६.८०% इतके व्याजदर मिळते. जर आपण १२ कोटी रुपये घेऊन ते गुंतवलेत तर रिकरिंग स्वरूपात जवळपास दरमहा रुपये ६ लाख इतकी रक्कम मिळते. शिवाय १२ कोटी रुपये सुरक्षित..! हा एक उदाहरणासाठी घेतलेला पर्याय आहे. म्युच्युअल फंड किंवा बाजारात असणारे अन्य पर्याय याप्रमाणे ते तुम्ही गुंतवु शकता.
शिक्षण हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. ते अशा व्यावहारिक स्वरूपात प्रत्येकापर्यंत पोहोचणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. म्हणून सध्या उपलब्ध असणारे तंत्रज्ञानयुक्त पर्याय आम्ही देत आहोत. ऑनलाईन शिक्षणपद्धती खूप प्रभावशाली आहे. परंतु लेखाची / व्हिडिओची विश्वासार्हता पाहणे खूप महत्वाचे आहे.
१. डुओलिंगो :
एखादी नवीन भाषा शिकायची असल्यास हे अँप आवर्जुन वापरा. हे अँप आणि संसंकेस्थळ अगदी विनामुल्य आहे. या अँपमध्ये वेगवेगळ्या २४ भाषांमध्ये ८५ कोर्सेस उपलब्ध आहेत. या अँपचे जवळपास ३० कोटीहुन अधिक वापरकर्ते आहेत. यामध्ये आपण स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, जॅपनीज, इटालियन, कोरियन, चायनीज, रशियन, तुर्किश, हिंदी, आयरिश, डॅनिश अशा बऱ्याच भाषा शिकु शकता. शाळांसाठी डुओलिंगोने वैशिष्ट्यपुर्ण सुविधा दिल्या आहेत. यामध्ये शिक्षक ऑनलाईन क्लास, सराव चाचण्या घेऊ शकतात. विद्यार्थ्यांची प्रगती पाहू शकतात. २०१२ च्या एका अभ्यासानुसार, स्पॅनिश भाषा ही प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकण्यापेक्षा अँपमध्ये शिकणे फार परिणामकारक आहे.
२. मेमोरॅडो :
आजकाल प्रत्येक क्षेत्रात योग्यता चाचण्यांचा समावेश असतोच. अशा परिक्षांमध्ये बुध्दिचा कस लागतो. एखादी गोष्ट ज्यावेळी तुमच्या मेंदुवर वारंवार परिणाम करते त्याप्रमाणे ते बदल मेंदु स्वीकारत असतो. या गेममुळे तुमचा उजवा आणि डावा मेंदु अधिक कार्यक्षम होतो. वैज्ञानिक आधार समोर ठेऊन जवळपास २०हुन अधिक गेम्स यात समावेश केलेल्या आहेत. यामुळे आपली निर्णयक्षमता, संज्ञानात्मक नियंत्रण, संप्रेषण, ब्रेन कोशंट, वैचारिक प्रगल्भता, एकाग्रता आदींमध्ये विकास होण्यास मदत होते. ३९ देशांतुन १० लाखाहून अधिक लोक या गेमद्वारे अभ्यास करतात. यामुळे गणित, बुद्धिमत्ता चाचणी यासारखे विषय सहज आकलन होतात. कंपनीच्यामते, हे अँप वापरल्याने ७६% मेंदुचा विकास होतो.
३. क्लासडोजो :
क्लासडोजोच्या माध्यमातून तुम्ही ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ स्वरूपात शिकू शकता. यामध्ये शिक्षक, मुले आणि पालक एकत्रित संवाद करू शकतात. यामध्ये मुलं शिक्षकांना प्रश्न विचारू शकता, त्याप्रमाणे शिक्षक त्यांना मार्गदर्शन करू शकतात आणि पालक या सर्व घडामोडी, पाल्याची प्रगती पाहु शकतात. अमेरिकेत ९५% शाळा, १८० हुन अधिक देशांमधील लोक हे अँप वापरतात. ३५ भाषांमध्ये आपले संवाद भाषांतरित केले जातात.
४. सायन्स ३६० :
नॅशनल सायन्स फौंडेशन यांनी विकसित केलेलं हे अँप असून या अँप मध्ये विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना, अभियांत्रिकी फोटो आणि लहान मुलांना समजतील अशा व्हिडिओज स्वरूपात मांडल्या आहेत. यावरील सर्व माहिती ही विश्वासार्ह असुन प्रत्येक आठवड्याला नवीन माहिती अपडेट केली जाते. जगभरातील वेगवेगळ्या शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करून या अँपमार्फत माहिती पुरविली जाते. मुलांना ३६० अंशात कोणताही फोटो पाहता येतो.
५. युडेमी :
२०१० साली चालु केलेलं हे संकेतस्थळ आज जगभरात वापरलं जातं. या प्लॅटफॉर्मवर आपण आपले कौशल्य दाखवून शिकवूही शकतो शिवाय त्यातून पैसेही मिळवू शकतो. इथे आपण वेगवेगळे सर्टिफिकेशन कोर्सेस देखील करू शकता. आज या ठिकाणी १०,००० हुन अधिक शैक्षणिक कोर्सेस उपलब्ध आहेत. इथे आपण व्हिडिओज, स्लाईडशोज, पीडीएफ, ऑडिओ, झिप, फाईल्स अपलोड करून कोर्स बनवू शकता. कोणताही कोर्स केव्हाही, कमी वेळेत, कमी खर्चामध्ये आपण शिकु शकतो.
६. खान अकॅडमी :
‘मुलांना मोफत शिकता यावं ते पण कुठूनही !’ हा दृष्टिकोन मनात घेऊन अमेरिकास्थित व्यावसायिक सलमान खान यांनी खान अकॅडमीची सुरुवात केली. या संकेतस्थळावर गणित, हिंदी, विज्ञान, तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, कला, अर्थशास्त्र, वित्तशास्त्र अगदी सहजगत्या शिकु शकता. स्टॅनफर्डमधील ६५% मुले हे संकेतस्थळ अभ्यासासाठी वापरतात. या संकेतस्थळावर ५७% मुलं ही जगातील प्रतिष्ठित विद्यापीठातील आहेत.
७. हॅलो इंग्लिश :
इंग्रजी लिहिणं आणि वाचणं फारच कठीण, असं बोललं जातं. पण ‘हॅलो इंग्लिश’ या संकेतस्थळाने हे काम अगदी सोप्प केलय. वेगवेगळ्या मॉड्युल्सचा वापर करून इंग्रजी शिकता येते. ४७५ धड्यांच्या माध्यमातुन इंग्रजी भाषेची अगदी सोप्या भाषेत मांडणी केली आहे. यामुळे इंग्रजी वाचणे, लिहिणे, बोलणे, ऐकणे शक्य होते. २२ भाषांमध्ये इंग्रजीचे शब्द भाषांतरित केले आहेत. २०१७ मध्ये गुगलने ‘नंबर ३ – एज्युकेशनल अँप’ म्हणून या अँप ला पुरस्कार घोषित केला आहे.
८. कोरा :
कोरा हे एक प्रश्नोत्तर व्यासपीठ असून इथे आपणाला वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. आपण आपले प्रश्न मांडू शकतो. त्या विषयातील जाणकार मंडळी त्या विषयावर आपले मत उत्तर स्वरूपात व्यक्त करतात. काही प्रश्न हे संवादातूनच सुटत असतात. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर ज्या लोकांना एखाद्या गोष्टीचे कुतूहल आहे, त्या गोष्टींबद्दल अधिकाधिक माहिती सहजरित्या मिळून जाते. यामध्ये आपण एकमेकांना मदत करून वेगवेगळे बॅजेस मिळवु शकता. ‘ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते’ याची प्रचिती या संकेतस्थळावर तसेच अँपवर अनुभवास येते.
९. टेक्नोएग्झाम :
२०१० पासून कार्यरत असणारे हे संकेतस्थळ विविध सुविधांनी बनलेले आहे. संकेतस्थळ, अँड्रॉइड अँप, आयओएस अँप च्या माध्यमातून विविध विषयांची माहिती घेऊ शकता. एखादा प्रश्न सुटत नसेल तर प्रत्यक्ष ग्राहक सेवा केंद्राशी फोनवर समस्या मांडू शकता. सध्या मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषेत सेवा पुरविली जाते. व्हाट्सअँपच्या माध्यमातून आपल्या आवडीच्या विषयांवर माहिती, अपडेट्स पुरविले जातात. कोणत्याही स्वरूपाची फिज आकारली जात नाही.
१०. सोशल मीडिया :
सोशल मीडियाचा वापर फक्त पोस्ट टाकणे आणि लाईक करणे यासाठीच होतो असं नाही. याचा योग्य ज्ञानासाठी वापर केल्यास यापेक्षा प्रभावी माध्यम कोणतेच नाही. या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं इथे आपल्याला भेटतात. ते त्यांचे मत, विचार, भविष्यातील योजना शेअर करत असतात. यातून आपल्याला नवनवीन माहिती प्रत्यक्ष स्वरूपात मिळुन जाते. अशा लोकांना फॉलो करणं फायदेशीर ठरते.
युट्युबवर आपल्याला विविध चॅनेल्स मिळतात. आपल्या आवडीचा विषय सर्च करा. त्या विषयाप्रमाणे आपल्याला अनेक चॅनेल्सचे व्हिडिओज दाखवले जातील. त्यातील निवडक चॅनेल्स सबस्क्राईब करा. उदाहरणार्थ: व्हॉट इफ चॅनेल, हिस्टरी चॅनेल, सायन्स टुडे, युट्युब किड्स, हाशिम अल-घैली यांचं विज्ञानावर आधारित रोचक चॅनेल, इन्सायडर, ब्राईट साईड, इसरो, नासा, स्वयम, गुगल फॉर एज्युकेशन, फाईव्ह मिनिट्स क्राफ्ट्स. अशा चॅनेलवर योग्य माहिती आपणास विनामुल्य मिळुन जाते. व्हिडिओ कोण मांडत आहे यावर विश्वासार्हता अवलंबुन असते. शक्यतो ‘व्हेरिफाइड’ चॅनेल्सना सबस्क्राईब करा.
ट्विटरवर आपल्याला जगतातील मोठ्या पदावरील लोक भेटतात. हा विश्वासार्ह प्लॅटफॉर्म म्हणुन ओळखला जातो. इथे आपल्या आवडीच्या लोकांना फॉलो करा. त्यांचे अपडेट्स मिळत राहतील. उदाहरणार्थ: स्पेक्टॅटर इंडेक्स, ब्लूमबर्ग, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, टाइम, वाला अफशर, इंडिया मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट, ब्लूमबर्गक्विन्ट, कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी, स्टॅटिस्टा, सीबी इन्साईट्स. आपल्या आवडीच्या क्षेत्रानुसार आपलं नेटवर्क बनवा. प्रत्यक्ष अशा लोकांना भेटा. विचारांची देवाणघेवाण करा. नवी संकल्पना समजुन घ्या.
फेसबुक सुद्धा फक्त गप्पा मारण्यासाठी नसून इथेही खूप काही ज्ञान मिळत असते. कित्येक चांगले पेजेस अकाउंट्स आपल्याला विविध माहिती नेहमीच देत असतात. यातून आपले ज्ञान वाढण्यास नेहमीच मदत होत अली आहे.
बदलते तंत्रज्ञान शिक्षणपद्धतींना घेऊन येत आहे. इथे तुम्हाला शिकण्याचे कोणतेही बंधन नाही. येत्या काळात हे तंत्रज्ञान आणखी प्रगत होऊन कदाचित संपूर्ण शिक्षण पद्धतच बदलून टाकू शकते.
दिनेश कुडचे
Software engineer, tech enthusiast
security expert, fintech expert
writer @ दै. सकाळ, पुण्यनगरी
Director @ Technowell Web Solutions
_
संकलन
उद्योजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील