निम्मे उत्पन्न बँकांचे हफ्ते फेडण्यासाठी खर्च करायचे, मग कमवायचं कशासाठी?


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

नवीन लग्न झालं
दोघांचा मिळून महिन्याला ऐंशी नव्वद हजार रुपये पगार घरात येतो.
मग शहरात एका चांगल्या ठिकाणी चाळीस पन्नास लाखाचा फ्लॅट घेतला
महिन्याला तीस चाळीस हजार हफ्ता सुरु झाला
मेंटेनन्स तीन हजार रुपये वेगळा
तीन वर्षांनी दोघांचाही पगार चांगलाच वाढला
दोघांची मिळून पगारवाढ महिन्याला सव्वा लाखाच्या आसपास झाली
आता येणारा पैसा वाढला म्हटल्यावर खर्च व्हायला नको?
मग आता त्यांनी जवळच्याच परिसरात ऐंशी नव्वद लाखाचा फ्लॅट घेतला
आणि सत्तर हजार रुपये हफ्ता सुरु झाला. मेंटेनन्स पाच हजार रुपये वेगळा.

म्हणजे पूर्वीही उत्पन्नाच्या ५०% खर्च घरासाठी व्हायचा, आताही ५०% च खर्च होतोय.
मग फायदा काय कमवून? कमवायचं फक्त हफ्ते फेडण्यासाठी?
उत्पन्नातील ५०% घराचे हफ्ते, १०% गाडीचे हफ्ते… म्हणजे वर्षातील ६०% दिवस ते बँकेचे हफ्ते फेडण्यासाठी काम करत आहेत.

दोनीही फ्लॅट सारख्याच एरिया चे, फक्त एक साध्या (पण तरीही एकदम चांगल्या सुटसुटीत) सोसायटीत आणि दुसरा एका नवीन आणि नामांकित सोसायटीत.
एखाद्याची हौस असू शकते महागड्या वस्तू घेण्याची… नक्कीच घ्यावी..
पण ती कोणती ?
घर होतंच की. दिवसातील १० तास त्या घरात राहायचंय नाहीये, रात्री फक्त झोपण्यासाठी ते वापरलं जातंय…
त्यासाठी आणखी महिन्याला तीस चाळीस हजार खर्च करण्याची गरज काय आहे ?
त्यापेक्षा तोच पैसा इतर कामांसाठी खर्च करून तुम्ही जगण्याचे स्टॅंडर्ड उंचावू शकता.
आणि तोच पैसा गुंतवणुकीसाठी वापरला तरी तो वर्षाअंती दोन तीन लाख रुपये होतो.
तीन लाख रुपये दरवर्षी जर दहा वर्ष वाचत गेले तर ते तीस लाख रुपये होतात. आणि ते जर चांगल्या ठिकाणी गुंतवलेला असतील तर तेच दोन तीन कोटी होऊ शकतात.
दोन वर्षीच्या बचतीमधे शहराच्या आउटसाइडला चांगला प्लॉट मिळू शकतो. तो प्लॉट दहा वर्षांनी किमान १० पट परतावा देऊ शकतो.
एखादे शॉप विकत घेऊन ते भाड्याने दिले तर महिन्याला आठ दहा हजार उत्पन्न फिक्स सुरु होऊ शकते. त्यातून ८०% हफ्त्यात गेला तरी परवडते. कारण शॉप ची किंमत दरवर्षी वाढत आहे.
दोन तीन वर्षाच्या बचतीतून शहरातील एखाद्या दुसऱ्या भागात कमी किमतीचा फ्लॅट घेतला तर तो भाड्याने देऊन महिन्याला सात आठ हजार मिळू शकतात. फ्लॅट ची किंमत वाढत राहील आणि महिन्याला थोडेफार उत्पन्नही देत राहील.
आपल्याला नको तिथे खर्च करण्याची भारी हौस आहे. नक्कीच करावा.
पण कुठे?
एखाद्याचं म्हणणं असेल मी मिळतंय तेवढ्यात समाधानी आहे. चांगलं आहे कि. पण म्हणून डेड इन्व्हेस्टमेंट मध्ये का खर्च करावा ?
त्यापेक्षा त्याच पैशातून तुम्ही अख्ख जग फिरू शकता. पण त्यासाठी वेळ हवा ना? तोच नाहीये आपल्याकडे.

मी असं म्हणत नाहीये कि फ्लॅट घेणं वाईट आहे, मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय कि उत्पन्नातील किती टक्के कशावर खर्च करायला पाहिजे याच आपण नियोजन करत नाही आहोत. एखाद्या गुंतवणुकीतून परतावा मिळणार असेल तर त्यासाठी कर्ज घेण्यात काहीच हरकत नाही, पण ज्यातून काहीच परतावा मिळणार नाहीये त्यासाठी लाखोंचे कर्ज काढून त्याचे २० वर्ष हफ्ते फेडण्यात कुठला शहाणपणा ?

एक साधा नियम ठरवून घ्यायला हवा…
पाहिलं उत्पन्न जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी वापरायचं
त्या गुंतवणुकीतून जे दुसरं उत्पन्न येईल त्यातील निम्म खर्च करण्यासाठी वापरा आणि निम्म गुंतवणुकीसाठी.
आणि त्या गुंतवणुकीतून जे तिसरं उत्पन्न येईल तो वाट्टेल तिथे कुठेही वापरा…
तुमचा आर्थिक पॅटर्न कुठेही गडबडणार नाही.
कारण उत्पन्नाचा मूळ स्रोत तुम्ही फक्त गुंतवणुकीसाठीच वापरात आहात.
तो समजा बंद झाला तरी तुम्ही ठप्प होणार नाहीत
तुमचा दुसरा उत्पन्नाचा स्रोत हा पहिला होईल
तिसरा स्रोत दुसऱ्या स्थानी जाईल
आणि पुन्हा एक स्रोत तयार करून तुम्ही त्यातून येणाऱ्या उत्पन्नाचा वापर मनासारखा करू शकता.

साधं सोपं लक्षात घ्या
आजही आपण दहा वर्षांपूर्वी हे करू शकत होतो का याचा विचार केला तर उत्तर हो येतं.
आता पुढच्या दहा वर्षांनी आपण हे दहा वर्षांपूर्वी करू शकत होतो असा विचार करण्याची वेळ येऊ देऊ नका.
मला आत्ताही याच वाईट वाटतं कि पंधरा वर्षांपूर्वी मला गुंतवणुकीच मार्गदर्शन करण्यासाठी कुणी का नव्हतं? हे का लक्षात आलं नाही? तेव्हा गुंतवणुकीच्या मागे लागलो असतो तर आत्तापर्यंत काही लाखांची संपत्तीमधे वाढ केली असती.
तुमची आत्ताची गुंतवणूक दहा वीस वर्षांनी तुमच्या पुढच्या पिढीसाठी कामी येणार आहे.
त्यांना रोख पैसा जास्त देऊ नका पण संपत्ती देण्यात कमी पडू नका

अर्थसाक्षर व्हा…
श्रीमंत व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!