‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
मागच्या काही वर्षात हायवेच्या बाजूला सुरु झालेल्या हॉटेल्स चे निरीक्षण केले तर ज्यांनी आपल्या हॉटेल ला FoodMall दिलेले आहे ते एक तर पूर्णपणे ठप्प झालेले आहेत किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याचे कारण FoodMall या नावाची बिघडलेली प्रतिमा हे आहे.
याला सुरुवात झाली पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेच्या फूडमॉल पासून. एक्सप्रेस हायवेवर सरकारच्या कृपेने या हॉटेल ची मोनोपॉली तयार केली गेली. हायवेने जाणाऱ्या प्रवाशांना जेवण्यासाठी हेच एकमात्र ठिकाण उपलब्ध केले गेले. आता मोनोपॉली म्हटली कि लूट आलीच. प्रचंड महागडे खाद्यपदार्थ हीच या FoodMall ची ओळख झाली. एक्सप्रेस हायवेने जाणारा प्रत्येक प्रवाशी अब्जाधीशच असतो अशा प्रकारे इथल्या खाद्यपदार्थांच्या किमती ठेवल्या गेल्या. बर, किमती खूप म्हणून स्वच्छता, गुणवत्ता असावी तर तेही नाही. याचा जनतेच्या मनावर चांगलाच विपरीत परिणाम झाला. सगळे फूडमॉल महागडेच असतात अशीच प्रतिमा निर्माण व्हायला लागली.
यानंतर काहींनी याच धर्तीवर राज्यातील इतर हायवेच्या बाजूने फूडमॉल उभारायला सुरुवात केली. एक्सप्रेस हायवेला महागडे खाद्यपदार्थ खपतात म्हणजे इथेही खपतील असा बऱ्याच जणांचा समज झाला. त्यांनी मग तोच कित्ता गिरवला. पण एक्सप्रेस हायवेला लोकांकडे पर्याय नाहीयेत, इथे भरपूर पर्याय आहेत हे कुणी लक्षत घेतलं नाही. आणि जवळजवळ सगळे फूडमॉल वर्षभरातच डबघाईला यायला लागले…
यामुळे लोकांच्या मनातील फूडमॉल शब्दाबद्दलची महागडी प्रतिमा आणखी घट्ट झाली
इतकं सगळं समोर असूनही अजूनही कित्येकांना FoodMall या शब्दाचं आकर्षण सुटत नाहीये. अजूनही बरेच FoodMall उभे राहत आहेत. आणि आपल्यापेक्षा शेजारचा ढाबा जास्त जोमाने चालताना बघत आहेत.
फूडमॉल हा पूर्णपणे खराब झालेला ब्रँड झाला आहे. क्वचित एखाद दोन हॉटेल सोडले तर या नावाचे सर्व हॉटेल्स ठप्प झाले आहेत. बरेच फूडमॉल फक्त पैसे गुंतवलेत म्हणून चालू ठेवायचे अशा प्रकारे चालू आहेत. तुम्ही हॉटेलमध्ये कितीही काहीही चांगलं देत असाल तरी ते फूडमॉल नाव बघूनच लोक गाडी थांबवत नाहीत.
त्यामुळे शक्यतो हायवेच्या बाजूने एखादे हॉटेल सुरु करण्याच्या विचारात असाल तर त्याला फूडमॉल नाव देऊ नका… त्यापेक्षा ढाबा शब्द प्रवाशांना जास्त आकर्षित करेल.
व्यवसाय साक्षर व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील