बंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

सध्या ऑटोमोबाईल सेक्टर मधे आलेल्या मंदीमुळे सर्वच ऑटोमोबाईल कंपन्यांचे शेअर्स चांगलेच घासलेले आहेत. देशातील जवळजवळ ३०० च्या आसपास शोरूम्स बंद झाले आहेत. ३०० आकडा तसा खूप मोठा वाटतो. पण देशात २६००० शोरूम्सपैकी फक्त ३०० शोरुमस बंद झालेत. म्हणजे फक्त १% शोरूम्स बंद पडलेत. त्यामुळे त्यात विशेष काही नाही. एवढा चढ उतार होतंच असतो.

शोरूम बंद पाडण्याचे कारण गाड्यांची कमी झालेली विक्री असे दिले जात आहे. पण खरंच एवढे एकंच कारण आहे का? विक्री कमी झाली आहे, ठप्प थोडी झालीये? मग शोरूम बंद करण्याची वेळ का यावी ? मार्केटमधील आर्थिक तंगी, दुष्काळ अशा काही कारणांमुळे विक्री मंदावणे हे नेहमीचेच आहे. शोरूम बंद पाडण्याचे याव्यतिरिक्त काहीतरी कारण असावं ना?

असो, आपला विषय विक्रीचा नाहीये. आपण मुद्द्याकडे येऊ. सध्या कार्स च्या शोरूम्स चा मुद्दा चर्चेत आहे, म्हणून त्यावरच बोलू. इथे मुद्दा आहे मोठमोठे शोरूम्स बंद का पडत आहेत याचा. शोरूम बंद पाडण्याचे मुख्य कारण फक्त मंदावलेली विक्री नसून शोरूमचा अवाढव्य पसारा हे आहे. ऑटोमोबाईल शोरूम सुरु करण्यासाठी या कंपन्यांच्या प्रचंड अटी असतात. ३-४ हजार स्क्वे. फु. चे शोरूम पाहिजे, १० हजार स्क्वे. फु. चे वर्कशॉप पाहिजे, इच्छुकाने करोडोंचा खर्च केला पाहिजे. सुरुवातीला तर शहराच्या मुख्य भागातच शोरूम हवे असत. ते अशक्य झाल्यावर मग शहराच्या उपनगरात किंवा थोडेसे लांब पण ऍडजेस्ट केले जाऊ लागले. पण सेटअप चा खर्च मात्र तेवढाच राहिला. आणि दिवसेंदिवस वाढत चालला. मोठं शोरूम म्हणजे भारी कंपनी असा काहीसा लोकांचा समज असतो, त्यामुळे कंपन्यांनीसुद्धा तीच स्ट्रॅटेजि वापरली. अवाढव्य पसारा…

आता शोरूम साठी एवढी गुंतवणूक लागते म्हटल्यावर त्यासाठी पैशावालीच पार्टी पाहिजे. मग असे श्रीमंत लोक निवडले गेले. ऑटोमोबाईल शोरूमच आपल्याकडे प्रचंड आकर्षण आहे. गाड्या विकल्या जाणारच आहेत. आपण फक्त पैसे गोळा करायचं काम करायचं असा आपल्याकडे सामान्य समज आहे. माझही मत काही काळ असंच होतं. यामुळे ज्यांच्याकडे चांगला पैसा आहे अशांनी बळजबरी नको तिथे शोरूम सुरु केले. शोरूम भारी वाटावं म्हणून अनावश्यक स्ट्रक्चर उभारले गेले. प्रचंड मोठा पसारा उभारला गेला.

आता एवढा मोठा पसारा हॅण्डल करायचा म्हटल्यावर तेवढा खर्चही आला. पण हा खर्च भागवायचा तर तेवढ्या गाड्या विकल्या गेल्या पाहिजे. ते प्रत्येक महिन्यात शक्य नाही. वर्षातून तीन चार महिने विक्री प्रचंड मंदावलेली असते.तोटा होतो. पण इतर महिन्यांच्या नफ्यातून तो तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. पण इतर महिन्यात नफा व्हायला त्या महिन्यात तरी चांगली विक्री असावी ना?

आता हे जे शोरूम बंद पडलेत ते कोणत्या कंपन्यांचे आहेत हे जरा पाहिलं तर लक्षात येईल कि या कंपन्यांची विक्री मुळातच खूप कमी आहे. त्यामुळे जराश्या मंदीने यांचे कंबरडे मोडणार हे निश्चित होते. मारुती, ह्युंदाई, महिंद्रा, टाटा सारख्या कंपन्यांचे शोरूम्स लवकर बंद नाही पडत. कारण यांचा ग्राहक वर्ग प्रचंड आहे. मंदीतही किमान विक्री चालू असते.त्यामुळे खर्च आणि उत्पन्न यांचं नियोजन बरोब्बर जुळतं. बंद पडलेले बहुतेक शोरूम्स हे मागील काही वर्षात देशात नव्याने आलेल्या कंपन्यांचे आहेत. या कंपन्यांनीच प्रेस्टिज च्या नावाखाली डीलर्स ना अवाढव्य पसरे उभारण्यासाठी प्रवृत्त केलं. पाच गाड्यांसाठी पाच हजार स्क्वे. फु. शोरूम ची गरजच काय आहे? नगरमधील अशा दोन कंपन्यांचे शोरूम दोन वर्षांपूर्वीच बंद पडले होते. या तीनशेमधे कदाचित तेही असतील. या कंपन्या जेव्हा भारतात आल्या तेव्हा देशातील आर्थिक स्थिती त्याच्या सर्वोच्च स्तरावर होती. हि स्थिती कामस्वरूपी नसते. कधी ना काही मार्केट खाली येणारच होतं. ते खाली आलं…

या कंपन्यांचे शोरूम चालक भपक्यावर गेले होते. अमेरिकेतील, युरोप मधील टॉप ची कंपनी म्हणजे आपल्याकडेही धुमाकूळ घालेल. पण आपल्या ग्राहकांची मानसिकता वेगळीच आहे. त्यामुळे या कंपन्यांना अपेक्षेप्रमाणे ग्राहकांचा प्रतिसाद कधी मिळालाच नाही. गाड्यांचा मागच्या दहा वर्षांचा मासिक विक्रीचा चार्ट पहिला तर हे लगेच लक्षात येईल. यांना कधी अपेक्षित ग्राहक मिळालाच नाही. कित्येक नामांकित कंपन्या आजपर्यंत महिन्याला सरासरी हजार पेक्षा जास्त गाड्या विकू शकल्या नाहीयेत.

आधीच विक्री खूप नाही. अवाढव्य खर्च कसाबसा भागवून बऱ्यापैकी शिल्लक राहायची. पण मागच्या वर्षभरात दुष्काळाने ती विक्रीसुद्धा कमी झाली. आता शिल्लकही राहीनाशी झाली. तोट्यात शोरूम चालवायला सुद्धा मर्यादा आहेत. बाहेरून पैसा किती काळ टाकायचा ? एक स्टेज अशी अली कि शोरूम बंद करणे हाच उत्तम मार्ग शिल्लक राहिला. आणि त्यासाठी सर्वोत्तम काळ फेब्रुवारी ते जून असतो. या काळात विक्री मंदावत असते. याच काळात एक एक करत शोरूम बंद पडत गेले…

खर्च, उत्पन्न, नफा कसलाही हिशोब न जुळवता व्यवसाय सुरु केले कि हे होतंच. जर हेच शोरूम फक्त ८००-१००० स्क्वे. फु. चेच असते तर? यांचा मेंटेनन्स खर्च आरामात निघाला असता. महिन्याला दोन तीन गाड्या विकल्या तरी तोटा होण्याची कुठलीही शक्यता राहिली नसती. शोरूम बंद करण्याची वेळच अली नसती. पीक सिझन मधे नफा, ऑफ सिझन मध्ये ना नफा ना तोटा… व्यवसायाचं आर्थिक गणित आपोआपच जुळलं असतं.

खरं तर एकूण शोरूम्स पैकी १% शोरूम्स बंद पडणे हि विशेष बाब नाही. जगभरातच मंदीचे सावट असताना आपल्याकडेही आपण वेगळी काही अपेक्षा ठेऊ शकत नाही. आपल्याकडेही काही चुका झाल्या आहेत. पण फक्त ऑटोमोबाईल कंपन्यांचेच शोरूम्स बंद पडले आहेत असं नाहीये. इतर क्षेत्रातील काही ब्रँड्स ची सुद्धा अशीच अवस्था आहे. मोठे शोरूम्स, अवाढव्य खर्च हेच तिथेही कारणीभूत ठरले आहे.

कदाचित याचा झालाच तर काही चांगला परिणाम येत्या काळात होऊ शकतो. किमान आता येत्या काळात तरी ब्रँड च्या प्रेस्टिज च्या नावाखाली मोठे अवाढव्य शोरूम्स हि संकल्पना मागे पडेल अशी अपेक्षा करूयात. कमीत कमी पसारा, कमीत कमी खर्च, पुरेसा ग्राहक, पीक सिझन मधे किमान नफा, ऑफ सिझन मधे ना नफा ना तोटा किंवा एखादा महिना तोटा, योग्य प्रकारे जुळणारे आर्थिक नियोजन, अशाच प्रकारे व्यवसायाचे नियोजन असावे असा आग्रह आता व्यावसायिकांनी धरायला हवा.

डोळे दिपवणारे उत्पन्नाचे आकडे ऐकून, भपक्यात वाहून जाऊन, काल्पनिक जगात रममाण होऊन, उगाच पैसे आहेत म्हणून लाखो करोडो रुपये गुंतवणे कधी ना कधी नुकसानकारकच ठरणार असते. त्यापेक्षा योग्य प्रकारे आर्थिक नियोजन केले तर दिसायला थोडा लहान का असेना पण तो व्यवसाय कायमस्वरूपी तुम्हाला साथ देणार असतो हे आपण लक्षात ठेवायला हवे.

सध्या ऑटोमोबाईल सेक्टर मधील कमी झालेल्या विक्रीचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. असुद्या. त्यांचं त्यांचं चालू द्या… आपण मात्र या विषयातील फक्त आर्थिक नियोजनाचा अभ्यास करणे जास्त श्रेयस्कर. कारण त्यावरच आपले व्यवसायातील यश ठरणार आहे.

(लहान सेटअप असणारे व्यवसाय हेच भविष्य असणार आहे. याबद्दलही लवकरच काहीतरी लिखाण होईल… तोपर्यंत लहान लहान सेटअप सध्या कशा प्रकारे नाव कमवत आहेत याचे निरीक्षण करत रहा)

व्यवसाय साक्षर व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

One thought on “बंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…

  1. Good article.
    I want to include that same situation nay be arrive for newly appointed pertol pumps. So please publish one article about future of petrol pumps against electric vehicle. So that people will able to take decision.
    Thanking you

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!