तुम्ही तुमच्या व्यवसायाचे मंदीच्या दृष्टिकोनातून आर्थिक नियोजन केले आहे का?


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

मंदी दरवर्षी येत असते… फक्त तिचं प्रमाण आणि कालावधी कमी जास्त असतो…

वर्षातून ३-४ महिने मंदीचे असतात. 
सरासरी दर तीन ते चार वर्षातून एकदा सहा ते आठ महिने मंदीचे असतात. 
सरासरी दर आठ ते दहा वर्षातून एकदा एका मोठ्या मंदीचा सामना करावा लागतो.

तुम्ही तुमच्या व्यवसायाचं मंदीच्या दृष्टिकोनातून नियोजन केलेलं आहे का?

एक उदाहरण पाहू.
हे उदाहरण असलं तरी जवळ जवळ सर्वच नवख्या उद्योजकांची अवस्था अशीच असते.

समजा माझ्या एका व्यवसायातून मला महिन्याला सरासरी पन्नास हजार रुपयाचं निव्वळ उत्पन्न मिळतं. आता मी त्यातील चाळीस हजार रुपये जर खर्च करत असेल तर माझ्याकडे महिन्याला सरासरी १० हजारच्या आसपास शिल्लक राहील. हा खर्च घरखर्च असेल, गाडीचे हफ्ते असतील, घराचे हफ्ते असतील, किंवा इतर काही खर्च असू शकतो. पण तो खर्च होतंच असेल तर राहणारी शिल्लक १० हजार पेक्षा जास्त नसेल. या शिलकीतली काही रक्कम एक दोन मोठ्या सणासुदीत किंवा कार्यक्रमात खर्च होत असेल… तरीही उत्तम चालू असल्यासारखं वाटतं.

पण वर्षातून तीन महिने मंदीच्या काळात माझं उत्पन्न एकदम कमी होतं. कधीकधी ते दहा वीस हजारपेक्षा जास्त नसतं. अशावेळी मागची शिल्लक कमी असते, उत्पन्न कमी झालेलं असतं पण खर्च मात्र काही कमी होत नाही. आता साहजिकच मी आर्थिक अडचणीत येतो. मग ककुठूनतरी पैशाची जमवाजमव कर, उधाऱ्या घे असं करून वेळ निभावून नेतो.

हि मंदी दोन चार महिन्यातच संपते आणि पुन्हा मार्केट सुरळीत होतं. मी पुन्हा नेहमीच्या कामात गुंततो. पुन्हा चांगलं उत्पन्न मिळायला लागतं. आणि मी मागचे चार महिने विसरून जातो.

पुन्हा पुढच्या वर्षी मंदीचा फेरा. पुन्हा तीच आर्थिक अडचण. पुन्हा मार्केट सुरळीत. मला वाटत ठीक आहे ना, तीन चार महिन्यात सगळं निस्तारतंय. पण या नादात शिल्लक काहीच उरलेली नाही हे मात्र मी विसरून जातो. आणि जर मोठी आर्थिक अडचण अली तर काय या प्रश्नच उत्तर माझ्याकडे नसतं.

आता तीन चार वर्षात एक मोठा मंदीचा फेरा येतो. सहा सात महिने म्हणावे असे व्यवहारच होत नाहीत. उत्पन्न मिळत नाही. अशावेळी व्यवसायाचा खर्च, घरखर्च कसा भागवायचा हा प्रश्न पडतो. पैसा शिल्लक नसतो. जर पैशाची जमावाजमव झाली तर ठीक नाहीतर व्यवसाय ठप्प करण्याची वेळ येते. यातही जी काही जमवाजमव केली आहे ती फेडण्यासाठी पुढचे आठ दहा महिन्याचे उत्पन्न खर्च होणार आहे हे माझ्या लक्षात येत नाही.

समजा यातूनही मी कसाबसा बाहेर निघालो. पुढचे दोन तीन वर्षे पुन्हा तसेच गेले. पण सवयीप्रमाणे इकडचा पैसा तिकडे, तिकडचा इकडे, फिरवाफिरवी करून कसाबसा टिकून राहिलो. आत दहा वर्षांनी मात्र मोठा मंदीचा फेरा येतो. वर्षभर पूर्ण मार्केट ठप्प असतं. आता मात्र माझ्याच्याने काहीच शक्य होणार नाहीये. एवढा काळ विना किंवा कमी उत्पन्नाच राहणे शक्य होत नाही. व्यवसायाचा खर्च आणि घरखर्च दोन्हीचाही मेळ साधने अवघड होऊन जाते. मागची शिल्लक खूप काही नसते. उधाऱ्या मिळणं अवघड होऊन जातं. ज्यांचे पेमेंट पेंडिंग आहे असे सप्लायर्स पाठपुरवठा सुरु करतात. ग्राहक मंदीचं कारण देऊन पेमेंट लांबवतात. मार्केटच डाऊन असल्यामुळे कुणाकडूनच म्हणावा असा आर्थिक आधार मिळत नाही. पगार देणंही मुश्किल होऊन जातं, आणि वर्षभर कळ काढणे शक्य होत नाही. अशावेळी व्यवसाय बंद करणे हाच एकमात्र माझ्याकडे पर्याय उरतो.

काहीजण यावर उपाय म्हणून व्याजाने पैसे उचलतात. तेवढं वर्ष निभावून जातं. पुढच्या वर्षांपासून मात्र व्याजाचे हफ्ते फेडता फेडता नाकीनऊ यायला लागत. दोन तीन वर्षात व्याजाचं ओझं झेलणं असहाय्य होत आणि मी पूर्णपणे संपतो….

बऱ्याच नवीन उद्योजकांना हि आपलीच स्टोरी आहे असं वाटत असेल… ते खरंही आहे… खरं तर हि तुमच्यापैकीच कित्येकांची स्टोरी आहे….

आजच अपयश हे मागील कित्येक चुकांचा एकत्रित परिणाम असतो. व्यवसायातल्या अपयशात, त्या ह्याच चुका असतात.

आपण आपल्या व्यवसायाचं आर्थिक नियोजन मंदीच्या दृष्टिकोनातून कधीच करत नाही. दर आठ महिन्यांनी येणाऱ्या लहान मंदीसाठी आपण मागच्या आठ महिन्यांतून काही पैसे बाजूला काढून ठेवत नाही. दर तीन वर्षांनी येणाऱ्या मंदीचा सामना करण्यासाठी आपण मागच्या तीन वर्षातून काही शिल्लक बाजूला काढून ठेवत नाही. दर दहा वर्षांनी येणाऱ्या मोठ्या मंदीचा सामना करण्यासठी आपण मागच्या दहा वर्षाच्या उत्पन्नातून एक मोठी रक्कम बाजूला कधीच काढून ठेवत नाही. आपल्याकडे नेहमी एक रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून रोखीच्या किंवा गुंतवणुकीच्या रूपात सांभाळून ठेवलेली असली पाहिजे. आणि हा फंड कधीही वापरायची वेळ येणार नाही अशाप्रकारे आपले नियोजन असले पाहिजे.

आपण उत्पन्नाचं नियोजन करतो, पण नुकसानीचं नियोजन करायला विसरतो. बरेच नवउद्योजक संपण्याचं हे एक मुख्य कारण आहे.
आर्थिक अडचण…. खरं तर ती आर्थिक अडचण नसते तर चुकलेलं आर्थिक नियोजन असतं.

यासाठी आपण महिन्याच्या उत्पन्नातून किमान २५% रक्कम लगेच कुठेतरी गुंतवली पाहिजे. FD करा, प्रॉपर्टी घ्या, शेअर्स घ्या, सोनं चांदी घ्या.. कुठेतरी तो पैसे गुंतवून ठेवा. तसेच उत्पनातील २५% रक्कम हि व्यवसायाच्या वाढीसाठी ठेवली पाहिजे. उरलेलं ५०% उत्पन्न हेच फक्त आपण उत्पन्न समजलं पाहिजे. हा वाचवलेला, गुंतवलेला पैसा आपल्याला या मंदीच्या काळात कमी येतो.

मंदीच्या काळात मोडून पडणारे बरेच व्यवसाय हे मुख्यत्वे पाच ते सात वर्षांच्या आतले असतात. मोठे, अनुभवी व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांना सुद्धा या मंदीचा फटका बसतो पण ते संपत नाहीत. कारण त्यांनी या मंदीच्या काळासाठी सुद्धा नियोजन करून ठेवलेलं असतं.

यातही काही हिशोब करायचे असतात. मंदीच्या काळात प्रॉपर्टीचे, शेअर्स चे भाव पडलेले असतात, तर सोन्याचे भाव वाढलेले असतात. FD काहीही झालं तरी वर्षाला ६-७% व्याज देत असते, त्यामुळे तो पैसा कोणत्याही सिझन मधे सुरक्षित असतो. त्यामुळं कोणत्याही एका ठिकाणी पैसे गुंतवून न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी पैसा गुंतवावा. गरजेच्या वेळी कशातून पैपैसा मोकळा करायचा याचे ऑप्शन आपल्याकडे असतात, आणि नुकसान होत नाही.

मार्केट कधीतरी डाऊन होणारच असतं. कधी वर, कधी खाली हा मार्केटचा नियम आहे. आपण दोन्ही नियामांना समान दर्जा दिला पाहिजे.

खरं तर सुगीच्या दिवसात सगळेच आर्थिक नियोजन चांगले करतात, पण व्यवसाय टिकवायचा, वाढवायचा असेल तर मंदीच्या काळात करायचे आर्थिक नियोजन आपल्याकडे तयार असले पाहिजे.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!