तुमचे सगळे प्रश्न सोडविणारा Lucky Dog


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

काही वर्षांपूर्वी नॅशनल जिओग्राफिक चॅनल वर ब्रेन गेम्स मधे एक एपिसोड पहिला होता. किमान १२-१३ वर्षे झाली असतील

ब्रेन गेम्स ची टीम पन्नास जणांना एका सर्व्हेसाठी निवडते. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात काही समस्या आहेत का, नैराश्य आहे का असे प्रश्न विचारले जातात. प्रत्येकाचं उत्तर हो असतं. कुणाला नैराश्य आलेलं असतं, कुणाच्या समस्या दूर होत नसतात, कुणाची मनासारखी कामे होत नसतात, प्रत्येकाच्या अशा वेगवेगळ्या समस्या असतात… मग या टीम मधील सदस्य त्या पन्नास जणांशी स्वतंत्रपणे चर्चा करतात. बोलता बोलता प्रत्येकाला ‘तुम्हाला अमुक एका गार्डन मधला लकी डॉग माहित आहे का? असा प्रश्न विचारतात. त्या गार्डन मधे एक कुत्र्याचा पुतळा आहे आणि त्या कुत्र्याच्या डोक्यावरून दररोज एकदा हात फिरविला कि तुमच्या समस्या दूर व्हायला मदत होते अशी आख्यायिका आहे म्हणून सांगतात. या लकी डॉग बद्दल कुणालाच माहिती नसते. मग हि टीम त्या पन्नास जणांना दररोज एकदा तरी त्या लकी डॉग च्या डोक्यावरून हात फिरवायला सांगते. आणि काही दिवसांनी पुन्हा भेट घेण्याचे ठरवते.

मग त्या पन्नासांतील प्रत्येक जण दररोज सकाळी कामावर जाताना आधी त्या गार्डन मधे जाऊन त्या लकी डॉग च्या डोक्यावर हात फिरवायला सुरुवात करतो.

महिनाभराने पुन्हा एकदा सर्वांना एकत्र बोलावले जाते. आणि लकी डॉग चा काही फायदा झाला का विचारले जाते. या लकी डॉग चा प्रत्येकाला फायदा झालेला असतो. प्रत्येकाची निराशा दूर झालेली असते, कामे व्हायला लागलेली असतात, नकारात्मकता दूर व्हायला लागलेली असते ,असे प्रत्येकाचे काही फायदे झालेले असतात. दररोज पहिल्यापेक्षा जास्त प्रसन्न वाटतं असं तर प्रत्येकजण म्हणतो… फक्त एका कुत्र्याच्या पुतळ्याच्या डोक्यावरून हात फिरविल्याने एवढा फरक पडतो यावर कुणाचा विश्वासच बसत नाही.

सगळ्यांचा फीडबॅक ऐकल्यानंतर ब्रेन गेम्स ची टीम त्यांना सांगते कि असा काही लकी डॉग अस्तित्वातच नाहीये. तुम्हाला भेटण्याआधी १५ दिवस आधी तो पुतळा आम्ही तिथे बसवला होता. त्याच्या डोक्यावरून हात फिरवल्यावर जीवनात बदल होतो हि निव्वळ थाप होती. हे ऐकल्यावर प्रत्येकालाच धक्का बसतो. हे कसं शक्य आहे, मला तर खूप फरक पडला, असं प्रत्येकजण म्हणायला लागतो.

मग त्यांना सांगितलं जातं कि तुम्हाला एकत्र बोलाविण्याचा उद्देशच सकारात्मक नकारात्मक विचारांचा सर्व्हे करण्याचा होता. तुम्ही आजपर्यंत आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींमुळे नकारात्मक मानसिकतेमधे होता. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधे नकारात्मक विचार दिसत होते. आणि त्याचा परिणाम तुमच्या विचारांवर होऊन तुम्ही निराशेत होता.

पण त्या लकी डॉग बद्दल सांगितल्यानंतर तुम्हाला निराशेतून बाहेर पडण्याची आशा वाटायला लागली. तुम्ही दररोज सकाळी त्याच्या डोक्यावरून हात फिरवताना यामुळे आजचा दिवस चांगला जाईल असा विचार करायला लागलात. त्यानंतर हळूहळू तुमच्या विचारांत सकारात्मकता निर्माण व्हायला लागली. यामुळे तुमची विचारक्षमता, कार्यक्षमता विकसित झाली. कामे सुरळीत व्हायला लागली. बरेचशे नसलेले प्रॉब्लेम जे फक्त तुमच्या नकारात्मक विचारांमुळे जिवंत होते ते कमी व्हायला लागले. समाजात वाईट गोष्टी आहेतच, पण तेवढ्याच चांगल्या गोष्टीही आहेत, तुम्ही नकळतपणे वाईटाला बाजूला सारून चांगल्या गोष्टींकडे बघायला लागलात… आणि हळूहळू तुम्हाला प्रसन्न वाटायला लागले. तुमच्या विचारात सकारात्मकता यायला लागली. आणि महिन्याभरातच तुमच्यात हा मोठा बदल घडून आला.

हे सगळं त्या लकी डॉग ने नाही केलं, तर तुमच्याच विचारांनी केलं. आणि आता आम्ही तो लकी डॉग चा पुतळा काढून टाकणार आहोत. हे मात्र त्या लोकांना काही पटत नाही. आमच्यात झालेला बदल हा आमच्या विचारांमुळेच झालाच हे मान्य पण तो पुतळा काही हलवू नका, त्यामुळे आमच्या विचारात बदल झाले आहेत, तो प्रातिनिधिक असला तरी आमच्यासाठी महत्वाचा आहे, त्याला आहे तिथेच राहू द्या असे सगळे विनंती करतात. बरेच जण तर खरं माहित झालं असलं तरी मी दररोज त्या पुतळ्याच्या डोक्यावर हात फिरविणारच असे सांगतात.

पण ब्रेन गेम्स ची टीम तो पुतळा हलवते. कारण तो जर तसाच ठेवला तर लोकांचं अवलंबित्व पुन्हा वाढेल. ते सकारात्मक होण्यासाठी सुद्धा इतर कुणावर अवलंबून राहायला लागतील. आणि हे त्यांच्यासाठीच घातक ठरेल. म्हणून तो पुतळा हटवला जातो…

माझ्या विचारांवर खूप मोठा आणि खोलवर परिणाम करणारा हा एपिसोड होता.

तुमच्या आसपास घडणाऱ्या घटना तुमच्या विचारांवर परिणाम करत नाहीत, तर तुम्ही त्या घटनांकडे कशा दृष्टिकोनातून पाहता यावर तुमचे विचार ठरतात.
तुम्हाला प्रसन्न राहायचं, कि निराश. तुम्हाला सकारात्मक राहायचं कि नकारात्मक. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधे चुकीचंच काही शोधायचंय, कि चांगल्या गोष्टी पाहायच्या आहेत… हे सगळं काही तुमच्यावर डिपेंड आहे, बाहेरच्या पपरिस्थितीवर नाही….

माझा एक व्यावसायिक भागीदार, जो लहानपणापासून मित्र होता, त्याला माझा सतत राग यायचा. मला व्यवसायाचं एवढा टेन्शन असताना तू रिलॅक्स कसा राहू शकतोस असा त्याचा प्रश्न असायचा. मला रात्र रात्र झोप लागत नाही आणि तू निवांत असतो असा त्याचा नेहमीच आक्षेप असायचा. खरं तर कामाचा ताण दोघांनाही समान असायचा, पण त्या तणावाकडे बघण्याचा आम्हा दोघांचा दृष्टिकोन वेगवेगळा असायचा. याचा परिणाम शेवटी भागीदारी संपण्यात झाला.

असो…
मी काय मोटिव्हेशनल स्पीकर नाहीये. जे वाटतं लिहितो. इथंही जेवढं सुचलं तेवढं लिहिलं. आणि तसंही खूप काही सांगण्यापेक्षा हि लकी डॉग ची गोष्ट तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला पुरेशी आहे असं मला वाटतं. तुमच्या मनात जर काही निराशा नकारात्मकता असेल तर ती तुमच्या विचारांची देणं आहे, बाहेरच्या परिस्थितीची नाही, एवढं मात्र मी सांगू शकतो आणि तुमचे सकारत्मक विचार, प्रसन्न विचार तुमच्या व्यवसायावर खूप चांगला परिणाम घडवून आणतात हे मी खात्रीने सांगू शकतो.

माहितीकरीता : पाळीव प्राणी आपला तणाव कमी करण्याचे काम करतात. त्यातही कुत्रा आणि मासे यांच्या सांगतीत माणसाच्या मनावरील ताण खूप हलका होत असतो.

सकारात्मक व्हा…
व्यवसाय साक्षर व्हा…

_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!