मोठी गुंतवणूक म्हणजे मोठा बिझनेस नाही. मोठी उलाढाल म्हणजे मोठा बिझनेस….


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

आपल्याकडे नवीन उद्योजकांची यात खूप मोठी गल्लत होते. मोठी गुंतवणूक केली तरच आपला व्यवसाय मोठा हा एक मोठा गैरसमज यांच्यात असतो. आणि लोकही आपल्याला जरा भाव देतील हीसुद्धा मानसिकता असतेच. याच विचाराने अनुभव नसताना खूप मोठी रक्कम व्यवसायात गुंतवली जाते…

अनुभव नाही, मार्केटचा अंदाज नाही, सेल्स चं स्किल नाही… अशावेळी त्या गुंतवणुकीच्या प्रमाणात व्यवसाय होणं शक्य होत नाही. मग व्यवसायाला दोष दिला जातो. घरच्यांकडूनही आधीच खूप मोठी रक्कम गुंतवली आहे आता आणखी काही मिळणार नाही हे स्पष्टपणे सांगितलं जातं…. मग आपला व्यवसाय चुकला आहे असं वाटायला लागतं…

मोठ्या गुंतवणुकीपेक्षा उलाढाल महत्वाची असते. आणि सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे ROI. म्हणजे गुंतवणुकीवरील परतावा. हा परतावा किमान ३३% वर्षाला असायला हवा. मी मागे फ्रॅंचाईजी संदर्भातील एका आर्टिकल मधे याबद्दल बोललो आहे.
मोठ्या गुंतवणुकीच्या प्रजेक्ट मध्ये हा ROI आपल्याला CA च्या प्रोजेक्ट रिपोर्ट मधे दिसतो, पण प्रत्यक्षात कुठेच नसतो…. अगदी महिन्याला हातात काही रक्कम येत असली तरी ROI कमी असेल तर तो व्यवसाय नफ्यात आहे असे म्हणता येणार नाही.

साधा हिशोब करूयात… एखाद्याने वीस लाख गुंतवणूक करून एखादा मोठा व्यवसाय सुरु केलाय आहे महिन्याला ५० हजार रुपये कमावतोय… याचवेळी त्याच्याच सोबतीने त्याच्याच शेजारी एकाने चार लाखातच त्याच प्रकारचा पण लहानसा व्यवसाय सुरु केला आहे आणि तो त्यावर महिन्याला वीस एक हजार रुपये सहज कमावतोय…. कोण भारी ?
वीस हजार रुपये कामविणाऱ्याची गुंतवणूक व्याजासहित वसूल व्हायला दोन वर्षेच पुरे आहेत आणि याचवेळी ५० हजार रुपये कमावणाऱ्याला आपली गुंतवणूक वसूल करायला चार पाच वर्षे लागणार आहेत…. साहजिकच वीस हजार रुपये कमावणारा जास्त वरचढ ठरतो. त्याच्याकडे दोन वर्षानंतर अशी रक्कम येत आहे जी पूर्णपणे निव्वळ नफा आहे…. पन्नास हजार रुपये कमावणारा माझ्या दृष्टीने टोटल लॉस मध्ये आहे. कारण त्याने केलेल्या गुंतवणुकीवर त्यापेक्षा किमान दुप्पट जास्त उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. आकड्यात कधी काही बघायचं नसतं. टक्केवारीत हिशोब करायचा असतो. या हिशोबात तो पन्नास हजार कमावणारा मागे पडतोय. आणि वीस हजार वाल्याला प्रगतीला संधी जास्त आहे कारण त्याच्यावरील गुंतवणुकीच दडपण दुसऱ्याच वर्षी दूर होत आहे.

उलाढालीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आजही आपल्या प्रत्येकाच्या शहरात चहाच्या टपरीवाला, वडापाव ची गाडी चालवणारा, स्नॅक्स ची डोसा उत्तपाची गाडी चालवणारा दिवसाला दहा वीस हजार रुपयांची उलाढाल सहज करतोय आणि याचवेळी त्याच शहरात कित्येक हॉटेल सुद्धा दहा हजाराची उलाढाल नियमित करू शकत नाहीयेत… कोण भारी ठरतंय?

एखाद्या मोठ्या कंपनीला एखाद्या वर्षी नफा कमी झाला म्हणून त्या कंपनीचे शेअर्स लागेच नाहीत, तिची उलाढाल सुद्धा पहिली जाते. जर उलाढाल वाढत असेल तर कंपनी भक्कम पायावर उभी आहे, नफाही मिळेलच या विचाराने गुंतवणूकदार कंपनीतून बाहेर पडत नाहीत.

उलाढाल महत्वाची आहे. उलाढाल वाढली तरच व्यवसाय वाढणार आहे.

सुरुवातीला खूप सारा पैसा गुंतवला म्हणून व्यवाय फक्त मोठा दिसतो, पण तो मोठा असतोच असे नाही. तो व्यवसाय मोठा होण्यासाठी त्याची उलाढाल मोठी असणे आवश्यक असते…. गुंतवणुकीने नफा वाढत नाही, उलाढालीने वाढतो. त्यामुळे सुरुवातीच्या गुंतवणुकीला काहीच महत्व नसतं. नंतरची उलाढाल आणि त्या उलाढालीतून आलेल्या नफ्यातून केलेल्या गुंतवणुकीला खरे महत्व असते. मोठ्या गुंतवणुकीमुळे झालेली मोठी उलाढाल कामाची नाही, कारण ती त्या मोठ्या गुंतवणुकीमुळे झालेली आहे, आणि ती गुंतवणुकीच्या प्रमाणातच परतावा देऊ शकते. कमी गुंतवणुकीतून मोठ्या उलाढालीकडे झालेला प्रवास जास्त चांगला असतो.

म्हणून मी नेहमी सांगतो कि सुरुवात थोडक्यात करा. सेटअप ला महत्व देऊ नका, ज्यांना व्यवसायातलं काही कळत नाही त्यांच्या नजरांना गांभीर्याने घेऊ नका, लोकांना दाखवण्यासाठी मोठी गुंतवणूक करू नका…. थोडक्यात सुरुवात करा. व्यवसाय शिकून घ्या, ग्राहक वाढवण्यावर भर द्या, मार्केट हातात घ्या…. पाया पक्का करा… आणि मग मोठ्या प्रमाणावर व्यवसायाचा विस्तार करा…. त्यावेळी तुमची उलाढाल योग्य असेल आणि ROI सुद्धा परफेक्ट जुळेल, आणि व्यवसाय खऱ्याने नफ्यात असेल.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!