व्हिजन आणि मिशन…फक्त वेबसाईट पुरतं असतं कि याचा खरंच काही फायदा असतो?


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

आपल्यापैकी ९९.९९% व्यावसायिकांनी आपली वेबसाईट बनवताना त्यातील About Us सेक्शन मधे व्हिजन आणि मिशन मधे हमखास इतर कोणत्यातरी वेबसाईट ची माहिती कॉपी पेस्ट केलेली असते. मीसुद्धा काही वर्षांपूर्वी तेच केलं होतं. व्हिजन मधे काय लिहायचं, मिशन मधे काय लिहायचं हे आपल्याला माहीतच नसतं. मग अशावेळी कोणत्यातरी मोठ्या ब्रँड च्या वेबसाईट पाहून त्यातील माहिती एकत्र करून त्यातीलच चार पाच वाक्ये आपल्या वेबसाईट वर टाकली जातात.

काय फायदा असतो या व्हिजन चा? एवढं काय महत्व असतंय मिशन ला? व्हिजन आणि मिशन मधे फरक काय असतो? आपल्याला व्यवसाय करताना तर कधी याची गरज पडली नाही. मग याची वेबसाईट वर खरंच गरज आहे का? याचा आपल्या आयुष्यावर काही परिणाम होणार आहे का? असंख्य प्रश्न आपल्याला पडतात. आणि कशाचंच समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आपण व्हिजन आणि मिशन या दोन संकल्पना फक्त वेबसाईटवरील दोन कॉलम पुरते मर्यादित ठेवतो.

व्हिजन आणि मिशन मधला फरकच आपल्याला स्पष्ट होत नसताना त्याच महत्व जाणून घेण्याची गरज कधी जाणवण्याची शक्यताच नाही.

मी कधीही व्हिजन आणि मिशन चा विषय आला तर खूप काही स्पष्टीकरण देत नाही. फक्त एक उदाहरण देतो… छत्रपती शिवाजी महाराजांचं, आणि आपल्या स्वराज्याच. आता महाराजांचा, स्वराज्याचा आणि व्हिजन मिशन चा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण चिंता नसावी, ते उदाहरण इथेही स्पष्ट करून सांगणारच आहे.

शिवाजी महाराजांनी वयाच्या १५ व्य वर्षी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. हि मुहूर्तमेढ रोवताना त्यांच्यासमोर एका समृद्ध अशा स्वराज्याची संकप्लना होती. पण फक्त स्वराज्य स्थापन हे महाराजांचं उद्दिष्ट नव्हतं. शिवाजी महाराजांचं व्हिजन होतं दिल्ली काबीज करण्याचं. हेच व्हिजन समोर ठेऊन त्यांनी स्वराज्याची रचना केली होती. हेच व्हिजन त्यांनी आपल्या मावळ्यांच्या मनावर ठसवलं होतं. आणि त्यामुळेच त्यांची प्रत्येक कृती हि दिल्लीला धक्का देण्याचीच असे. महाराजांच्या हयातीत आपल्याला दिल्ली काबीज करता आली नाही, संभाजीराजांच्या हयातीतही ते शक्य झाले नाही, पुढे राजाराम महाराज, राणी ताराबाई यांच्या काळातही ते शक्य झालं नाही. पण पुढे शाहू महाराजांच्या मात्र आपण दिल्ली काबीज केलीच.

जे व्हिजन महाराजांनी पाहिलं होत ते शाहू राजांच्या काळात सत्यात उतरलं. महाराज जरी सोबत नसले तरी त्यांनी आपल्या स्वराज्याच पाहिलेलं व्हिजन हे मावळ्यांच्या रक्तात पिढीनंपार पाझरत होतं. आणि म्हणूनच महाराजांच्या निधनानंतर पन्नास साथ वर्षांनी, पण आपण दिल्ली काबीज केलीच. कारण त्या स्वराज्याला जोडलेला प्रत्येक मावळा हा त्या व्हिजन ला जोडला गेलेला होता. हे असतं व्हिजन. ज्याला फक्त त्याचा प्रणेताच नाही तर त्याचे साथीदारही मनाने जोडले जातात. त्याच्या पूर्ततेसाठी जीवाचं रान करतात.

बर, मिशन म्हणजे काय? महाराजांचं मिशन काय होतं? तर स्वराज्यातील प्रत्येक नागरिकाला चांगले राहणीमान देणे, सुरक्षितता देणे, चांगली वागणूक देणे, त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी प्रयत्न करणे हे स्वराज्याचे आणि महाराजांचे मिशन होते. जसं व्हिजन पुढच्या पिढ्यांत उतरलं, तसंच मिशनही पुढच्या पिढ्यांनी गांभीर्याने घेतलं. म्हणूनच महाराजांनंतरही कित्येक वर्षे स्वराज्याची वाटचाल आपल्या मार्गावरून तसूभरही ढळली नाही. हे असतं मिशन.

मला बरेच जण व्हिजन आणि मिशन मध्ये काय लिहावं यासाठी कॉल करतात. मी त्यांना हेच उदाहरण देतो. यापेक्षा दुसरं कोणताही उदाहरण थोडक्यात स्पष्ट करून सांगता येणार नाही असं मला वाटत.

व्यवसायात आणि वैयक्तिक आयुष्यातही व्हिजन खूप महत्वाचे आहे. जोपर्यंत आपले व्हिजन स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपण कितीही मेहनत घेतली तरी एका ठराविक अंतराच्या पुढे आपली मजल जाऊ शकत नाही. आणि आपल्यासोबत आपले सहकारीसुद्धा कोणत्याही उद्दिष्टविना फक्त भरकटत राहतात.

या उदाहरणावरून तुमची सर्वांची व्हिजन आणि मिशन यांचा अर्थ आणि यांमधील फरक दोनीही स्पष्ट झाले असेल…. आणि आता तुमच्या वेबसाईट मधे व्हिजन आणि मिशन मध्ये काय लिहायचंय हे तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल…

व्हिजन हे तुम्ही तुमच्या व्यवसायाचं, तुमच्या आयुष्यचं भविष्य काय पाहिलेलं आहे यावर ठरतं. व्हिजन साध्य कारण्यासाठी तुम्ही योग्य ती आखणी करणे, आणि त्यावर नियोजनबद्धपणे काम करणे सुद्धा आवश्यक असतेच. मिशन म्हणजे तुम्ही काय करण्यासाठी हे व्हिजन पाहिलेलं आहे. म्हणजे आपली कंपनी अमुक क्षेत्रातील नामांकित कंपनी व्हावी हे व्हिजन असेल पण या प्रवासात आपल्याला काय साध्य करायचे आहे हेही निश्चित करणे महत्वाचे असते.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “व्हिजन आणि मिशन…फक्त वेबसाईट पुरतं असतं कि याचा खरंच काही फायदा असतो?

  1. खरोखर, ह्याहून दुसरा विषय सहजरित्या समजलाहीनसतता, जितकं आपण स्वराज्य विषयास अनुसरुन, या कल्पकतेचे सुंदर माध्यमात स्पष्टिकरण केले.
    धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!