प्रचार आणि प्रतीकांचा बिझनेस फंडा…


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

कबीर सिंग चित्रपटातला, प्रेमभंग झालेला कबीर सिंग दारू का पितो ? सिगारेट का ओढतो ? २४ तास नशेतच का राहतो ? तो शादी मे जरूर आना या चित्रपटातल्या प्रेमभंग झालेल्या हिरोसारखा आपल्या करिअरविषयी गंभीर का होत नाही? कधी विचार केलाय?
सध्याच्या चित्रपटांमधे दारू सिगारेट यांचं प्रदर्शन का वाढलंय? लोकांना ते आवडतंय म्हणून? बिलकुल नाही….

सत्तरच्या दशकात अमेरिकेतील एका सिगारेट बनविणाऱ्या कंपनीने महिला मुक्तीची चळवळ राबविली होती. अमेरिकेतील महिलांना स्वातंत्र्य खूप उशिरा मिळाले. आपल्यानंतर २० वर्षांनी अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. तिथे सुद्धा खूप कडवट पुरुषप्रधान संस्कृती होती. सत्तर च्या दशकात तिथल्या महिला वर्गाने या जबरदस्ती विरोधात बंड करायला सुरुवात केली. त्या स्वातंत्र्याची मागणी करायला लागल्या. आणि या मोहिमेला बळ दिले तिथल्या एका नामांकित सिगारेट कंपनीने. कंपनीच्या मालकाने महिलांच्या सिगारेट ओढण्याला महिला मुक्तीचे प्रतीक बनविले.

त्यावेळी तिथेही महिलांनी सिगारेट ओढणे दारू पिणे याला विरोध होत असे. हाच धागा पकडत त्या कंपनीने मग सिगारेट ओढण्यालाच महिलामुक्तीचे प्रतीक बनविले. कंपनी महिलांच्या स्वातंत्र्यसाठी प्रचंड जाहिराती करू लागली. बऱ्याच हिरोईनींना घेऊन फोटो सेशन केले गेले. आता मुक्त व्हा, स्वतंत्र व्हा अशा टॅगलाईन्स वापरल्या गेल्या, आणि त्या टॅगलाईनसोबत एखाद्या आघाडीच्या हिरोईनींचा सिगारेट पितानाचा फोटो दाखवला जायचा. सिगारेट पिण्याचे इव्हेन्ट केले गेले. महिलांना मुक्तपणे सिगारेट ओढण्यासाठी इव्हेंट्स आयोजित केले गेले. कंपनीच्या या मोहिमेत महिलांनी हिरीरीने भाग घेतला. त्यांना काहीही करून पुरुप्रधान संस्कृतीच्या जोखडातून मुक्त व्हायचे होते…
याचा परिणाम काय झाला माहिती आहे? त्या सिगारेट कंपनीची विक्री पुढच्या दोन वर्षात दुपटीपेक्षा जास्त वाढली. त्या कंपनीने सिगारेटला महिला मुक्तीचे प्रतीक बनविण्यामागे एक मोठा बिझनेस दडलेला होता. महिला मुक्तीची चळवळ कधीनाकधी यशस्वी होणारच होती, पण त्या मुक्ततेला साथ देऊन त्या कंपनीने आपला बिझनेस वाढवला, आणि सोशल वर्क केल्याचा प्रचारही केला.

आता कबीर सिंग कडे वळूयात. मागच्या पंचवीस वर्षात बऱ्याच चित्रपटांमधे कॉलेजमधल्या मुलांनी (म्हणजे जो हिरो असतो) दारू पिताना दाखवण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. कॉलेजमधील मुले म्हणजे वय किती? तर अठरा वीस बावीस… कॉलेजमधल्या त्या हिरोला स्टाईल मधे दारू पिताना दाखवल जात. का दाखवलं जातंय? लोकांना ते हवंय म्हणून? चित्रपटाची गरज आहे म्हणून? नाही… असं बिलकुल नाही. ती चित्रपटाची गरज नव्हती, किंवा लोकांना ते हवं होतं असं काही नाही. तर १५ ते २५ या वयोगटातील एक खूप मोठा पोटेन्शियल ग्राहक दारूपासून दूर होता. त्या वर्गाला दारू पिण्यासाठी प्रववृत्त करणं हा त्यामागचा बिझनेस होता. मी LLB च्या शेवटच्या वर्षाला असताना बारावी होऊन पहिल्याच वर्षाला ऍडमिशन घेतलेल्या एका ज्युनियर मित्राने ‘भैय्या आणखी किती दिवस लहान राहायचं?’ असं म्हणून आयुष्यातील पहिला दारूचा पेग घेतला होता.

पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत २०-२२ वयाच्या मुलांमधे दारू पिण्याचे प्रमाण खूप कमी होते. पण आता ते खूप वाढले आहे. कशामुळे?
चित्रपटात हिरो ला किंवा व्हिलन ला सिगारेट दारू पिताना दाखवलं जातं. तेही एकदम स्टाईल मधे. तो कबीर सिंग सिगारेट च्या धुरात दरवाजा उघडतानाचा सिन मधे कसला भारी दिसतो? फुल्ल स्टाईल मधे. दिवसभर दारू पितो मस्त धिंगाणा घालतो. एकदम रॉकिंग. तो रँचो दारूच्या नशेत कसा त्या करीनाला तिच्या खोलीत जाऊन प्रपोज मारतो? कसला भारी वाटतो ना !!! तो सुलतान मिर्झा एक पाय खुर्चीवर ठेऊन तोंडात सिगारेट धरून लायटरने स्टाईल मधे पेटवतो… भलताच आकर्षक वाटतो. ८०% चित्रपटात हिरोंना सिगारेट आणि दारू पिताना सिगारेट ओढताना दाखवलं जातंय. काही वेळेस तर व्हिलन सुद्धा एक आघाडीचा हिरो घेतला जातो आणि त्यालाही सिगारेट दारू पिताना दाखवलं जातं. उगाचंच असेल का ते?

खरं तर हा दारू आणि सिगारेट ची देशातील विक्री वाढविण्यासाठी नियोजन पूर्वक रचलेला एक प्रचाराचा भाग होता, आणि आहे. दारू पिणं हे स्टेटस सिम्बॉल बनवलं गेलं, सिगारेट ओढण्याला स्टाईलशी जोडलं गेलं, नशा करण्याला श्रीमंतांच्या आवडीशी जोडलं गेलं… यामुळे काय साध्य झालं?
आज मुलांमधे दारू आणि सिगारेटचं व्यसन वयाच्या १५ व्या वर्षापासूनच सुरु होतंय. म्हणजे जो कस्टमर २५ वयानंतर दारू सिगारेट सुरु करण्याची शक्यता होती त्याने १० वर्षे आधीच बिझनेस द्यायला सुरुवात केली.

तरुणांचं मार्केट बऱ्यापैकी कव्हर झाल्यानंतर मागच्या दहा वर्षात चित्रपटांमधे नायिकांना सुद्धा दारू पिताना, सिगारेट ओढताना सर्रास दाखवायला सुरुवात झाली. यामुळे काय झालं? आता पोटेन्शियल कस्टमर आणखी वाढला. आता कॉलेजमधील मुलींमध्ये दारू पिण्याचे सिगारेट ओढण्याचे प्रमाण अतिशय वाढलं आहे. साहजिकच कंपन्यांचा टर्नओव्हर सुद्धा वाढलाय.

हे फक्त एका इंडस्त्रीसंबंधी उदाहरण झालं. प्रचार आणि प्रतीकांचा बिझनेस साठी होणार वापर प्रचंड आहे. लोकांना कशाकडे आकर्षित करायचं, कशा प्रकारे करायचं, त्यासाठी काय स्ट्रॅटेजि वापरायची याच नियोजन करण्यासाठी कंपन्यांकडे तज्ज्ञांची टीमच असते. जे चोवीस तास फक्त एकाच विचारात गढलेले असतात… कशा प्रकारे प्रचार करायचा?कोणत्या गोष्टीला प्रतीक म्हणून पुढे आणायचं ?

आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही इतक्या अलगदपणे आपला वापर केला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करून लोकांच्या डोक्यात आपल्याला हवे ते मुद्दे घालणे, लोकांना आकर्षित करतील अशा प्रतीकांचा वापर करून त्यांना आपल्या ब्रँड शी जोडणे किंवा एखादी विचारधारा त्यांच्या माथी थोपवणे या गोष्टी जगभरात सतत चालू असतात. हजारो वर्षांपासून हि पद्धत चालू आहे आणि पुढेही चालू राहणार यात शंका नाही.

प्रचार प्रतीकांची हि खुप मोठी उदाहरणे झाली. आपण काही लहान उदाहरणांकडे येऊ.

पन्नास वर्षांपूर्वी पुरुषांनी दाढी करणे खूप दुर्मिळ असायचे. हॉलिवूड च्या चित्रपटांत सगळ्या हिरोंना बऱ्यापैकी दाढी असायचीच. मग जिलेट चा उदय झाला, आणखी काही शेव्हिंग ब्लेड आणि शेविंग क्रीम बनविणाऱ्या कंपन्यांचा उदय झाला. आणि इकडे हॉलिवूड च्या चित्रपटांत सगळे हिरो एकदम स्वच्छ दाढी करून अवतारायला लागले. चाहते साहजिकच त्या हिरोंना फॉलो करतातच. अल्पावधीतच शेव्हिंग क्रीम आणि ब्लेड्स बनवणाऱ्या कंपन्यांची विक्री कित्येक पटींनी वाढली. आपल्याकडेही सगळे हिरो एकदम स्वच्छ दाढी करूनच वावरले आहेत. मागच्या काही वर्षात आपल्याकडे दाढी ठेवण्याची फॅशन अली होती. काही नवीन कलाकार दाढी ठेवत होते.पण आता ते फक्त पिळदार मिशी ठेवतात दाढी नाही.

एखाद्या लेखकाचं पुस्तक पब्लिश होणार असेल तर तो काही दिवस आधी कोणताही पुरावा नसलेले, आगापिछा नसलेले, बिनबुडाचे पण एकदम धक्कादायक वक्तव्ये करायला सुरुवात करतो, ज्याने सगळं वातावरण ढवळून निघतं. साहजिकच त्याचा आणि पर्यायाने त्याच्या पुस्तकांचा प्रचार होतो, आणि विक्री जोरात होते.

काही वर्षांपूर्वी देशात राजकीय मेळाव्याच्या वेळी, मोर्चे, सभांवेळी गांधी टोपी घालण्याची लाट आली होती. टोपी वर नेत्याचे, पक्षाचे नाव किंवा आपल्या मागण्या लिहून त्या टोप्या घातल्या जात. आता ते प्रमाण कमी झाले. पण त्या लाटेत किती टोप्यांची उलाढाल झाली असेल याचा काही विचार केलाय? वेगवेगळे मोर्चे निघतात, आंदोलने होतात, मेळावे भरतात… प्रत्येक ठिकाणी या टोप्या, टीशर्ट, झेंडे, बिल्ले, बॅनर्स अशा कितीतरी वस्तू लागतात. यांची उलाढाल काही कोटींमधे होते. बरेचशे मोर्चे आंदोलने हे त्या उलाढालीसाठीच काढले जातात असं म्हणता येईल.

हेल्थ शी संबंधित जाहिरातींमधे सतत किटाणू, जर्म्स अशा शब्दांचा वापर केला जातो. तो एक प्रचाराचाच भाग आहे. ठराविक शब्द सारखे सारखे लोकांच्या कानावर आदळवून त्यांचं ग्राहकांच्या मनात एक स्थान निर्माण करायचं आणि त्याद्वारे आपला बिझनेस करून घ्यायचा. काहींनी तर देशभक्तीलाच प्रतीक बनवून आपला बिझनेस साध्य करून घेतला होता. काहीजण आपल्या जात, धर्म, प्रांत, पंथाला, विचारधारेला प्रतीक बनवून बिझनेस करतात. वाईट वाटेल पण हेच सत्य आहे. लोकांना जे आवडेल ते द्या किंवा त्यांना आधी ते आवडावे यासाठी प्रचार करून मग ते त्यांच्या गळी उतरवा… इथे किटाणू किंवा जर्म्स या शब्दाला प्रतीकांच्या रूपात आपल्या समोर आणलं जातं.

पोकेमॉन गेम आठवतोय का? मोबाईल चा कॅमेरा चालू ठेऊन गावभर हिंडायचं. अचानक कुठेतरी पोकेमॉन दिसेल आणि त्याला कॅमेरात टिपायचं. गेम लॉन्च झाला त्यावेळी आपल्याकडे कुणी त्याला गांभीर्याने घेतलंच नाही. पण अचानक सगळ्या न्यूज चॅनल वर ऑस्ट्रेलिया मध्ये पोकेमॉन मुळे कसा गोंधळ उडालाय, किती मुले मेली, सरकारने गेमवर कसे निर्बंध घातलेत याच्या बातम्यांचा भडीमार सुरु झाला. आणि महिनाभरातच आपल्याकडे पोकेमॉन चे लाखो करोडो डाऊनलोड्स झाले. यासारखाच ब्लु व्हेल गेम चा सुद्धा प्रचार केला गेला होता. रशिया यूरोप मधे मुलांनी कशा आत्महत्या केल्या हे रंगवून सांगितले जायचे. यामुळे अर्थातच आपल्याकडे तो गेम खेळणाऱ्यांची संख्या वाढली. पबजी चा प्रचार कसा चालू आहे? सारखीच पद्धत…

९० च्या दशकात चार पाच वर्षात तीन-चार भारतीय तरुणींनि विश्वसुंदरी सारख्या स्पर्धांमधे विजयी होणे, त्याच काळात पाश्चिमात्य स्पर्श असलेले कॉलेज जीवन दाखवणारे चित्रपट येणे हा कहि योगायोग नव्हता. या काळानंतर आपल्याकडील सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ प्रचंड वाढली. फक्त मुलीच नाही तर मुलांचीही आपल्या दिसण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात झाली. दोन्ही वर्गांनी एका मोठ्या बाजारपेठेला जन्म दिला.

राजकारणात सुद्धा या प्रचार प्रतीकांचा जेवढा वापर केला गेलाय तो उद्योगांच्या तोडीस तोड आहे. आपल्या नेत्याला महान दाखवण्यासाठी प्रतीकांचा वापर करणे, आंदोलनात निवडणुकीत महापुरुषांचा किंवा एखाद्या चेहऱ्याचा वापर करून त्यांना मानणाऱ्या वर्गाला आकर्षित करणे, एखाद्या घटनेला कृतीला वर्गाला समूहाला प्रांताला देवाला धर्माला जातील पंथाला एखाद्या ठराविक विचारधारेशी वृत्तीशी जोडणे, हि सगळी राजकारणातल्या प्रचार आणि प्रतीकांच्या वापराची अभ्यासावी अशी उदाहरणे आहेत.

प्रचार आणि प्रतिकांचा खुबीने वापर केली जाणारी अशी कितीतरी उदाहरणे आहेत. आपल्या आसपास दररोज घडताहेत. आपण विकत असलेलं एखाद प्रोडक्ट किंवा सेवा सोडली तर आपणही इतर वेळी ग्राहकच असतो. अशावेळी आपणही त्या प्रचार प्रतीकांच्या जाळ्यात अडकलेलो असतोच. पण हि प्रचार आणि प्रतीकांचा वापर करण्याची कला आत्मसात करता आली तर आपण त्याचा आपल्या व्यवसायासाठी नक्कीच वापर करू शकतो…

म्हणून जागरूक रहा, चौकस रहा, प्रत्येक गोष्टीच घटनेचं कृतीच निरीक्षण करत रहा…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


3 thoughts on “प्रचार आणि प्रतीकांचा बिझनेस फंडा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!