गुजराती, मारवाडी व्यावसायिकांच्या यशामागचे एक मोठे कारण… सहकार्याची भावना.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

दहा पंधरा वर्षांपूर्वी एका गुजराती/मारवाडी व्यापाऱ्याची मुलाखत पाहिली होती. त्यावेळी व्यवसायात नव्हतो, पण तरीही आवडीने मुलाखत पहिली होती. त्या मुलाखतीमधे त्यांनी एक मार्केट तयार करण्यासंबंधी त्यांची स्ट्रॅटेजी सांगितली होती. आम्ही एखाद्या ठिकाणी एखादं शॉप सुरु केल्यावर कशा प्रकारे बाकीच्या ओळखीच्या व्यापाऱ्यांनाही त्याच ठिकाणी शॉप्स सुरु करायला सांगून मार्केट तयार करतो याबद्दल त्यांनी सांगितलं होतं. एकाच ठिकाणी एकाच प्रकारची भरमसाठ दुकाने उभी करून ग्राहकाला त्या मार्केटकडे आकर्षित केलं जातं.
माझ्या ‘मार्केट आपोआप बनत नसतं, ते नियोजनपूर्वक बनवायचं असतं’ या लेखात याच संदर्भाने थोडं लिहिलं आहे. त्या आर्टिकल मध्ये मुद्दे वेगवेगळे असले तरी मुख्य मुद्दा मार्केट नियोजनपूर्वक तयार करण्याचाच आहे.

यात त्यांनी आणखी एक मुद्दा सांगितला होता, तो जास्त महत्वाचा होता. तो मुद्दा होता एकमेकांना सहकार्य करण्याच्या भावनेचा.

ते म्हणतात… आम्ही ज्यावेळी एखाद्या ठिकाणी मार्केट तयार करतो तेव्हा एकमेकांना सहकार्याची भावना ठेऊन प्रत्येकालाच मोठं होण्यासाठी मदत करतो. आमच्यासाठी शेजारचा व्यावसायिक स्पर्धक असतो पण विरोधक कधीच नसतो. हा; आमच्यात प्रगतीची, विक्रीची स्पर्धा असतेच, नाही असे नाही, पण त्याचे पर्यावसन इतर व्यावसायिकांना शत्रुस्थानी पाहण्यात होत नाही. माझ्याकडे एखादा ग्राहक आलाय, त्याला एखाद्या ठराविक डिझाईन चा शर्ट हवाय, पण तो माझ्याकडे नाहीये. मी लगेच माझ्याकडे काम करणाऱ्या मुलाला शेजारच्या दुकानात जाऊन त्या डिझाईन चा शर्ट आहे का पाहायला सांगतो. तो आसपासच्या दुकानात फिरून त्या डिझाईन चा शर्ट घेऊन येतो. ज्या दुकानदाराकडून मी तो शर्ट घेऊन येतो, त्याला असं बिलकुल वाटत नाही कि मला तो शर्ट देण्याऐवजी त्या ग्राहकालाच आपल्याकडे घेऊन यावे. किंवा माझं कस्टमर बुडालं असं त्याला बिलकुल वाटत नाही. ज्यावेळी त्याच्याकडे अशी अडचण येते मीही त्याला याच प्रकारे मदत करतो. आमचं टार्गेट असतं कि तो ग्राहक त्या एरियामधे आला पाहिजे. तिथे आल्यानंतर मग तो कुणाकडेही जावो, काहीच फरक पडत नाही. पैसे आमच्या मार्केटमध्येच फिरणार असतो.

दहा पंधरा वर्षांपूर्वी ऐकलेलं त्यांचं ते मत आजही मार्केटमधे तंतोतंत अनुभवायला मिळतं. ते एकमेकांना स्पर्धक मानतात, पण शत्रुस्थानी मानत नाहीत. एकमेकांना मदत करण्यात ते बिलकुल हात आखडता घेत नाहीत. त्याच्याकडे दोन पैसे जास्त गेल्याने मला काही फरक पडत नाही, माझा धंदा सुद्धा जोमातच चालू आहे या मानसिकतेने ते सगळे व्यावसायिक एकमेकांना सहकार्य करतात. वैयक्तिक काहीही वाद असतील, पण धंद्यात एकमेकांना आडवं जायचं नाही हा नियम ते हमखास पाळतात.

याउलट, आपल्याकडे काय होत? हा मुद्दाही त्यांनीच सांगितला होता. त्यांचं म्हणणं होत कि मराठी व्यावसायिक व्यवसाय करतात, चांगल्यापैकी करतात. पण त्यांच्यात सहकार्याची भावना कमी असते. एकमेकांना ते स्पर्धक मानतातच पण शत्रुस्थानी पाहतात. आपल्या शेजारी एखादा आपल्यासारखाच व्यवसाय सुरु करत असेल तर लगेच मराठी व्यावसायिकांच्या कपाळावर आठी पडते. आला माझा धंदा कमी करायला असा विचार केला जातो. अशावेळी तिथेच आणखी आठ दहा एकसारखेच व्यवसाय त्याला सहनच होऊ शकत नाही. त्याला वाटते मी एकटाच असलो कि माझ्याकडचे ग्राहक दुसरीकडे जात नाही, पण त्याच्या हे लक्षात येत नाही कि जर मी माझ्यासारखे आणखी काही व्यावसायिक त्याच ठिकाणी आणले तर माझ्या मार्केटकडे ग्राहक जास्त संख्येने आकर्षित होतील. जर त्याने एकमेकांना सहकार्याची भावना ठेवली, मदतीची भावना ठेवली तर त्या मार्केटमधे आलेला ग्राहक किंवा त्याच्या दुकानात आलेला ग्राहक मोकळ्या हाताने माघारी जाणार नाही. तो कुणाच्याही दुकानात जावो, पण तो मार्केटमधे काहीतरी पैसा ओतूनच जाणार असतो हे तो लक्षात घेत नाही. प्रगती एकमेकांच्या सहकार्याने, सानिध्याने होते हे तो लक्षात घ्यायला कमी पडतो.

दहा पंधरा वर्षांपूर्वी पाहिलेली ती मुलाखत आजही मला चांगली आठवते, कारण पहिल्यांदा एखाद्या व्यावसायिकाची संपूर्ण तासाभराची मुलाखत मी पहिली होती. आणि त्यांनी सांगितलेले उदाहरण मला माझ्या आसपास बघायला मिळत होते. माझ्या शाळेजवळ असणाऱ्या दोन दुकानदारांमधे अजूनही ३६ चा आकडा आहे. आधी एक दुकान होत, काही वर्षांनी दुसरा आला. दोघांचं कधीही पटलं नाही. कारण ? पहिल्याच म्हणणं होत माझा धंदा कमी करायला आलाय, आणि दुसऱ्याच विचार होता कि मला मोठं व्हायचं असेल तर याचा धंदा आपल्याकडे ओढूनच व्हावं लागणार आहे. खरं तर आजही दोघांचाही व्यवसाय चांगला चालू आहे. त्यांची मुले आता ते दुकान सांभाळायला लागली आहेत. त्यामुळे खुन्नस कमी झालेली दिसते. पण आजही प्रत्येक ठिकाणी अशीच परिस्थिती पाहायला मिळते. नवीन पिढी जरा लॉजिकल आहे, म्हणून असे प्रकार कमी झालेत. पण पूर्णपणे थांबलेत असे नाही.

व्यवसायात सहकार्याची भावना खूप महत्वाची असते. स्पर्धा असू शकते, परंतु एकमेकांना शत्रूच्या रूपात पाहणे आपल्याच व्यवसायासाठी घातक असते. उलट सहकार्याच्या वृत्तीमुळे ग्राहक हा कुणाच्याही दुकानात येवो, पण संपूर्ण मार्केटबद्दल समाधानी होऊनच जातो. कारण त्याला जे हवंय ते सहजासहजी मिळतंय.

व्यावसायिकांनी मिळून इमर्जन्सी फंड उभा करणे हि मारवाडी, गुजराती व्यवसायीकांसाठी सामान्य बाब आहे. एखाद्या व्यावसायिकाला अचानक पैशांची गरज पडते, अर्जंट ऑर्डर असते, मोठ्या प्रमाणात माल खरेदी करायचा असतो. अशावेळी सगळे व्यावसायिक एकत्र येऊन त्याला पैसा उभा करून देतात. काम झालं कि तो व्यावसायिक लगेच तो पैसा परत करूनही टाकतो. पण आपल्याकडे अजून अशी पद्धत यशस्वी होणे शक्य नाही. कारण आर्थिक बाबतीत अजूनतरी तेवढी विश्वासार्हता आपण निर्माण करू शकलेलो नाही. ते सोपं सुद्धा नाहीये, त्यांचा व्यावसायिक वारसा शेकडो वर्षांचा आहे, आपली आत्ताशी सुरुवात झालेली आहे, त्यामुळे खूप काही घाई करण्याची गरज नाही.
पण सध्यातरी आपण किमान प्राथमिक पातळीवरील सहकार्याच्या भावनेने काम करून सुद्धा आपला उत्कर्ष साधू शकतो यात शंका नाही. आणि यात सातत्य ठेवलं तर पुढच्या दहा वीस वर्षात आपण एकमेकांना पुढच्या स्तरावरील सहकार्य करण्याच्या पातळीपर्यंत गेलेलो असू हे निश्चित.

दुसऱ्याला यशस्वी करण्यासाठी आपण जेवढा प्रयत्न करू तेवढे आपण यशस्वी झालेलो असू, हा साधा सोपा नियम आपण पळाला आणि एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती बाळगली तर नक्कीच अल्पावधीतच आपण व्यावसायिक आयुष्यात नेत्रदीपक यश मिळवू शकतो, आणि व्यावसायिक मानसिकता समाजात चांगल्याप्रकारे रुजवू शकतो.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

One thought on “गुजराती, मारवाडी व्यावसायिकांच्या यशामागचे एक मोठे कारण… सहकार्याची भावना.

  1. अशाच आपल्या लेखांमधून प्रेरणा घेऊन मी सुध्दा नोकरी सोडून व्यवसायाला सुरुवात केली आहे. डिजिटल मार्केटिंग आणि पब्लिक रिलेशन च्या माझ्या व्यवसायातून आम्ही सुध्दा अशाच नवीन व्यवसाय करणाऱ्यांना कायम सहकार्य करतो. व आम्ही कमी दरात सेवा पुरवतो.
    मराठी माणसाने जास्तीत जास्त व्यवसायात उतरावे , नोकरी घेणारे नाहीतर नोकरी देणारे व्हावे.
    डिजिटल मार्केटिंगच्या कोणत्याही सेवेसाठी मराठी माणसाने नक्की संपर्क करावा – http://www.themediatroop.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!