जाहिरात करणे थांबवू नका. जाहिरातीत सातत्य ठेवा


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

मला बऱ्याच नवीन व्यावसायिकांचे व्यवसाय वाढवण्यासंबंधी टिप्स साठी कॉल येतात. बऱ्याच जणांनी एखादे शॉप सुरु केलेले असते किंवा घरगुती काहीतरी व्यवसाय सुरु केलेला असतो. यातल्या बऱ्याच जणांची एक तक्रार असते ती म्हणजे परिसरात पॉम्पलेट्स वाटले पण त्यातून काही रिझल्ट आला नाही. हजार पॉम्पलेट्स वाटले पण दहाच कॉल आले वगैरे तक्रारी असतात. मग मी त्यांना विचारतो कि हे पॉम्पलेट्स किती वेळा वाटले? तर त्यांचं म्हणणं असतं एकदाच किंवा दोनदाच. एन्क्वायरी आल्या नाहीत म्हणून आम्ही पुन्हा वाटलेच नाहीत.

मग त्यांना कोणत्याही जाहिरातीच्या सक्सेस रेशोचं हे एक स्टॅंडर्ड प्रमाण मला सांगावं लागतं…

जेव्हा तुम्ही १००० पाँप्लेट्स १००० जणांना वाटता,
तेव्हा त्यातले २०० जण त्याकडे पाहतात
१०० जण ते वाचतात,
५० जण त्याला गांभिर्याने घेतात
यातुन २० एन्क्वायरी येतात

या २० एन्क्वायरी मधुन कशा प्रकारे लीड क्लोज करायचे हा स्कील चा भाग.
पण सामान्यपणे या २० मधले
१० जण सुरुवातीलाच वजा होतात
५ जण ईंटरेस्ट दाखवतात पण काही कारणाने माघार घेतात
३ जण व्यवहारासाठी तयार होतात पण पुन्हा येऊ म्हणतात
अणि २ जण तुमच्याशी व्यवहार करतात…

हा स्टॅंडर्ड रेशो त्यांना मी सांगतो. हा स्टॅंडर्ड रेशो फक्त पॉम्पलेट्सच्याच बाबतीत नाहीये. तर जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या जाहिरातींमध्ये हाच रेशो असतो करतो.
समजा तुम्ही फेसबुक वर जाहिरात करत असाल, आणि तुमच्या जाहिरातीला १००० रिच मिळाले असतील तर त्यातूनच ४-५ एन्क्वायरीच फक्त जनरेट होतात. १००० पॉम्पलेट्स वाटले काय किंवा फेसबुकवर १००० जणांपर्यंत तुमची जाहिरात पोचवली काय, दोन्हीतही रिझल्ट असाच मिळतो. कारण आपण ती जाहिरात सरसकट करत असतो. उलट फेसबुक वर रिच च्या तुलनेत फक्त २-५% एंगेजमेंट असते. आणि त्या एंगेजमेंट च्या २० प्रत्यक्ष प्रतिसाद मिळतो. हाच रेशो तुम्ही वर्तमानपत्रात जाहिरात केली तरी सारखाच असतो.

असो… प्रश्न फक्त रिझल्ट कसा मिळतो याचा नाहीये. आपण जाहिरातीत सातत्य ठेवत नाही हा प्रश्न महत्वाचा आहे.

पॉम्पलेट्स असो, पेपरमधून जाहिरात असो, डिजिटल कॅम्पेनिंग असो… तुम्ही एकदा जाहिरात करून थांबलात तर तुम्हाला कधीच रिझल्ट मिळणार नाही. तुम्हाला सतत जाहिरात करावी लागते. तुम्ही आज पॉम्पलेट्स वाटून थांबलात तर त्यातले जे दहा जण तुम्हाला गांभीर्याने घेणार आहेत तेसुद्धा तुम्हाला विसरून जातील. कारण एकदा पाहिल्यानंतर पुन्हा तुमचा ब्रँड त्यांना दिसलाच नाही ते तो विस्मृतीतच जाणार आहे.

प्रत्येक जाहिरातीच्या कॅम्पेन मधून थोडाफार वर्ग तुम्हाला ओळखायला सुरुवात करत असतो. तुम्ही जाहिरात सतत करत राहिलात कि हा दरवेळचा थोडाफार वर्ग मोठा होत जातो. सारखी सारखी जाहिरात समोर दिसल्यामुळे तुमचा व्यवसाय ओळखीचा वाटायला लागतो. आणि ग्राहक तेच खरेदी करतो जे त्याला ओळखीचं वाटत असतं.

समजा मला आज सकाळी पेपरमधे एक पॉम्पलेट दिसलं, मी फक्त त्यावरून नजर फिरविली. घराबाहेर पडल्यानंतर रस्त्याने पोलबोर्डस वर तीच जाहिरात पुन्हा दिसली. आता मी सकाळी पाहिलेली जाहिरात माझ्या थोडीशी डोळ्यासमोर येईल. आता दुपारी फेसबुक वर सर्फिंग करत असताना मला तीच जाहिरात पुन्हा दिसली तर ती जाहिरात आठवायला लागेल. हीच जाहिरात आपण सकाळी वाचली होती हे लक्षात येईल. संध्याकाळी पुन्हा घरी जाताना ते पोलबोर्ड्स आहेतच. आता चार दिवसांनी पुन्हा ते पॉम्पलेट पेपरमधे आले. आता मला ते दुसऱ्यांदा आल्याचे लक्षात येईल. तरीही कदाचित मी त्याला गांभीर्याने घेणार नाही. पण पुन्हा चार दिवसांनी तेच पॉम्पलेट मला दिसले तर मी किमान वाचू तरी काय लिहिलंय ते या विचाराने ते हातात घेईल. म्हणजे जाहिरातदाराच्या तिसऱ्या चौथ्या प्रयत्नानंतर मी त्या जाहिरातीला गांभीर्याने घेतले असेल. कदाचित माझ्याआधी काही जणांनी त्याला गांभीर्याने घेतले असेल. माझ्या नंतर आणखी काही जण तो ब्रँड ओळखायला लागले असतील. एक एक करत त्या व्यवसायाला ओळखणाऱ्यांची संख्या वाढत जाईल.

पण गांभीर्याने घेतलं म्हणून मी लगेच त्याच्याकडे शॉपिंग ला काही जाणार नाहीये. फक्त त्याचा अमुक एक व्यवसाय आहे हे माझ्या डोक्यात घट्ट बसलेलं आहे इतकंच. आणि सारख्या सारख्या जहरातीमुळे तो मला अनोळखी वाटत नाहीये इतकाच त्याचा तत्कालीन फायदा. पण ज्यावेळी मला त्याच संबंधी काही खरेदी करायची असेल त्यावेळी मात्र तो ब्रँड नकळतपणे माझ्या व्हिजिट लिस्ट मध्ये असेल हे निश्चित.

तुमचा व्यवसाय कोणताही असो, उत्पादन, सेवा, रिटेल कोणताही…. प्रत्येकासाठी कोणत्याही प्रकारचे जाहिरात कँपेन असो, प्रत्येक वेळी सक्सेस रेशो हा जवळजवळ सारखाच असेल. तुम्ही स्वतःच स्वतःच्या किंवा आपल्या ओळखीच्या व्यावसायिकांच्या जाहिरात कॅम्पेन चा सर्व्हे करा. ती जाहिरात किती लोकांकडून पहिली जाईल, किती जण त्याचीदखल घेतील, किती जण त्याला गांभीर्याने घेतील, किती एन्क्वायरी येतील, त्यातल्या किती क्लोज होतील हा रेशो जवळजवळ सारखाच दिसून येईल.

जाहिरात सतत करत राहणे खूप आवश्यक असते. आपला ब्रँड लोकांच्या विस्मृतीत जाणार नाही याची काळजी घेणे हे आपलेच काम आहे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कुठेतरी ब्रँड दिसत राहणे आवश्यक आहे. ब्रँड ओळखीचा वाटला तरच सामावून घेतला जातो नाहीतर त्याला बाजूला केले जाते.

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारच्या एका पोस्ट वर एक एक कमेंट होती कि डिजिटल जमान्यात पॉम्पलेट सारखे आऊटडेटेड मार्ग सांगू नका. कमेंट वरूनच ते महाशय व्यावसायिक नाहीत किंवा आत्तातच सुरुवात आहे हे लक्षात आले त्यामुळे. पण हि शंका बऱ्याच जणांची असे शकते म्हणून ये लेखाचा शेवट त्याच मुद्द्याने करू…

जाहीरतीचे खूप सारे प्रकार आहेत. त्यातला आपल्या व्यवसायासाठी कोणता योग्य आहे ते ओळखावे लागते. डिजिटल जमान्यात इतर मार्ग आऊटडेटेड आहेत हा भ्रम आहे. भारतातील फक्त ३०% लोक इंटरनेट वापरतात. त्यातले निम्मे कायम वापरकर्ते आहेत. देशातील १४-१५% जनता सोशल मीडियावर आहे. म्हणजेच डिजिटल जाहिरात हा एकच मार्ग वापरने घातक ठरू शकते. कितीही खर्च केला तरी तुम्ही १४% पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. समजा तुम्हाला लहानश्या परिसरात, आणि सर्व प्रकारच्या वयोगटाच्या ग्राहकांत जाहिरात करायची आहे, अशावेळी पॉम्पलेट्स, फ्लेक्स बोर्ड्स अशी माध्यमे उपयुक्त ठरतात. इथे डिजिटल मार्केटिंग पुरेशी उपयोगी नाही. (फेसबुक वर कोणत्याही लोकेशनचा १ किमी परिसर टार्गेट करता येत नाही. किमान मर्यादा दहा किलोमीटर ची आहे.) जर परिसर मोठा असेल पण सर्व प्रकारच्या ग्राहकांचा असेल तर वर्तमानपत्र, फिरत्या वाहनांवरील जाहिराती, आणि डिजिटल कॅम्पेनिंग उपयुक्त ठरतात. जर अपेक्षित ग्राहकांत तरुणाईचे प्रमाण जास्त असेल तर सोशल मीडिया कॅम्पेन उपयुक्त ठरते. सोशल मीडिया जाहीरत कॅम्पेनिंग ब्रँडची ओळख निर्माण करण्यासाठी, ब्रँड ठासवण्यासाठी उपयुक्त ठरतात. SEO सारखे मार्ग हे लीड जनरेट करण्याचे काम करतात. पण खर्चिक असतात. आणि स्थानिक मार्केट असणाऱ्या व्यवसायांना उपयोगी नसतात.

जाहिरातीच्या क्षेत्रात प्रत्येक जाहिरात प्रकाराचं आपलं एक स्थान आहे. कुठं कोणत्या प्रकारची जाहिरात उपयोगी आहे हे ओळखूनच कॅम्पेनिंग करावं लागतं… कोणतेही जाहिरात प्रकार आऊटडेटेड नासतात. त्यांची उपयोगीतता कमी जास्त होत असते.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “जाहिरात करणे थांबवू नका. जाहिरातीत सातत्य ठेवा

  1. फेसबुक वरती सध्या बऱ्याच उद्योजक मित्र सारख्या पेज वरून माहिती येत असते पण आपण केलेले मुद्देसूद लेखन खूप परिणामकारक आहे शिवाय खूप उपयुक्त आहे.
    धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!