‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
२०२० मधे व्यवसायात दुपटीने वाढ करण्याचे उद्दिष्ट प्रत्येक व्यावसायिकाने ठेवावे. हि वाढ उलाढालीमधील असेल, उत्पन्नामधील असेल किंवा ग्राहक संख्येतील असेल. पण किमान दुप्पट वाढ झाली पाहिजे.
हे दुपटीने वाढीचे उद्दिष्ट, व्यवसायाला किमान ३ वर्षे झालेल्या व्यावसायिकांसाठी आहे. नवीन व्यवसायांची वाढ गणिती प्रमाणात जास्त वेगाने होत असते. कारण सुरुवातीची उलाढाल खूपच कमी असते. त्यामुळे आठ दहा महिन्यांनंतर जेव्हा व्यवसायाला खरी सुरुवात होते तेव्हा गणिती प्रमाणात व्यवसायाची उलाढाल दहा वीस पटीपर्यंत जाते. पण ती प्रॅक्टिकली कमी असते. म्हणून वर्षभरात दुपटीने वाढीचे उद्दिष्ट हे सेटल व्यवायसाठीच असावे.
ज्यांनी या वर्षात व्यवसाय सुरु केलाय त्यांनी पुढच्या वर्षाच्या शेवटपर्यंत व्यवसाय न्यायचाय एवढेच उद्दिष्ट ठेवावे. आणि तो नेत असताना पुढच्या वर्षभरात व्यवसायासाठी खिशातून पैसा खर्च करण्याची गरज पडणार नाही यासाठी प्रयत्नशील राहावे.
व्यवसायातील हि अपेक्षित वाढ वेगवेगळ्या मार्गांनी होऊ शकते. जाहिरातीचे प्रमाण वाढवून किंवा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचुन ग्राहक संख्या वाढविली जाऊ शकते. प्रोडक्टस ची संख्या वाढवून उलाढाल वाढविली जाऊ शकते. वैयक्तिक नेटवर्क आणखी वाढवून व्यवसायात वाढ केली जाऊ शकते. वेगवेगळे मार्ग आहेत. प्रत्येक मार्गावर योग्य नियोजन करून पावले टाकलीत तर २०२१ पर्यंत आपला व्यवसाय नक्कीच दुपटीने वाढलेला असेल.
पण हि वाढ करायची म्हणजे बाहेरून खूप सारा पैसा ओतून व्यवसाय वाढवणे अशा प्रकारचीवाढ नाही बरका. आहे तोच व्यवसाय बाहेरून पैसे न ओतता वाढवणे अशा प्रकारची अपेक्षित आहे. जर नवीन एक्स्पान्शन साठी पैसे ओतण्याचे नयोजन असेल तर ती गुंतवणूक सध्याच्या सेटअप मध्ये धरून मग दुपटीने वाढीचे नियोजन करा.
खरं तर सध्याच्या ‘वर्षभरात दहा-वीस पटीने व्यवसाय वाढवा’ अशा प्रकारच्या जाहिरातींच्या जमान्यात दुप्पट वाढ हि खूपच क्षुल्लक गोष्ट वाटेल. पण आपण प्रॅक्टिकली विचार करणेच योग्य आहे. सेटल व्यवसायाची वर्षभरात दुपटीने वाढ हे खूप मोठे टास्क असते. म्हणजे, एखाद्या दुकानाची महिन्याची उलाढाल ५ लाख असेल तर ती वर्षभरात महिन्याला दहा लाख होणे हि काही साधी सोपी गोष्ट नाही. किंवा एखाद्या कंपनीची उलाढाल महिन्याला वीस लाख असेल तर ती वर्षभराच्या आत महिन्याला चाळीस लाख होणे हे काही वाटतं तितकं सोपं काम नाही.
प्रत्येक महिन्याला विक्रीचे, उलाढालीचे १०% वाढीचे उद्दिष्ट ठेवा. ज्या महिन्यात हे उद्दिष्ट साध्य होणार नाही त्या महिन्यातील राहिलेले उद्दिष्ट पुढच्या महिन्यात वाढवा. दर महिन्याला मागच्या महिन्याच्या कामाचा अभ्यास करा आणि पुढच्या महिन्याचे नियोजन करा. प्रत्येक महिन्याला दहा १०% वाढ म्हटलं तर वर्षभरात ती तिप्पट वाढ होते. म्हणजे १०० चे ३०० होतात. म्हणजेच प्रत्येक महिन्याचे १०% वाढीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले तर वर्षाकाठी दुपटीने वाढीचे उद्दिष्ट सहज साध्य होऊ शकेल….
नवीन वर्षाचा एकंच संकल्प… दुपटीने व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट…
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील