चिनी फंडिंगवाले भारतीय स्टार्टअप, आक्रमक जाहिराती आणि बिझनेस स्ट्रॅटेजी.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

भारतीय लोकांच्या जाहिरातीवर भुलण्याच्या मानसिकतेला चिनी कंपन्यांनी जेवढं अभ्यासलंय तेवढं कदाचित भारतातल्या कंपन्यांनी अभ्यासलेलं दिसून येत नाही.

PayTm, Ola, Swiggy, Zomato, OYO Rooms, Big Basket, Dream11 आणि सध्याला सर्वात जास्त चर्चिले जाणारे स्टार्टअप Byju’s… या जाहिरातींच्या प्रचंड मोठ्या आणि आक्रमक लाटांमुळे मागील काही वर्षात अचानक प्रकाशझोतात आलेल्या काही कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांना चिनी कंपन्यांचे फंडिंग आहे. यासोबतच Oppo, Vivo, RealMe, Xiaomi, One Plus हे काही चिनी ब्रँड्स जे मागील काही वर्षांपासून देशात धुमाकूळ घालत आहेत. या सगळ्या कंपन्यांच्या यशाचे रहस्य प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि आक्रमकपणे केल्या जाणाऱ्या जाहिराती आहेत. ग्राहकांना संमोहित करणाऱ्या आक्रमक जाहिराती.

Oppo Vivo सारख्या ब्रँड्स नि मागील काही वर्षात देशात घातलेला धुमाकूळ चर्चेचा विषय झाला होता. दोन तीन वर्षानंतर लगेच दुसऱ्या ब्रँड्स नि मार्केटमधे प्रवेश केला आणि तीच जाहिरातीची पद्धत अवलंबवली. भरमसाठ जाहिरातींचा मारा. ज्या ज्या कंपन्यांना चिनी कंपन्यांची फंडिंग आहे त्यांचीही जाहिरातींची स्ट्रॅटेजी सारखीच आहे. यांच्या जाहिरातींचं कॅम्पेन सुरु झालं कि जिकडे तिकडे चोहीकडे आपल्याला तेच ब्रँड्स दिसायला लागतात. दुसऱ्या कोणत्याही ब्रँड चा विचार करण्याची संधीच दिली जात नाही. भारतीय ग्राहकांची ब्रँड बद्दलची मानसिकता या जाहिरातींच्या मागे आहे. आपल्याकडचे लोक फक्त जाहिराती पाहून कोणता ब्रँड भारी आहे याचा निर्णय घेतात. TV वर जाहिरात दिसते म्हणजे भारी ब्रँड अशी मानसिकता, आणि त्यात जाहिरातींचा मारा सतत चालू असेल तर ग्राहक दुसऱ्या कोणत्याही ब्रँड चा विचार करत नाहीत. चिनी कंपन्यांनी हीच मानसिकता लक्षात घेऊन लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे. आपल्याच वेगवेगळ्या ब्रँड्स नि ग्राहकांना इतकं घेरतात कि ग्राहक कुठेही गेला तरी याच कंपन्यांच्या प्रोडक्टचीच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे खरेदी करेल. याला भारतीय कंपन्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीतला निष्काळजीपणा सुद्धा हातभार लावतोय, हे नाकारता येणार नाही.

चिनी फंडिंग असलेल्या भारतीय कंपन्यांची आणखी एक स्ट्रॅटेजी लक्षात घेण्याजोगी आहे. जी थेट ग्राहकांच्या मेंदूशी खेळायचं काम करते. या कंपन्यांच्या संस्थापकांच्या यशाची स्टोरी तिखट मीठ लावून देशभर पसरवली जाते. त्यातही हा कसा गरीब होता, मग परिस्थितीवर मत करून कसा यशस्वी झाला, आता अब्जावधींच्या संपत्तीचा कसा मालक आहे अशा मुद्द्यांवर भर दिलेला असतो. याचे कारण आपल्याला प्रत्येकाच्याच यशाची किंमत नसते, तर फक्त गरीबाच्या यशाचं कौतुक असतं. त्यामुळे तो प्रवर्तक किती हालापेष्टांतून आलेला आहे हे सांगणे महत्वाचे असते. जनता शहानिशा करण्याच्या भानगडीत पडत नाही. वेगवेगळ्या चॅनेल वर, न्यूज पोर्टल वर स्टोरी दिसली म्हणजे ती १००% खरीच असणार असा समज करून घेतला जातो. या प्रकारच्या प्रचारासाठी सुद्धा या कंपन्या प्रचंड पैसा ओततात. जाहिरातीच कॅम्पेन आणि जोडीला भावनिकतेचं कॅम्पेन…

पण हे कशासाठी केलं जातं?
भारतीय जनता भावनिक आहे. एखाद्या ब्रँडशी मानाने जोडली गेली तर आयुष्यभर त्याला दूर करणार नाही. अशावेळी कंपनीच्या संस्थापकाला अशा प्रकारे भावनिक स्टोरी सांगून लोकांच्या मनात बसवलं तर साहजिकच त्या कंपनीचं आकर्षण लोकांमधे वाढायला लागतं. लोकांचा कंपनीला सकारात्मक प्रतिसाद मिळायला लागतो. अर्थातच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कंपनीला फायदाच होतो.

या भारतीय कंपन्यांना फंडिंग करणाऱ्या किंवा मूळच्या चीनच्या पण भारतात असलेल्या कंपन्यांचं उद्दिष्ट कोणत्याही प्रकारे लांबचा विचार करण्याचं नाही हे निरीक्षणाअंती लक्षात येतं. या कंपन्या फक्त इथल्या मार्केटमधे धुमाकूळ घालून पैसा कमवून घेण्याचं उद्दिष्ट ठेवतात. प्रत्येकाचा एक कालावधी असतो. तो कालावधी संपला कि कंपनीची वाढ खुंटते. अशावेळी या कंपन्या नवीन ब्रॅंड मार्केटमधे आणतात, आणि त्याचा धुमाकूळ सुरु होतो. पण हा तात्पुरता विचार फक्त इथल्या मार्केटसंबंधी आणि त्या ठराविक ब्रँड संबंधी असतो. संपूर्ण कंपनीविषयी नाही. दर दोन तीन वर्षांनी नवीन भारतीय ब्रँड्स शोधणे, किंवा आपलेच नवीन ब्रँड्स मार्केटमधे आणणे त्यातून पैसा कमावणे, पुन्हा नवीन काहीतरी शोधायला सुरुवात करणे, इतकी सिम्पल स्ट्रॅटेजी…

नवीन स्टार्टअप ला फंडिंग करून त्यांच्या जाहिरातींवर अमाप पैसा खर्च करून ते ब्रँड मोठे करण्यासाठी धडपड करण्याचं महत्वाचं कारण आहे, गुंतवणुकीवर मिळणारा भरमसाठ परतावा. स्टार्टअप मध्ये केलेली गुंतवणूक शेकड्याच्या पटीत परतावा देते. कित्येक वेळा हजार पटीत सुद्धा. आणि तेही तीनचार वर्षातच. पण यानंतर या कंपन्या स्थिर होतात आणि इतर सामान्य कंपन्यांप्रमाणे वाढ सुरु राहते. म्हणून तीन वर्षापेक्षा जास्त आपल्याला कोणत्याही कंपनीचं कॅम्पेन झालेलं दिसून येत नाही. दोन ते तीन वर्षे फक्त धिंगाणा सुरु राहतो, त्यांनत तो ब्रँड मागे पडून दुसरा एखादा पुढे येतो.

चिनी कंपन्यांची स्ट्रॅटेजी खूप अभ्यासण्यासारखी आहे. आपल्या लोकांची मानसिकता जेवढी या कंपन्यांना कळली आहे, त्याच्या २०% तरी आपल्याकडील कंपन्यांना झेपली आहे कि नाही शंकाच आहे. कारण या कंपन्या आपल्याकडे येऊन धुमाकूळ घालत असताना, ७०-८०% मार्केट ताब्यात घेत असताना आपल्याकडीन भल्या भल्या कंपन्या उरलेल्या १०-२०% मार्केटमधे आपल्याआपल्यातच लुटपुटीच्या लढाया लढत आहेत. आणि या लढाईतून मोठ्या प्रॉफिटच्या हव्यासाने गुणवत्तेमधे हात आखडता घेऊन हाती असलेले थोडेफार ग्राहकही गमवत आहेत. भारतीय कंपन्यांकडून, आपण टॉप ला जाऊच शकत नाहीत मग कशाला उठाठेवी करायच्या या विचाराने, गुणवत्तेमधे होत असलेला हलगर्जीपणा या चिनी कंपन्यांच्या पथ्थ्यावर पडत आहे. बेसिक लेव्हल ची क्वालिटी दिली तरी ग्राहक खुश होतोय हे या कंपन्यांना माहित झालंय.

स्पर्धेमधे पहिल्या तीन मधे कोण आहेत हेच पाहिलं जातं, शेवटच्या तीन मधे कोण पाहिलं आलंय हे पाहत नसतात. ते पहिले तीन आपण असूच शकत नाही, तेवढी आपली क्षमताच नाही अशा विचाराने शेवटच्या स्पर्धकांनी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून पाळायचं आणि शेवटी राहिलेल्यांच्याच पायात पाय घालायचे, अशाने आपण कुठेच राहणार नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

चिनी कंपन्या आणि चिनी फंडिंग मिळालेल्या भारतीय कंपन्या भारतात फक्त आणि फक्त जाहिरातीच्या बळावर सेट होत आहेत. यांचा जाहिरातींचा मारा इतका आक्रमक आणि नियोजनबद्ध असतो कि अगदी त्यांच्यासारख्याच असलेल्या इतर कंपन्या अलगद बाजूला फेकल्या जातात.
आपल्याकडे सगळ्यात जास्त कॉस्ट कटिंग जाहिरातींमधेच होत असते. खर्च कमी करायचा म्हटलं कि पहिला हातोडा जाहिरातीच्या खर्चावर पडतो. जणू काय जाहिरात आपल्या व्यवसायाची शत्रू आहे. जाहिरातीला पर्याय नाही. पण जाहिरात म्हणजे काय हेही लक्षात घेतले पाहिजे. ती कशी काम करते, कशा प्रकारे कॅम्पेन करावे लागते, लोकांची मानसिकता कशा प्रकारे काम करते अशा सगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो. पण असा सगळ्या बाजूंनी विचार करण्यासाठी आधी त्या गोष्टीला गांभीर्याने घ्यावं लागतं. चिनी कंपन्यांची आक्रमक जाहिरात स्ट्रॅटेजी सर्व उद्योजकांनी अभ्यासावी अशी आहे. ते लोकांच्या मेंदुशीच खेळतात. ग्राहकांनी काय विचार करावा हे ठरवतात. ग्राहकांना त्यांना हवे तेच निर्णय घ्यायला भाग पाडतात. जाहिरातीला अतिशय गांभीर्याने घेणाऱ्या चिनी कंपन्यांना म्हणून अभ्यासणे गरजेचे आहे.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!