रेट तोडून मिळविलेला ग्राहक तात्पुरता असतो.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

रेट तोडल्यामुळे मिळालेला ग्राहक कायमस्वरुपी नसतो, दुसऱ्या कुणी स्वस्तात माल दिला की तो तिकडे जातो.

क्वालिटी मुळे मिळालेला ग्राहक कायमस्वरुपी असतो. तो किंमतीपेक्षा गुणवत्ता आणि सेवेचा विचार करतो.

रेट तोडण्याच्या भानगडीत पडू नका, फक्त टर्नओव्हर वाढलेला दिसेल, प्रत्यक्षा धंदा आहे तिथेच असेल… उलट गुणवत्तेमधे तडजोड करावी लागल्यामुळे कायमस्वरुपीचा ग्राहक कधीच मिळणार नाही…. थोडक्यात तात्पुरता धंदा वाढल्याचे जाणवेल, पण कायमचे नुकसान करुन बसाल.

याउलट रेट कमी करण्याच्या भानगडीत न पडता गुणवत्ता, सेवा यावर भर देताल तर सुरुवातीच्या काळात ग्राहक वाढायला अडचण होईल पण एकदा धंद्याचा जम बसल्यावर तुमची प्रगतिची गाडी सुसाट निघालेली दिसेल.

रेट तोडून एकमेकांचे ग्राहक पळविण्याचा स्पर्धेमुळे आज काही क्षेत्रात पूर्ण मार्केटच ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकमेकांचे पाय ओढण्याच्या नादात कित्येक व्यावसायिक पूर्णपणे संपलेले आहरेत. एखाद्या नवीन व्यावसायिकाला वाटत कि भरमसाठ डिस्काउंट दिला कि आसपासच्या व्यावसायिकांचा ग्राहक आपल्याला मिळेल. पण त्यामुळे कित्येकवेळा ग्राहक त्या डिस्काऊंटला सवयीचा होऊन जातो, आणि थोड्याशा भाववाढीला सुद्धा विरोध करू लागतो. अशावेळी संपूर्ण मार्केटलाच आपले रेट खाली आणणे भाग पडते. एक वेळ अशी येते कि सगळे मार्केटचा शून्य नफ्यावर काम करू लागते. खूप ठिकाणी अशी अवस्था झाली आहे. कित्येक शहरात अशा काही क्षेत्रांचा कचरा झालाय. काहींनी या रेट तोडण्याचा कंटाळून आपले व्यवसायच बंद करून टाकले आहेत. ज्यांचे शिल्लक आहेत ते फक्त काहीतरी करत राहायचं म्हणून टिकून आहेत, आणि ज्यांनी पंख फुटायच्या आधीच रेट तोडून स्पर्धा सुरु केली ते कधीच डबघाईला लागलेत.

रेट तोडला म्हणजे बिझनेस वाढला असं नाही. फक्त ग्राहक मिळाला म्हणून बिझनेस वाढला असही नाही. नफा, ग्राहक संख्या, रेट अशा सगळ्यांचा सुवर्णमध्य काढूनच व्यवसाय करावा लागतो. तात्पुरत्या फायद्यासाठी पूर्ण मार्केटची वाट लावू नका. आपल्या काही महिने नेही तर कित्येक वर्षे व्यवसाय करायचा आहे. एखाद्याच्या चुकीच्या कृतीने मार्केट डबघाईला येणार असेल तर त्या लाटेत ज्याने सुरुवात केली तोसुद्धा वाहून जाणार असतो. सगळे टिकले तर मार्केट टिकत. मार्केट संपलं तर दुसरं एखाद मार्केट त्याची पोकळी भरून काढतं. कॉमन प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मधे मोनोपोली होऊ शकत नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

तात्पुरता डिस्काउंट आणि फक्त इतरांपेक्षा कमी रेट म्हणून रेट तोडण्याचा प्रकार या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तात्पुरता डिस्काउंट मार्केटच्या उलाढाली साठी आणि सुदृढतेसाठी आवश्यक असतो, पण रेट तोडल्याने होणारी उलाढाल हि निव्वळ देवाणघेवाण बनून राहते, त्याचा मार्केटला काहीही फायदा होत नाही.

एकदम जवळच उदाहरण – पाणी जार काही वर्षांपूर्वी ३० रुपयांना विकले जायचे. कालांतराने गावात दोन तीन जारवाले सुरु झाले. मग त्यातल्या एखाद्याने २० रुपयाला जार विकायला सुरुवात केली. हळूहळू सगळीकडे २० रुपयांनाच जार मागितले जाऊ लागले. मग सगळ्यांनाच आपले दर कमी करणे भाग पडले. एक तर आधीच स्पर्धक वाढल्यामुळे व्यवसाय कमी झाला आणि त्यावर आता रेटसुद्धा कमी करावे लागले. बऱ्याच्या व्यावसायिकांना व्यवसाय परवडेनासे झाला. यानंतर नवीन सुरु होणाऱ्या व्यावसायिकांनी ग्राहक पळविण्याच्या हेतूने जार चे दर १५ रुपयांवर आणले. आता जवळजवळ सगळीकडे ग्राहकांकडून १५ रुपये दरासाठी आग्रह सुरु झाला आहे. लवकरच सगळ्याच व्यावसायिकांना जार १५ रुपयांना विकावे लागणार आहे. नवीन येणाऱ्या व्यावसायिकांची संख्या वाढत आहे, आणि प्रत्येक जण रेट कमी कारण्यासुन सुरुवात करत आहे.

आता पाणी जार व्यवसायाची अवस्था पूर्णपणे कचरा झालेल्या मार्केट सारखी झाली आहे. जुने व्यावसायिक फक्त चालू आहे म्हणून व्यवसाय चालू ठेवत आहेत, नवीन व्यावसायिक कसाबसा कारभार हाकत आहेत, नफा कुणालाच मिळेनासा झाला आहे, ग्राहकांना आता ३० रुपये द्यायला जीवावर येत आहे, त्यामुळे १५-२० च्या वर कुणीच जाऊ शकत नाही. आणि हे सगळं असूनही अजूनही कित्येकांना यात मोठा बिझनेस दिसत आहे. मग ते प्रवेश करताहेत, आणि पुन्हा रेट पाडत आहेत… हे चक्र थांबायलाच तयार नाहीये. यात सगळ्यात मोठा मी प्रॉब्लेम आहे तो म्हणजे ग्राहक कुणाकडेच कायमस्वरूपी राहत नाहीये. तो फक्त रेट कोण किती देतोय एवढंच पाहतोय. त्यामुळे कोणत्याच जार व्यावसायिकाला आपल्या ग्राहकांचा अंदाज लावणे शक्य होत नाहीये.

अशी बऱ्याच मार्केटची अवस्था आहे. आपणच आपलं मार्केट संपवायला अप्रत्यक्षपणे हातभार लावत आहोत हे कित्येकांच्या लक्षातच येत नाहीये.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!