‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
व्यक्तिमत्व विकासासाठी पुस्तके वाचा असं म्हटलं कि ‘कोणते पुस्तक वाचू’ असा प्रश्न हमखास विचारला जातो. यावर माझं उत्तर असतं, कोणतंही वाचा. जे मिळेल ते वाचा.
खरं तर कोणतंही एक पुस्तक वाचून काहीच होणार नसतं. वाचन हि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक पुस्तकातून थोडी थोडी माहिती मिळत आपल्या विचारांत सुधारणा होत असते. आणि हि पुस्तके कोणत्याही एका क्षेत्राशी निगडित असून चालत नाही. सर्व प्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत. एका ठराविक काळानंतर तुमचा कल कोणत्या प्रकारच्या पुस्तकांकडे आहे हे तुमच्याच लक्षात येईल. आणि तोपर्यंत तुम्ही वाचनाच्या प्रक्रियेत बऱ्यापैकी स्वतःला सामावून घेतलेलं असेल.
मी सर्वात पाहिलं वाचलेलं पुस्तक ‘राधेय’ होत. पण हि पहिली चरित्रमक कादंबरी वाचल्यानंतर मात्र सुहास शिरवळकर, गुरुवार नाईक यांच्या पुस्तकांचा नाद लागला. शंभर एक पुस्तके तरी मी यांचीच वाचली असतील. यांनतर मात्र ‘श्रीमान योगी’ वाचण्यात आले, आणि काल्पनिक पुस्तकांचा नाद सुटला. मागच्या दहा पंधरा वर्षात मी मुख्यत्वे ऐतिहासिक, चरित्रात्मक, वैज्ञानिक, जीवशास्त्रीय अशी विविध पुस्तके वाचली आहेत. काही पुस्तके दोन तीन वेळा वाचली आहेत. या काळात मी २५० च्या आसपास पुस्तके वाचली आहेत, आणि यापैकी फक्त १०% काल्पनिक आहेत. व्यवसायात उतरल्यानंतर व्यवसायविषयक सुद्धा बरीच पुस्तके वाचली आहेत. अगदी कुराण, बायबल आणि वेद सुद्धा बऱ्यापैकी वाचले आहेत. पण कोणताही एक पॅटर्न कधीच ठरवून घेतला नाही. एखाद्या विषयावर किंवा विचारधारेवर दोन्ही बाजूंची पुस्तके वाचणं मला आवडतं. त्यात ऐतिहासिक आणि चरित्रात्मक पुस्तकांना मी जास्त प्राधान्य देतो.
प्रत्येक पुस्तक काहीतरी नवीन शिकवून जातं. प्रत्यकातून आपले ज्ञान वाढत जाते. शब्दसंग्रह वाढतो. इतिहास, वर्तमान, भविष्य यांचे आकलन व्हायला मदत होते.
गेल्या वर्षी मी एक विषाणूंसंदर्भात एक पुस्तक वाचलं होतं. विषाणूंच एक वेगळच जग असल्याचं लक्षात आलं होतं. आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद हे पुस्तक तीन चार वेळा वाचल्यावर थोडंफार कळलं होतं. चीन चा इतिहास वाचल्यानंतर चीन च्या आजच्या वागणूचीच कोडं उलगडलं होतं. काही पुस्तकांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध उलगडवून दाखवले, तर काहींनी वेगवेगळ्या सत्तासंघर्षांना उलगडवून दाखवले.
पण अजूनही खूप काही शिल्लक आहे. माझ्याकडे असलेल्या पुस्तकांपैकी अजूनही किमान १०० पुस्तके वाचायची शिल्लक आहेत. ज्यावेळी कुणी सहा-सातशे, हजार दोन हजार पुस्तके वाचल्याचं ऐकतो तेव्हा कळतं अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे पुस्तक वाचण्याच्या बाबतीत आदर्श आहेत. गरिबीच्या परस्थितीत असताना सुद्धा त्यांची पुस्तक वाचण्याची धडपड, त्यासाठी अगदी स्वतःच्या तब्येतीशी केलेली तडजोड पाहून तर आपण आत्ताशी एखाद टक्काच पल्ला पार केलाय हे लक्षात येतं.
प्रत्येक पुस्तक महत्वाचं आहे. प्रत्येक पुस्तक काहीतरी शिकवतच. म्हणून पुस्तके कोणती वाचावीत हा प्रश्न विचारूच नये. सरळ ग्रंथालयात जावे. आवडेल ते पुस्तक विकत घ्यावे, आणि वाचायला सुरुवात करावी. जमेल तेवढं ज्ञान मिळवायचंय एवढं एकंच उद्दिष्ट ठेवावं. पाच-पन्नास पुस्तके वाचल्यानंतर “कोणतं पुस्तक वाचू” हा प्रश्न किती गैरलागू होता हे लक्षात येईल…
(हेडर इमेज मधील पुस्तकांचा फोटो हा माझ्या ऑफिसमधील पुस्तकांचा आहे. त्यामुळे हीच पुस्तके का दाखवली, असा प्रश्न कृपया विचारू नये. )
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील