लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
पाच सहा वर्षांपूर्वीचा किस्सा आहे.
एका मित्राच्या वडिलांनी टाटा इंडिगो मांझा गाडी बुक केली होती. मित्राला ती गाडी काही आवडत नव्हती. तो नाराज होऊन बसला. मग त्याच्या वडिलांनी त्याला आणि मला टाटा च्या शोरूम मधे तिथल्या सेल्स एक्झिक्युटिव्ह ला भेटण्यासाठी जायला सांगितले.
आम्ही तिथे गेलो. ज्याने गाडी बुक केली होती त्या सेल्समन ला भेटून गाडीची बुकिंग रद्द करायला सांगितली. त्या सेल्समन ने आम्हाला तासभर ती इंडिगो मांझा किती उत्तम गाडी आहे हे पटवून दिले. पण आम्ही बुकिंग रद्द करायची म्हणून ठरवूनच गेलो होतो. त्याच्या सगळ्या चांगल्या आश्वासनानंतरही आम्ही बुकिंग रद्द केली आणि घरी आलो.
चार पाच महिन्यांनी त्याच मित्राला टोयोटा कोरोला गाडी घेण्याची इच्छा झाली. त्यासाठी नगरमधल्याच टोयोटाच्या शोरूम मधे गेलो. तिथे जाऊन पाहतो तर तोच टाटा शोरूम मधला एम्प्लॉयी आता टोयोटा च्या शोरूम ला जॉईन झाला होता. नमस्कार वगैरे झाल्यांनतर आम्ही त्याला कोरोला बघायची आहे म्हणून सांगितले.
म्हणाला, एकदाच मस्त गाडी आहे सर. बिनधास्त घेऊन टाका.
त्याची फिरकी घेण्यासाठी आम्ही म्हटलं, पण तुम्ही तर मांझा सुद्धा चांगली गाडी आहे म्हणाला होतात ?
इथे त्याच्याकडून ती गाडी चांगलीच होती, पण हि त्यापेक्षाही चांगली आहे असे उत्तर अपेक्षित होते. पण त्याने बॉम्बच टाकला…
डब्बा गाडी होती ती सर. मी तिथे काम करत होतो म्हणून तुम्हाला ती किती चांगली आहे ते पटवून देणे आवश्यक होते. पण बरं झालं तुम्ही मांझा घेतली नाही.
त्याच्या या उत्तरावर आम्ही दोघेही क्षणभर शांत झालो. पण त्याच्याशी बोलण्याची इच्छाच संपली. पाच मिनिटात तेथून बाहेर पडलो.
जो सेल्समन स्वतःहून मागच्या वेळी तुमच्या गळ्यात मी प्रोडक्ट जबरदस्ती मारण्याचा प्रयत्न करत होतो हे सांगतोय, त्या सेल्समन च्या कोणत्याही शब्दावर आता विश्वास ठेवणे शक्य नव्हते. कोरोला गाडी चांगली होती हे आम्हालाही माहित होते, पण ती प्रेझेंट करणारा इतका बकवास निघाला कि त्या गाडीचंही इम्प्रेशन त्या क्षणाला शून्य झालं.
मित्राने त्यानांतर दोन महिन्यात तिसरीच गाडी घेतली…
सेल्समन हा ग्राहक आणि कंपनी यातला महत्वाचा दुवा असतो. तो कंपनीचं प्रतिनिधित्व करत असतो. त्याचा शब्द हा कंपनीचा शब्द असतो. तोच जर स्वतःची प्रतिमा चुकीची तयार करत असेल तर कंपनीविषयी सुद्धा तीच प्रतिमा निर्माण होईल.
जास्त काही बोलायची गरज नाही, वरच्या किश्श्यात मुद्दा सविस्तर आलेला आहेच. सेल्स एक्झिक्युटिव्ह किती महत्वाचा असतो हे आणि त्याची एक चूक किती महागात पडू शकते याचा अंदाज या उधारणावरून येईल अशी अपेक्षा करतो.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील