बँक एफडी चा परतावा कमी वाटतोय ? म्युच्युअल फंडात डिपॉजिट करा.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : निलेश तावडे
======================

आपण सर्व जण बँकेच्या एफडी मध्ये नियमित गुंतवणूक करत असतो. बँकेच्या एफडी मधून मिळणारा निश्चित कालावधीसाठी निश्चित परतावा आपल्याला आश्वस्त करतो आणि त्यामुळे आपली ओढ बँकेच्या एफडी कडे अधिक असते. परंतु बँकेच्या एफडी मध्ये गुंतवणूक करीत असताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. १) बँक एफडी चे दर आहेत ते गेल्या दहा वर्षात खूप खाली आले आहेत. साधारण १० वर्षांपूर्वी असलेले १२-१३% दर हा आता ६% पेक्षा खाली आला आहे (इथे देशातील मोठ्या सरकारी बँकांचे एफडी दर लक्षात घेतले आहेत ) सध्याचे दर हे महागाई दरापेक्षा किंचितच जास्त आहेत. त्यामुळे दीर्घकालीन एफडी च्या मुदतीनंतर मिळणारा परतावा हा महागाई खाऊन टाकते. म्हणजेच दीर्घकालीन एफ डी मध्ये गुंतवणूक करताना आपण आपल्या मुद्दलाचे फक्त संरक्षण करतो, त्यात महागाई वर मात करणारी वाढ होत नाही. २) दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखादी सहकारी बँक खूपच जास्त व्याज दर देऊ करीत असेल तर आपण गुंतवणूक करताना काळजी घेतली पाहिजे. बँकेच्या व्यवस्थापन किती सक्षम आहे, बँकेचा एकूण व्यवहार किती मोठा आहे , तसेच एनपीए रेशो किती खाली आहे याचा अभ्यास करून गुंतवणूक केली पाहिजे. १-२ % अधिक व्याज मिळते म्हणून धोका पत्करणे योग्य नाही. बँकेच्या एफडीतील फक्त रु १ लाख रक्कमेलाच विमा छत्र असते, नजीकच्या काळात ते वाढून रु. ५ लाख होईल.

आजचा आपला देश हा विकसनशील देश आहे, पूर्ण जगाचा इतिहास पहिला तर असे लक्षात येते कि जस जशी आर्थिक प्रगती होत जाते तसे व्याजाचे दर हे कमी होत जातात. आपला देश साधारण पुढच्या ७-८ वर्षात विकसित देशांच्या पंक्तीत जाईल. येणाऱ्या ७-८ वर्षात आपल्या देशात हि व्याजदर हे खालीच जातील. अशावेळी आपण फक्त बँकेच्या एफडी मध्ये गुंतवणूक करीत राहिलो तर आपली संपत्ती वाढणार नाही. व्याजदरापेक्षा जास्त परतावा मिळवण्यासाठी साहजिकच आपल्याला थोडी जोखीम घेणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हि जोखीम घेण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते कारण प्रत्येकाचा उत्पन्न, खर्च , जबाबदाऱ्या , स्वप्ने तसेच समस्या वेगवेगळ्या असतात. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार जर आपण आपली गुंतवणुकीची वर्गवारी केली तर निश्चितच चांगला परतावा मिळू शकेल. ह्यासाठी आपली काही गुंतवणूक हि म्युच्युअल फंडाच्या निरनिराळ्या योजनांमध्ये करावी. बँकेची एफडी व म्युच्युअल फंड ह्यांची तुलना आपण नोकरी व व्यवसाय ह्याच्याशी करू शकतो. नोकरी मध्ये व एफडी नियमित उत्पन्न आहे पण त्याला मर्यादा आहेत. व्यवसाय व म्युच्युअल फंड निश्चित उत्पन्न देत नसले तरी जास्त उत्पन्नाची शक्यता यात आहे. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणं म्हणजे तज्ज्ञ फंड मॅनेजर्स नि अभ्यासपूर्ण निवडलेल्या कंपन्यांच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करणे. त्यामुळे निश्चितच जास्त परताव्याची शक्यता म्युच्युअल फंड मध्ये आहे. जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार म्युच्युअल फंड च्या निरनिराळ्या कॅटेगरी ची वर्गवारी (ASSET ALLOCATION) आपण पाहू.

१) ३ वर्षांपर्यंतची गुंतवणूक.
ह्यासाठी आपण बँकेच्या एफडी मध्ये गुंतवणूक करावी. अल्पकाळात लागणारे पैसे आपण तात्काळ वापरू शकतो. तसेच ३ वर्षापर्यंतच्या अल्प काळातील गुंतवणूक इक्विटी संबंधित म्युच्युअल फंडात गुंतविल्यास बाजारातील अल्पकालीन अस्थिरतेचा प्रभाव आपल्या गुंतवणुकीवर राहू शकतो. एफडी बरोबरच म्युच्युअल फंडाच्या डेट ( कर्जरोखे /DEBT ) फंड हि आपण विचार करू शकतो. म्युच्युअल फंडाचा ‘बँकिंग अँड पी एस यु डेट फंड’ अत्यंत कमी जोखिमेचा चांगला पर्याय ठरू शकतो. डेट फंड जर कमीतकमी ३ वर्ष धरून ठेवले तर ते जास्त करप्रभावी होतात व कमी कर लागतो. जे थोडी जोखीम घेऊ शकतात त्यांनी म्युच्युअल फंड च्या ‘डेट हायब्रीड फंड’ किंवा ‘इक्विटी सेविंग फंड’ कॅटेगरी च्या योजनांची निवड करण्यास चांगले. ह्यात शेयर बाजारातील इक्विटी (EQUITY) समभागांमध्ये जास्तीत जास्त ३०-३५% गुंतवणूक होते व बाकीची गुंतवणूक स्थिर कर्जरोख्यांमध्ये होते.

२) ३ ते ५ वर्षांपर्यंतची गुंतवणूक
ह्यासाठी आपण म्युच्युअल फंडाची ‘ बॅलन्सड ऍडव्हान्टेज कॅटेगरी ’ किंवा ‘ऍसेट अलॉकेटर फंड कॅटेगरी’ चा विचार करू शकतो. हे असे फंड असतात जिथे फंड मॅनेजर हा स्थिर उत्पन्न देणाऱ्या कर्जरोख्यांमध्ये तसेच जास्त उत्पन्नाची शक्यता असलेल्या इक्विटी समभागांमध्ये गुंतवणूक करतात. ह्या कॅटेगरी मध्ये कर्जरोखे आणि इक्विटी समभागांचे प्रमाण असते ते तज्ज्ञ फंड मॅनेजर ठरवितात. ह्या फंडातील डेट / इक्विटी प्रमाण हे साधारण ३०-८०% लवचिक असते. आणखी सोप्या भाषेत सांगायचे तर, तज्ज्ञ फंड मॅनेजर्स आपल्या अभ्यासाप्रमाणे जेव्हा शेयर बाजार गुंतवणुकीस पोषक नसतो तेव्हा इक्विटी ३०% पर्यंत खाली आणतात व डेट ७०/८० % पर्यंत वाढवितात. जेंव्हा शेयर बाजार गुंतवणुकीस पोषक असतो तेंव्हा इक्विटी ८०% पर्यंत वाढवितात व डेट चा भाग खाली आणतात. आपल्या गुंतवणुकीचा पूर्ण कालावधीचा विचार केला तर आपली साधारणतः ४०-५० % गुंतवणूक हि शेयर बाजारातील इक्विटी समभागांमध्ये होते. मागील १० वर्षाचा इतिहास पहिला तर ह्या कॅटेगरी ने बँक एफडी पेक्षा साधारण ४-५ % परतावा हा जास्त दिला आहे. मात्र अल्पकाळामध्ये हे फंड चंचल राहू शकतात, आपली ३ वर्षांपुढील गुंतवणुकीसाठी ह्या फंडांची निवड करण्यास चांगले.

३) ५ ते ७ वर्षांपर्यंतची गुंतवणूक
ह्यासाठी आपण म्युच्युअल फंडाच्या ‘इक्विटी हायब्रीड फंड कॅटेगरी’ चा विचार करू शकतो. हे असे फंड असतात जिथे किमान ६५% ते ८०% गुंतवणूक हि इक्विटी समभागांमध्ये करतात. ३५% पर्यंत कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक असल्याने गुंतवणुकीस काही प्रमाणात स्थिरता येते. इक्विटी समभाग म्हणजे लार्ज कॅप , मिड कॅप आणि स्मॉल कॅप ह्या सर्व प्रकारच्या समभागांमध्ये योजनेची गुंतवणूक असते. आपल्या गुंतवणुकीचा पूर्ण कालावधीचा विचार केला तर आपली किमान ६५% गुंतवणूक हि शेयर बाजारातील इक्विटी समभागांमध्ये होते. मागील १० वर्षाचा इतिहास पहिला तर ह्या कॅटेगरी ने बँक एफडी पेक्षा साधारण ५-६ % परतावा हा जास्त दिला आहे. मात्र अल्पकाळामध्ये हे फंड चंचल राहू शकतात, चांगला परतावा मिळण्यासाठी किमान ५ वर्षांपुढील गुंतवणूक कालावधी असावा.

४) ७ वर्ष किंवा त्याहून जास्त कालावधीची गुंतवणूक
आपण ज्या विश्वासाने बँकेच्या एफडी मध्ये गुंतवणूक करतो त्याच विश्वासाने बँकेच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केली तर. म्युच्युअल फंडाचे ” बँकिंग अँड फिनान्शिअल सेक्टर फंड ” हे आपल्याला बँकांच्या व्यवसायात गुंतवणुकीची संधी देतात. हे पूर्णपणे इक्विटी समभाग संबंधित योजना असतात. ह्यात किमान ८०% गुंतवणूक हि फिनान्शिअल सेक्टर मधील बँक आणि इतर कंपन्याच्या समभागामध्ये असते. अल्पकाळात ह्या प्रकारच्या फंडामंध्ये जास्त उत्तर चढाव पाहिला मिळतात मात्र अतिदीर्घ कालीन गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. गेल्या काही महिन्यात रिजर्व बँक आणि सरकारने केलेल्या उपाय योजनांमुळे बँकांचे बुडीत कर्जाचे प्रमाण कमी होण्यास मदत झालेली आहे. त्याचा चांगला प्रभाव येणाऱ्या काळात ह्या सेक्टर वर दिसून येईल. दीर्घकाळासाठी बँकेच्या एफडी पेक्षा बँकांच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केव्हाही चांगली. सेक्टर फंड मध्ये जास्त जोखीम वाटत असेल तर म्युच्युअल फंड च्या लार्ज कॅप किंवा मल्टि कॅप फंड कॅटेगरी मध्ये गुंतवणूक करावी.

वर माहिती दिलेल्या वेगवेगळ्या कॅटेगरीतील फंडाचे आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य संयोजन केल्यास आपण महागाई वर मात करणारा परतावा मिळवू शकतो. आपल्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी आपल्याला जेंव्हा आपली गुणवणूक उपयोगात आणायची असेल तेंव्हा वर दिलेल्या क्रमवारीनुसार आपले पैसे काढावेत म्हणजे आपल्या पूर्ण गुंतवणुकीवर बाजारातील चढ उताराचा विपरित परिणाम होणार नाही. योग्य फंडांचे संयोजन करण्याकरीता आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.

धन्यवाद.

निलेश तावडे

लेखक हे २० वर्ष म्युच्युअल फंड मध्ये कार्यरत होते सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत
[email protected]
९३२४५४३८३२
www.nileshtawde.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!