‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
कोणतीही गोष्ट वळणावळणाने न करता जे ती समस्या सरळ मार्गाने समजून घेतात त्यांनाच यश मिळते. एखाद्या कामात यश मिळवायला नुसते शिक्षण आणि ज्ञान असून उपयोग नाही, त्याला नक्की काय केले पाहिजे हे समजले पाहिजे. जो मुख्य काम कोणते आहे हे समजून न घेता वायफळ व बिनमहत्त्वाच्या गोष्टी करीत राहतो, त्याला काम केव्हा सुरू करावे व केव्हा थांबवावे हे कळत नाही. मग तो मुद्द्यांशी गाठ न घालता वायफळ बोलण्यातच वेळ वाया घालवतो आणि त्याचे काम पुढे सरकत नाही.
दीर्घसूत्रीपणा, मुख्य कामगिरी सोडून भलतेच काम करीत बसणे, आडवळणाने बोलणे हे कोणालाच आवडत नाही. कारण असे केल्याने किमती वेळ वाया जातो. व्यवसाय कोणताही असला तरी प्रत्यक्ष कामाला ताबडतोब भिडल्यामुळे ते काम पूर्ण होते. आपले सर्व प्रयत्न एकत्र करणे, ताबडतोब मुद्द्यावर येणे आणि कामाच्या गाभ्याला हात करणे या गोष्टींना फार महत्त्व आहे. या गोष्टी जे करत नाहीत ते नमनालाच घडाभर तेल जाळतात.
जो झटपट निर्णय घेणारा माणूस असतो तो नेहमी कमी बोलतो. त्याच्या बोलण्याला वजन असते. जास्त बडबड करणारा नुसता शब्दबंबाळ असतो. त्याच्या बोलण्यातून त्याचा नक्की विचार समजत नाही. एखादा माणूस उत्तम उद्योजक आहे की नाही हे तुम्हाला त्याच्याशी पाच मिनिटे बोलल्यावर समजते. जो निश्चित निर्णय घेणारा आहे तो आपल्या कल्पना अगदी थोड्या शब्दात चांगल्याप्रकारे सांगु शकतो.
तुमचे व्यावसायिक ज्ञान, शिक्षण, हुशारी या गोष्टींचा निर्णयशक्तीशी संबंध नाही. निर्णयशक्ती ही वेगळीच गोष्ट आहे. निर्णय शक्ती अंगी बाणवता येते अर्थातच काहींच्याकडे ती जन्मजात असते आणि काहीजण स्वतःमध्ये ती विकसित करतात…
निर्णयक्षम व्हा…
व्यवसाय साक्षर व्हा…
(निर्णयशक्ती या पुस्तकातील सारांश )
_
उद्योजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील