लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
पिकतं तिथं विकत नाही असं म्हटलं जातं, आणि काही अंशी ते खरंच आहे.
आपण एखादा नवीन व्यवसाय सुरु करतो पण आपले मित्र नातेवाईक आपल्याकडे येतंच नाहीत, आपण एखादा घरगुती व्यवसाय सुरु करतो पण आपल्या कॉलनीतलेच लोक आपल्याकडे येत नाहीत, असं बऱ्याच जणांसोबत होतं. पण त्याच कारण आपल्या मानसिकतेमधे आहे. ज्यांना आपण नेहमीच पाहतोय, ओळखतोय त्यांची कोणतीही कृती आपल्याला कधीच कौतुकास्पद वाटत नसते. आपल्याला ते सवयीचे झालेले असतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे चांगला व्यावसायिक म्हणून पाहणे आपल्याला जमतच नाहीत. त्यांचं काहीतरी नक्कीच चुकलेल असणार आहे असाच समज करून घेतला जातो.
माझ्या जवळच्या कोणत्याही (किंवा ९०% म्हणूया) व्यक्तीने आजपर्यंत माझ्या कोणत्याही व्यवसायात ग्राहक म्हणून भूमिका बजावलेली नाही. कधी माझ्याकडून मी विकत असलेली कोणती वस्तू वा सेवा स्वतःहून घेतलेली नाही, किंवा माझ्याकडून व्यवसायासंबंधी कोणतेही मार्गदर्शन घेतलेले नाही. अगदी मी ज्या वस्तू सेवा विकतोय त्यासंबंधी मलाच चांगले सप्लायर कोण आहेत, (माझा व्यवसाय माहित असूनही) असे प्रश्न विचारले गेले आहेत, आणि मीही त्यांना इतरांचेच रेफरन्स दिलेले आहेत. अगदी माझ्या जवळचे जे काही नवीनच व्यवसायात उतरणारे तरुण आहेत त्यांनाही एक दोन वेळा काही महत्वाच्या गोष्टी सांगून पहिल्यात, पण त्यांनीही त्या कधी गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. याचं कारण, ते आपल्याला व्यावसायिक म्हणून ओळखत नसतात, त्यांच्यासाठी आपली ओळख एक सामान्य ओळख असते. त्याला काय एवढं कळतंय का, लहानपणापासून ओळखतोय त्याला… अशी मानसिकता असते.
हे जवळजवळ प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं. आपल्या जवळच्यांना आपल्या कामाची किंमत असते असं नसतं, तर आपल्याकडे खरंच असं काही घेण्यासारखं असू शकत हे त्यांना पटतच नाही. आपला तो बावळट आणि दुसऱ्याचा एकदम हुशार असाच विचार असतो.
यात आणखी एक विचार असतो. काहींना आपल्या जवळच्या लोकांकडून काही घेणे हे कमीपणाचे वाटत असते. मी व्यवसायाबद्दल अनोळखी व्यक्तीला काही सांगितले तर त्याला ते कदाचित चांगले वाटेल, पण माझ्या एखाद्या जवळच्याला काही सांगितले तर त्याला मी माझी अक्कल पाजळतोय आणि त्याचा अपमान करतोय असे वाटेल. आपण स्वतः सुद्धा बऱ्याचदा अशा पद्धतीने विचार करतो.
आपल्या जवळच्यांपेक्षा अनोळखी लोकांवर आपला विश्वास नेहमी जास्त असतो. कारण तो आपल्याला पूर्णपणे माहित नसतो, त्यामुळे पहिल्या दर्शनात तो आपल्याला जसा दिसेल तसा योग्यच वाटतो, पण ज्याला आपण कित्येक वर्षांपासून ओळखतोय त्याने कसेही प्रेझेंटेशन केले तरी आपण त्याच्या भूतकाळाशी ते जोडून पाहण्याचा प्रयत्न करत असतो, आणि तो प्रत्येक वेळेस नकारात्मकच असतो.
अनोळखी प्रदेशात जाऊन यशस्वी होणाऱ्यांचे प्रमाणही यामुळेच जास्त आहे. बाहेरून आलेल्या व्यावसायिकांवर, कामगारांवर ग्राहकांचा विश्वास लवकर बसतो. त्यांची पार्श्वभूमीचा माहित नसताना त्यांच्याबद्दल आडाखे बंधने अशक्य होऊन जाते, अशावेळी ते जे दाखवतील त्यावरच नकळतपणे विश्वास ठेवला जातो.
त्यामुळे आपल्या व्यवसायाला आपल्याच लोकांकडून कमी प्रतिसाद मिळतो म्हणून नाराज होऊ नका. त्यांच्या दृष्टीने आधी आपण पाच-दहा वर्षापूर्वीचे बालिश आणि टवाळखोर कॉलेजकुमार आहोत, मग व्यावसायिक. आपण गांभीर्याने घ्यावं असं कुणीतरी आहोत आहोत हे आपल्या लोकांना जरा उशिरा लक्षात येत असतं.
याच कारणामुळे आपले पहिले ग्राहक आपले नातेवाईक किंवा मित्र असतील अशा भ्रमात कधी राहू नका हे सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. बरयाच जणांना,प्राथमिक ग्राहक आपले नातेवाईक आणि मित्र निवडल्यामुळे फटका बसतो, कारण त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद कधीच मिळत नसतो. ते आपले ग्राहक होऊ शकतील, पण तेव्हाच जेव्हा आपण खरंच त्यात यश मिळवलंय यावर त्यांचा विश्वास बसेल. आणि हा विश्वास बसायला सामान्यांपेक्षा किमान पाचपट वेळ जास्त लागतो.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
हि मराठी माणसाची खेकडा प्रव्रुत्ती म्हणता येईल। प्रकार गुजराती, पंजाबी लोकांत दिसत नाही।
Nice&perfect explanation
खुपच छान मार्गदर्शन केलत आपण…..यामुळे नक्कीच नव्या व्यवसायीकांना प्रोत्साहन मिळेल……आत्मविश्वास वाढेल…..धन्यवाद 🙏😊