युवा उद्योजकांनो, लग्नाचे नियोजन करताना या गोष्टी विचारात घ्या.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : संदीप डांगे
======================

काल माझ्या एका जवळच्या मित्राशी गप्पा मारतांना नेहमीप्रमाणे मुलाबाळांचा, घरसंसाराचा विषय निघाला. मित्र उद्योजक आहे, अजून खूप मोठा झाला नसला तर खूप धडपड्या आणि चांगला कलाकार आहे. स्वतःचा व्यवसाय असावा ह्याबद्दल त्याचे पूर्वीपासूनच ठाम मत होते. अगदी कलाक्षेत्रात असली तरी नोकरी करणारच नाही हे पक्के होते. कलेच्या क्षेत्रात वैयक्तिक फ्रीलान्स व्यवसाय हा काही खात्रीचा आणि नियमित आर्थिक स्रोत असणारा प्रकार नसतो. त्यामुळे आर्थिक बाबतीत परिस्थिती दोलायमान राहणार आहे हेही ठावूक होते. ‘सेटल्ड’ अशी परिस्थिती शक्यतो घरातून पहिल्याच असलेल्या उद्योजकांच्या बाबतीत पस्तीशी-चाळीशीपर्यंत येत नाही. पण योग्य वेळी लग्न करणे तर आवश्यक असते. कुटूंबाचा दबाव असतो. त्यामुळे लग्नासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम जेव्हा सुरु झाला तेव्हा ह्याने काही गोष्टी स्पष्ट केल्या. त्यातली एक महत्त्वाची होती ती म्हणजे मुलगी अशा घरातून नको जिथे परंपरागत नोकरीचे वातावरण आहे. मुलीचे आई-वडील, काका, मामा वगैरे गोतावळा सरकारी किंवा खाजगी कोणत्याही प्रकारच्या नोकरीत आहे असे वातावरण असले तर त्यांची विचारसरणी वेगळी पडते. उद्योजकीय वातावरणात त्यांना जुळवून घेणे अतिशय कठिण जाऊ शकते. मला त्याचे हे विचार खूपच वेगळे आणि महत्त्वाचे वाटले. बाकी कोणत्याही गोष्टीत मतभेद, मतभिन्नता असली तरी आर्थिक बाबतीत दाम्पत्यांचे खटके उडत असतील तर ती फार विचित्र परिस्थिती होते.

नोकरी असणार्‍या घरात महिन्याच्या ठराविक तारखेला अमूक एक रक्कम येणार म्हणजे येणारच अशी शंभर टक्के खात्री असते. नोकरदाराचे आणि त्याच्या कुटूंबातल्या सर्वच सदस्यांचे सर्व आयुष्य त्या एका तारखेभोवती, त्या एका आकड्याभोवती गुंफलेले असते. लहानपणापासून ह्या सेटींगमध्ये आयुष्य गेले असते. महत्त्वाचे म्हणजे कळायला लागायच्या आधीपासूनच त्या वातावरणात वाढलेले असल्याने नकळत मानसिकता तशी बांधली गेलेली असते. अर्थात हा काही नैसर्गिक नियम नाही, अपवाद असतात. पण बहुतांश परिस्थिती अशी असते. आयुष्याची पंचवीस वर्षे अशा गारंटीड इन्कम असलेल्या सेट-अप मध्ये घालवल्यावर अचानक प्रचंड वेगळ्याच वातावरणात फेकल्या गेल्याने मुलीला त्या वातावरणाशी जुळवून घेणे जमेलच असे नसते. महिन्याला अमूक इतके पैसे येतीलच अशी कोणतीही खात्री नसते. कधी आणि किती पैसे येतील ह्याची खात्री नसते. आले तर खूप येतात किंवा बरेच दिवस एक रुपयाही शिल्लक नसतो अशी परिस्थिती असते. खर्चाचे नियोजन करणे, कोणता खर्च कधी करायचा, करायचा की नाही ह्याचे विचार करावे लागतात. अनेकदा पैसे येतील म्हणून केलेले नियोजन ऐनवेळी रद्द करावे लागते. ह्या सर्व गोष्टी मानसिक पातळीवर हाताळणे फार फार कठीण असते.

तरुण उद्योजकाच्या आयुष्यातला हा सुरुवातीचा काळ असतो. बर्‍याच गोष्टी स्थिरस्थावर झालेल्या नसतात. आर्थिक फसवणूक, अंदाज चुकणे, अपयश हा पहिल्या काही वर्षातला अटळ भाग असतोच असतो. हीच नेमकी वर्षे लग्नाच्या सुरुवातीची असतात, ज्या काळातल्या इच्छा, आकांक्षा, काही वेगळ्या स्वप्नवत पातळीवर असतात. तेव्हा ती स्वप्ने पूर्ण होत नसतील तर साहजिक संबंधांत वितुष्ट येऊ शकते. दुसर्‍याने आपल्याला समजून घ्यावे हे नेहमीच आपण गृहित धरु शकत नाही. अमक्या-तमक्याच्या बायकोने कसा आधार दिला, सांभाळून घेतले वगैरे किस्से आपल्या स्वतःच्या काही उपयोगाचे नसतात. आपल्याला आपला स्वतःचा संसार एका वेगळ्या व्यक्तीबरोबर करायचा असतो. तिला तिच्या स्वतःच्या इच्छा-स्वप्ने असतात. ती आपल्याला सांभाळून घेईल असे गृहित धरणे अयोग्य असते. हा सर्व भावभावनांचा पसारा प्रत्येक व्यक्तीला सदासर्वकाळ हाताळता येणे आणि शांत राहून सहन करणे शक्य होईलच असे नसते. अशावेळी उद्योजक दुहेरी संकटात सापडू शकतो. उद्योगातला ताण-तणाव आणि कुटूंबातला ताण-तणाव दोन्ही पातळीवर दोन लढाया लढणे मानसिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक असते. प्रचंड प्रेम आहे म्हणून कोणी सहन केलं जरी तरी हा सहन करण्याचाही मानसिक ताण त्या व्यक्तीवर येतो व कालांतराने तो इतर बाबतीत डोकावू लागतो. शारीरिक आजारपणे, मानसिक आजार उद्भवू शकतात.

उद्योगव्यवसायांची परंपरा असलेल्या घरांमधून, जसे की गुजराती, मारवाडी, सिंधी, जैन इत्यादी हे प्रश्न सहसा आढळत नाहीत. कारण त्यांचे लहानपणापासून त्यादृष्टीनेच संगोपन, संस्कार झालेले असतात. त्यामुळे दुकान, धंदा सांभाळायला ह्या घरांमधून अधिकाधिक स्त्रिया पुढाकार घेऊन योगदान देत असतात, आर्थिक व्यवहार सांभाळत असतात हे दिसून येते. मराठी घरांमधून हे अजून तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. अगदी पारंपरिक दुकाने-व्यवसाय असलेल्या मराठी घरांमधूनही स्त्रिया उद्योग सांभाळतांना फारशा मला दिसलेल्या नाहीत. (माझे निरिक्षण चुकीचे असू शकते. माझ्याकडे आकडेवारी नाही.)

तर मुद्दा असा आहे की लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आपले लग्न केवळ आपल्यासाठी नसते तर ज्याच्या/जिच्यासोबत लग्न करतोय त्या व्यक्तीसाठीही महत्त्वाचे असते. त्यामुळे उद्योजकाने लग्नासंबंधी विचार करतांना ह्या सर्व पार्श्वभूमीचा जरा खोलात विचार करावा. आपल्या होणार्‍या पत्नीला आपण जे धगधगते आयुष्य अंगिकारले आहे त्याची स्पष्ट कल्पना द्यावी. तुमच्या मनात बिझनेसच करायचा आहे असे विचार असतील तर ते आधीच स्पष्ट करावे. जरी तुम्ही सुरुवातीचा काही काळ नोकरी करत असाल आणि काही काळाने स्वतःचा व्यवसाय सुरु करणार असाल तरीही ते स्पष्ट केले पाहिजे. काही लोक लग्न होण्यापुरते कुठेतरी नोकरी धरतात आणि एकदा लग्न झाले की मग खरे दात दाखवतात तसे अजिबात करु नये. एका व्यक्तीच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचा आपल्याला कोणताही हक्क नसतो. ‘नंतर होईलच सगले नीट’, ‘काही झाले तरी ती कुठे जाणार, तीला अ‍ॅडजस्ट करावे लागेलच’ अशा भ्रमात राहू नये. लव असो की अरेंज, शेवटी लग्न हा करार आहे. दोघांचा समान अधिकार आहे. सर्व अटी-शर्ती सुरुवातीलाच स्पष्ट करणे आवश्यक आहे. कोणालाही फसवून लग्न करणे अंतिमतः कोणाच्याही फायद्याचे ठरत नाही.
_

संदीप डांगे
नाशिक

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


3 thoughts on “युवा उद्योजकांनो, लग्नाचे नियोजन करताना या गोष्टी विचारात घ्या.

  1. खूप छान या टॉपिक वर मी विचार करत होतो, माझा पण बिझनेस आहे तर मला पण अशीच काही प्रश्न पडले होते.
    धन्यवाद एक विचार मिळाला मला.

    1. माझ्या पाहणी मध्ये महाराष्ट्रातील महिला व्यवसाय उत्तम पद्धतीने पाहत आहे. माझ्या ओळखीत पुणे शहरातील बऱ्याच महिला उद्योजक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!