लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
व्यवसाय करत असताना खूप वेळा आपला स्वतःवरील ताबा सुटू शकेल अशी परिस्थिती निर्माण होते. कधी ग्राहकांच्या चुकीच्या वागण्यामुळे, कधी आर्थिक अडचणीमुळे, कधी कौटुंबिक कारणांमुळे तर कधी सरकारी अधिकाऱ्यांच्या छळामुळे, बरीच कारणं असतात.
या त्रासाचे प्रमाण वाढले तर आपला स्वतःवरील ताबा सुटण्याची शक्यता असते. ताबा सुटतो म्हणजे काय होते? तर आपण नकळतपणे ग्राहकांना काहीतरी चुकीचे बोलून जातो, आर्थिक निर्णय चुकीचे घेतो, व्यवसायातील निर्णय अविचारीपणाने घेतो, टेन्शनमधे काहीवेळेस कुटुंबातील सदस्यांना चुकीचे बोलतो, सरकारी अधिकाऱ्यांना चुकीचे बोलून जातो, आपण नकळतपणे आपल्याच व्यवसायाला घातक ठरतील अशा कृती करून बसतो.
कौटुंबिक वादविवाद आपल्या व्यवसायावर सर्वात जास्त परिणाम करतात. मध्यमवर्गीय व्यावसायिकांचे आपल्या कुटुंबातील सदस्यांशी न पाडण्याचे प्रमाण जास्त आहे. कुटुंबातील सदस्यांच्या काही अपेक्षा असतात, तर व्यावसायिकाच्या दृष्टीने मी एवढं काम करतो कुटुंब मला समजून घेत नाही अशी मानसिकता असते.
तरुण उद्योजकांचं कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे, खास करून आईवडिलांशी होणारे वादविवाद. घरच्यांनी व्यवसायाविषयी काहीही विचारलं तर त्याला सरळ उत्तर देण्यापेक्षा झिडकारण्याकडेच कल असतो. व्यवसाय सुरु करताना उत्पन्नाचे आकडे मांडलेले असतात, ते आकडे पूर्ण होत नाही, मग टेन्शन येतं, हे टेन्शन काढण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे आई-वडील. २५-३० वयातील नवउद्योजकांची मानसिकता असते कि घरच्यांनी मला व्यवसायाबद्दल काहीच विचारू नये. त्यांना व्यवसायातलं काही कळत नाही, पण प्रश्नच खूप विचारतात. बऱ्याच यामागे स्वतःबद्दलची अपयशाची भावना असते. मी ज्या विचाराने व्यवसायात आलो ते काही मिळत नाहीये, मग यासाठी कुणालातरी दोषी ठरवता आलं पाहिजे, तो दोष कुटुंबावर ढकलला जातो.
कित्येकदा कुटुंबियांकडून अवास्तव अपेक्षा केल्या जातात, किंवा आपल्या मित्रांशी तुलना केली जाते. व्यवसायाला पाठिंबा नसतो, आपल्या हट्टापायी पैसे दिलेले असतात, मग आपल्या मित्रांच्या नोकरीच्या पगाराचे आकडे सांगून टोमणे मारले जातात. यावरूनही घरात बऱ्याचदा वादविवादाचे प्रसंग उद्भवतात.
कारण काहीही असो, अशावेळी आपला संयम सुटतो आणि आपण नकळतपणे आपल्याच व्यवसायाला त्रासदायक होईल अशा कृती आपण करून बसतो.
इतर प्रसंगात निभावून जातं. पण कौटुंबिक कारणामुळं व्यवसाय अक्षरशः संपू शकतो. कौटुंबिक वादविवादांमुळे व्यवसायात बिलकुल लक्ष लागत नाही. व्यवसायाकडे दुर्लक्ष होते. रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जातात. मानसिक त्रास वाढतो. कर्मचाऱ्यांशी ग्राहकांशी आपली वागणूक बदलते, कित्येकवेळा आक्रमक होते. या सगळ्याचा परिणाम आपल्याच व्यवसायावर होते.
आपल्याला आपल्या मनावर आणि विचारांवर ताबा ठेवता आला पाहिजे.
ग्राहक खूप बोलतोय, बोलू द्या, दहा मिनिटं बोलेल आणि निघून जाईल,यापेक्षा जास्त काही होणार नाही, शांतपणे ऐकून घ्या.
आर्थिक अडचण सर्वांनाच असते, गरिबाला त्याच्या कुवतीप्रमाणे अडचण असते तर श्रीमंतांना त्यांच्या कुवतीप्रमाणे आर्थिक अडचण असते, त्यामुळे टेन्शन घेण्यापेक्षा नियोजन करण्यावर भर द्या.
सरकारी अधिकारी त्रास देण्यासाठीच असतात. त्यांनां अंगावर घेण्यापेक्षा त्यांच्यापासून लांब कसं जात येईल याचा विचार करा.
कौटुंबिक वाद होऊ न देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कोणत्याही वादविवादाच्या प्रसंगात शांत बसणे. प्रत्युत्तराने वाद वाढतात, त्यापेक्षा शांत बसल्याने, पडती भूमिका घेतल्याने वाद आहे तिथेच थांबतात.
कुटुंबीयांसमोर वर्चस्वाचा संबंध नसतो, त्यामुळे पडती भूमिका घेतल्याने अपमान होत नसतो.
नवउद्योजकांनी घरच्यांच्या शंकांना उत्तरे देणे योग्य, आणि टोमणे मारले जात असतील तर शांतपणे ऐकून घेणे आणि आपला व्यवसायाचा निर्णय योग्य होता हे कृतीतून सिद्ध करणे योग्य.
या गोष्टींना जेवढं कॅज्युअली घ्याल तेवढे टेन्शनफ्री राहाल. आणि जेवढे टेन्शन फ्री राहाल तेवढं व्यवसायाकडे लक्ष देऊ शकाल.
मनावर ताबा ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. चिडचिड होऊ देऊ नका. कुणावर राग काढू नका. कुणाशी तिरकस किंवा उद्धट बोलू नका. गोष्टी सोडून द्यायला शिका.
विचारांवर नियंत्रण ठेवा. त्रासदायक आठवणी उगाळू नका. नकारात्मक विचार करू नका. काही कटू प्रसंग उद्भवले तरी ते तिथेच सोडून द्या, उगाच त्यावर चिंतन करत बसू नका.
तुम्ही स्वतःला जेवढं तणावमुक्त ठेवाल, तेवढं व्यवसायावर लक्ष केंद्रित करायला मदत होईल.
व्यवसायात यशस्वी होण्यासाठी तणावमुक्त असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी स्वतःच्या मनावर आणि विचारांवर ताबा असणे आवश्यक आहे.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राही
great information sir