लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
लॉकडाऊन मधे ज्यांना ज्यांना पैशाची तंगी जाणवायला लागली आहे, ज्यांना आपले काम किंवा व्यवसाय थांबल्यामुळे आता पैसा कुठून येणार असा प्रश्न पडला आहे, ज्यांना आता नोकरी गेल्यावर घरी पैसा कसा येणार असा प्रश्न पडला आहे, ते सर्वजण अर्थसाक्षतेच्या बाबतीत पिछाडीवर आहेत.
या लॉकडाऊनच्या निमित्ताने आपल्याकडे कायमस्वरूपी उत्पन्न देणारे, आपण गुंतून न राहताही आपल्या अकाउंटमधे वेळच्यावेळेला पैसा जमा करणारे, आर्थिक अडचणीच्या वेळी कामी येणारे उत्पन्नाचे स्रोत किती महत्वाचे आहेत, तसेच गुंतवणूक किती आवश्यक आहे हे आता आपल्या लक्षात आले असेल.
आता लॉकडाऊन उठल्यानंतर पुढच्या पाच वर्षांसाठी एक उद्दिष्ट निश्चित करा. आपल्याकडील संपत्ती वाढवायची आहे. उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करायचे आहेत. वेगवगेळ्या मार्गांनी गुंतवणूक वाढवायची आहे. कोणत्याही परिस्थितीत पुढच्या पाच वर्षानंतर सहा महिने काम बंद राहिलं तरी तुम्ही आर्थिक अडचणीत येणार नाही अशा प्रकारे आपल्या उत्पन्नाचे आणि गुंतवणुकीचे नियोजन करा.
गुंतवणुकीची काही उदाहरणे पाहू. तुम्ही पैसे साठवून एखादे लहानसे शॉप घेतलेले आहे. तर त्या शॉप चे एखाद्या लहान शहरातही तुम्हाला कायमस्वरूपी ५-१० हजार भाडे मिळत राहते. एखादा फ्लॅट घेतलेला असेल तर त्याचेही भाडे मिळत राहते. जर तुमच्याकडे सोने असेल तर अडचणीच्या वेळी तुम्हाला सोने तारण ठेऊन कर्ज मिळू शकते. तुमची शेअर्स मधे गुंतवणूक असेल तर दरवर्षी तुम्हाला डिव्हीडंड मिळत राहतो, सोबतच बोनस शेअर्स मिळतात, आणि भाव वाढल्यावर विकल्यास चांगला नफाही मिळतो. एखाद्या प्रॉपर्टीमधे गुंतवणूक असेल तर तिचे भाडे मिळत राहते. एखाद्याच्या व्यवसायात गुंतवणूक करून स्लीपिंग पार्टनर असाल तर त्यातून कायमस्वरूपी काहीतरी उत्पन्न मिळत राहते.
थोडक्यात अशा ठिकाणी पैसा गुंतवलेला असावा जो आपण त्यात सक्रिय नसतानाही आपल्याला थोडाफार तरी पैसा देत राहील. प्रॉपर्टीसाठी रक्कम मोठी लागते पण सोने, शेअर्स यात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करता येते. इतरांच्या व्यवसायात गुंतवणूक थोडक्यात होऊ शकते. पण कोणत्याही परिस्थतीत तुम्हाला या सर्व गुंतवणूक काहीतरी उत्पन्न देत राहतात सोबतच दरवर्षी यांचे मूल्य वाढतच राहते.
खरं तर महिन्याच्या उत्पन्नापैकी किमान २५-३०% रक्कम गुंतवली पाहिजे, पण आपण हे उद्दिष्ट आणखी एक वर्षाने काही काळासाठी ५०% पर्यंत वाढवणे आवश्यक आहे. कोरोनामुळे उद्भवलेली आर्थिक आणीबाणीची परिस्थिती दुर्मिळ असली तरी आपण लाखातील एक शक्यता गृहीत धरून कोणत्याही परिस्थितीसाठी नेहमी तयार राहणे आवश्यक असते. या लॉकडाऊन च्या निमित्ताने आपल्या पैकी बऱ्याच जणांना आपल्या अर्थीक क्षमतेचा अंदाज आलेला असेल. कारण अशी परिस्थिती दहा वीस वर्षातून एकदा उद्भवते. त्यामुळे बऱ्याच व्यावसायिकांसाठी हि पहिलीच वेळ आहे. अशावेळी आपल्याला आपल्या आर्थिक नियोनजनामधे काय बदल करावे लागतील, गुंतवणुकीचे नियोजन कसे करावे लागेल, उत्पन्नाचे स्रोत कसे वाढवावे लागतील, पुढच्या पाच वर्षांमधे आपल्याला आपल्या आर्थिक स्थितीमधे काय बदल करावे लागतील अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करण्याचा प्रत्येक व्यावसायिकाने प्रयत्न करावा. महिना-दोन महिने तसंही आपल्याला विशेष काही काम नाहीये. या काळात स्वतःचे आर्थिक परीक्षण करण्याची चांगली संधी आपल्याकडे आहे.
जर कुणाला असं वाटत असेल कि आत्ताच परिस्थिती एवढी वाईट असताना पुढच्या पाच वर्षांचे नियोजन कसे करावे तर अशांनी लक्षात घ्यावे कि काळ कुणासाठी थांबत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने काहीतरी करताच असतो. बसून कुणीच राहत नाही. त्यामुळे आजची परिस्थिती खराब असली तर पुन्हा काम सुरु झाल्यांनतर एक दोन वर्षात पुन्हा सर्वकाही सुरळीत होणारच आहे. अशावेळी आत्तापासूनच सुरळीत झाल्यानंतर काय करायचे याचे नियोजन हाती असल्यास त्यात नुकसानकारक काहीच नाही, उलट आपले उद्दिष्ट स्प्ष्ट असल्याने आपल्याला काय करायचे हेसुद्धा स्पष्ट असते. साहजिकच यामुळे आपली कार्यक्षमता आणखी वाढण्यास मदत होते.
यासोबतच महत्वाचे, यावर्षीचा IT रिटर्न सुद्धा चांगला भरा. यात कठेही कमी पडू नका. बँकेतील आर्थिक व्यवहार चांगले फिरते ठेवा. वर्ष- दोन वर्षांनी कामी येतील. आणि मुख्य म्हणजे व्यवसायाची उलाढाल वाढवण्यावर भर द्या.
अर्थसाक्षर व्हा…
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील