‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : निलेश तावडे
======================
‘म्युच्युअल फंड सही है’ ह्या जाहिरातीने गेल्या २-३ वर्षात गुंतवणूकदारांचे चांगले प्रबोधन केले. त्याच बरोबर बऱ्याचश्या आर्थिक नियोजकांनी आपल्या गुंतवणूकदारांना, शेयर बाजारातील अस्थिरता आणि जोखीम कमी करण्या करिता म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एस आई पी च्या माध्यमातून करण्याचा सल्ला वेळोवेळी दिला.
AMFI च्या आकडेवारीनुसार २०१८-१९ साली एस आई पी चे २.६९ करोड खाती होती व वर्षभरात साधारण रु.९२,६९३ करोड म्युच्युअल फंड मध्ये जमा झाले. मार्च २०१९ शेवटी, फक्त एस आई पी मार्फत गुंतवणूक करणाऱ्यांचा एकूण निधी रु.२.६६ लाख करोड इतका होता. वर्ष २०१९-२० ह्या काळात एस आई पी च्या खात्यांमध्ये आणखी भर पडून ती आता साधारण ३.०९ करोड खाती झाली. मार्च २०२० सरते शेवटी फक्त एस आई पी मार्फत गुंतवणूक करणाऱ्यांचा निधी वाढून साधारण रु ३.२० लाख करोड होईल.
एस आई पी मार्फत गुंतवणूक केल्यास आपण जोखीम कमी करू शकतो. मात्र त्या जोडीला चांगला परतावा मिळविण्यासाठी आणखी काय करता येईल ते आपण पाहू. एस आई पी मार्फत म्युच्युअल फंडात जोडल्या गेलेल्या नवनवीन गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाबद्दल विश्वास आणखी कसा वाढेल हा ह्या लेखामागचा उद्देश.
आताच COVID -१९ ह्या जागतिक महामारी मूळे जगातील सर्वच शेयर बाजार अचानक खाली आले. अगदी २० दिवसात ३५-४०% खाली आले. मागील २-३ दशकातील कोसळल्या बाजाराचा इतिहास पाहिल्यास असे लक्षात येते कि आर्थिक / सामाजिक / नैसर्गिक आपत्ती ओढावल्यावर बाजार खाली येतात, मात्र आपत्ती नाहीशी झाली कि ६-८ महिन्यात बाजार पूर्वपदावर येतात व तिथून आणखी वर जातात. त्यामुळे कोणत्याही गुंतवणूकदाराने गोंधळून न जाता आपली गुंतवणूक कायम ठेवावी.
गेल्या २-३ वर्षात जे नवीन गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाशी जोडले गेले आहेत त्यांच्यासाठी हा पहिलाच अनुभव असेल. मात्र त्यांनी म्युच्युअल फंड क्षेत्राचा इतिहास तपासावा आणि आपला विश्वास वाढवावा. ह्या वेळच्या बाजारातील पडझड इतकी झटपट होती कि गेल्या ५ वर्षांपासून जे म्युच्युअल फंडात एस आई पी करीत आहेत त्यांचा आताचा परतावा सुद्धा ऋण (Negative) आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराने गेले ६० महिने नित्यनेमाने एस आई पी चालू ठेवली त्यांना असा परतावा पाहून दुःख नक्कीच वाटेल.
आपल्या दीर्घकालीन एस आई पी मध्ये आपण आपला परतावा आकर्षक कसा करू शकतो हे आपण जाणून घेऊ. त्यासाठी सर्वप्रथम एस आई पी च्या व्याख्येची पुन्हा एकदा उजळणी करू. “एस आई पी गुंतवणुकीतून बाजार जेंव्हा खालच्या पातळीवर असतो तेंव्हा आपल्याला जास्त युनिट्स मिळतात, व जेंव्हा बाजार वर जातो तेंव्हा आपल्या जमा झालेल्या युनिट्स चे बाजार मूल्य वाढते.” म्हणजेच बाजार जेंव्हा खालच्या पातळीवर असतो तेंव्हा आपल्याला जास्तीचे युनिट्स कसे मिळतील याकडे आपण लक्ष द्यायला हवे. त्यासाठी आपण गेल्या १५ वर्षातील एस आई पी चा इतिहास पाहू, कि जेंव्हा जेंव्हा बाजार १०-१५% पेक्षा खाली आल्यानंतर जर आपण जास्त युनिट्स मिळवण्यासाठी आपली एस आई पी ची गुंतवणूक वाढविली तर आपल्या एस आई पी तुन आपला परतावा कसा राहिला असता. दरवषी आपले उत्पन्न हे वाढत असते त्यामुळे, ठराविक कालावधीमध्ये एस आई पी ची रक्कम वाढविणे सहज शक्य आहे.
म्युच्युअल फंडाच्या लार्ज कॅप कॅटेगरी च्या फंडात समझा दि ०१/०४/२००५ रोजी रु ५००० ची एस आई पी चालू केली असती तर आज दि.२९ मार्च रोजी त्याच्या मूळ गुंतवणूक जी रु.९,००,००० होती त्याची वाढ होऊन ती रु.१८,३९,२५१ झाली. जर आपण परतावा पहिला तर तो ९.०४% CAGR इतका राहिला. ह्या १५ वर्षाच्या काळात शेयर बाजार अनेकदा खाली हि आला. मार्च २००९, जानेवारी २०१२, फेब्रुवारी २०१६, सप्टेंबर २०१८ ह्या महिन्यांमध्ये बाजार खालच्या पातळीवर आला होता. ह्या ४ हि वेळेला बाजारातील पडझडीला न घाबरता आपण आपल्या एस आई पी च्या १२ हप्त्यांइतकी म्हणजेच रु.६०,००० ची एक रकमी अतिरिक्त गुंतवणूक केली असती, तर मार्च २०२० मध्ये आपली मूळ गुंतवणूक रु.२,४०,००० वाढून रु.४,८१,१३३ झाली असती. ज्याचा परतावा साधारण १०.६५% CAGR इतका होता. दीर्घकालीन एस आई पी व त्याच्या जोडीला पडत्या बाजारात एक रकमी गुंतवणूक करून आपण आपला परतावा निश्चितच वाढवू शकतो.
कोरोना च्या भीतीने पडलेल्या बाजारात आपल्या एस आई पीच्या १२ ते १८ हप्त्यांची अतिरिक्त एकरकमी गुंतवणूक करा आणि जास्तीत जास्त युनिट्स संग्रहित करा. ज्यांना एकरकमी गुंतवणूक करणे शक्य नसेल त्यांनी आपली एस आई पी एक वर्ष करिता दुप्पट किंवा तिप्पट करून जास्तीत जास्त युनिट्स मिळवण्याचा प्रयत्न करावा. येणाऱ्या काळात बँकांचे व्याज दर आणखी खाली जातील तेंव्हा म्युच्युअल फंड हाच पसंतीचा गुंतवणूक पर्याय राहील, तेंव्हा बाजारातील चढ उताराचा धैर्याने आणि संयमाने सामना करा, आपली आर्थिक उन्नती करा.
( लेखातील उदाहरणात १५ वर्ष परताव्यात नंबर एक चा फंड घेतला आहे. त्या फंडाची मधल्या काळातील किंवा येणाऱ्या काळातील कामगिरी मध्ये सातत्य राहिलच याची खात्री नाही. आकडेवारी साभार www.advisorkhoj.com वरून) म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हि बाजार जोखिमेचा अधीन असते. योजने संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा
धन्यवाद.
निलेश तावडे
लेखक हे २० वर्ष म्युच्युअल फंड मध्ये कार्यरत होते सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत
[email protected]
९३२४५४३८३२
www.nileshtawde.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील