गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील प्रगल्भ विश्वास


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : निलेश तावडे
======================

मार्च २०२० आर्थिक वर्ष सरले आणि गुंतवणूक विश्वाचे मागील वर्षाचा आढावा घेणारे अहवाल आता येऊ लागलेत. म्युच्युअल फंड क्षेत्राशी निगडित आकडेवारीचा आपण येथे आढावा घेऊ.

गेल्या ४ वर्षात , म्युच्युअल फंड क्षेत्रातील फंड घराणे/ वितरक / असोशिएशन ऑफ म्युच्युअल फंड ह्या सर्वानी गुंतवणूकदारांच्या केलेल्या प्रबोधनामुळे म्युच्युअल फंड सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूक मालमत्ता वर्ग ठरला. प्रबोधनाचे कार्य इतके प्रभावी झाले कि, शेयर बाजारातील जोखीम कशी कमी करायची / गुंतवणूक अधिक कर प्रभावी होण्यासाठी कोणते गुंतवणूक पर्याय स्वीकारायचे / पडत्या बाजारात गुंतवणूक वाढवून अधिक युनिट्स कसे मिळवायचे याबाबतचे मार्गदर्शन गुंतवणूकदारांना वेळोवेळी झाले. गुंतवणूकदार हि आपल्या गुंतवणूक अनुभवातून अधिक प्रगल्भ झाले आहेत. जुन्या काळातील म्युच्युअल फंडाबद्दलची अनास्था आता बऱ्याच अंशी नाहीशी होऊन नवनवीन गुंतवणूकदार आता म्युच्युअल फंडात जोडले जात आहेत.

मार्च महिन्यातल्या कोरोना च्या आघाताने शेयर बाजार अगदी ३५% कोसळला तरी हि मार्च २०२० मधील समभाग योजनांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढत राहिला. विशेष म्हणजे मार्च महिन्यातील शेवटचे ९ दिवस टाळेबंदी मध्ये गेल्यानंतर हि हा गुंतवणुकीचा ओघ, त्यांचा म्युच्युअल फंड वरील प्रगल्भ विश्वास दर्शवितो. गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यातील शेवटच्या ९ दिवसात ऑनलाईन गुंतवणूक पद्धती अवलंबून पडत्या बाजारात जास्त युनिट्स मिळवण्यासाठी समभाग योजनांमध्ये गुंतवणूक केली. साधारण ५-६ वर्षांपूर्वी ऑनलाईन गुंतवणूक करणाऱ्याचे प्रमाण अगदी नगण्य ०.५% होते ते आता १४% पर्यंत गेले आहे. जोडीला म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांची दुपटीने वाढ झाली आहे.

येणारा काळ हा सरकारच्या डिजिटल इंडिया स्वप्नपूर्तीसाठी पूरक असेल हे हि यातून अधोरेखित होते. मार्च २०२० महिन्यात म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनांमध्ये तब्बल रु ११,४८४ करोड ची निव्वळ वाढ झाली. AMFI ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी २०२० अखेर म्युच्युअल फंडाची एकूण गंगाजळी रु. २७.२२ लाख करोड होती, मार्च २०२० अखेर ती रु. २२.२६ लाख करोड इतकी होती. प्रत्येक तिमाहीच्या शेवटी बँका आणि काही संस्थागत गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढतात व नवीन तिमाहीच्या सुरवातीला पुन्हा गुंतवणूक करतात. तसेच COVID-१९ च्या भीतीने जागतिक शेयर बाजार साधारण ३५-४०% खाली आले. म्हणजेच म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे बाजारमूल्य खाली आले त्यामुळे म्युच्युअल फंडाच्या मार्च अखेरीला गंगाजळीत घट झालेली दिसते. मात्र एकंदर सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा गुंतवणुकीचा ओघ वाढता राहिला.

समभाग योजनांतील मार्च’२० महिन्यातील गुंतवणुकीचा ओघ हा फेब्रुवारी’२० महिन्यातील गुंतवणुकीपेक्षा ७% जास्त राहिला. सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यामध्ये म्युच्युअल फंडाच्या ELSS कॅटेगरी मध्ये कलम ८०C अंतर्गत कर बचतीसाठी मोठी गुंतवणूक होते. मार्च २०१९ मधील ELSS गुंतवणूक हि साधारण रु.२७४२ करोड इतकी होती, मात्र मार्च २०२० महिन्यातील ELSS गुंतवणूक रु.१५५१ करोड इतकी राहिली. टाळेबंदीमुळे बऱ्याच जणांना ELSS गुंतवणूक मार्च महिन्यात करता आली नाही, आता सरकारने हि मुदत वाढवून जुन २०२० पर्यंत केल्याने ELSS कॅटेगरी मध्ये येणाऱ्या २ महिन्यात गुंतवणूक वाढेल.

गुंतवणूकदारांच्या सर्वाधिक पसंतीच्या एस आई पी सुविधेमार्फत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा आलेख चढता राहिला. मार्च महिन्यातील शेयर बाजाराच्या आपटीनेहि गुंतवणूकदार डगमगले नाहीत, त्यांनी आपल्या प्रगल्भतेचे दर्शन घडवले. नवीन गुंतवणूकदारांनी हि धैर्य दाखवून आपल्या एस आई पी चालू केल्या. मार्च २०२० मधील फक्त एस आई पी मधून येणारा गुंतवणुकीचा ओघ हा विक्रमी रु. ८६४१ करोड इतका राहिला. पूर्ण आर्थिक वर्षात फक्त एस आई पी द्वारे म्युच्युअल फंडात रु. १,००,०८४ करोड गुंतवणूक आली. मागील आर्थिक वर्ष २०१८-१९ ( रु. ९२,६९३ करोड) पेक्षा ती साधारण ८% अधिक राहिली. ह्याच काळात एस आई पी गुतंवणूकदारात साधारण १९% ने वाढ झाली, म्हणजेच नवीन गुंतवणूकदार झपाट्याने म्युच्युअल फंडाकडे जोडले जात आहेत. मागील इतिहास पहिला तर २०१६-१७ च्या आर्थिक वर्षात एस आई पी मधून आलेली गुंतवणूक रु. ४३,९०० करोड होती, ह्या आर्थिक वर्षाच्या शेवटी ती रु. १ लाख करोड पार झाली. साधारण ३.१२ करोड इतके गुंतवणूकदार दरमहा एस आई पी द्वारे गुंतवणूक करतात. गेल्या आर्थिक वर्षात सरासरी ९.९५ लाख नवीन गुंतवणूकदार दरमहा म्युच्युअल फंडाच्या एस आई पी मार्फत जोडले गेले ज्यांची सरासरी एस आई पी रु २७५० ची आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार इतक्या मोठ्या संख्येने जोडले जाणे, हि आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने खूप महत्वाची बाब आहे.

मार्च २०२० महिन्यातील बाजाराच्या पडझडीत विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी तब्बल रु. ६५,३७१ करोडची गुंतवणूक काढून घेतली, मात्र म्युच्युअल फंडांनी रु. ३२,४४८ करोड ची समभागांमध्ये गुंतवणूक करून बाजार काही प्रमाणात सावरण्यास मदत केली. म्युच्युअल फंडाची बाजाराच्या खालच्या पातळीवरील गुंतवणूक येणाऱ्या काळात जेंव्हा विदेशी गुंतवणूकदार बाजारात परततील तेंव्हा म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देतील.

म्युच्युअल फ़ंडाच्या गुंतवणूकदारांनी दाखवलेला प्रगल्भ विश्वास भारतीय शेयर बाजाराला आणि पर्यायाने त्यांच्या गुंतवणुकीला नक्कीच नवीन उंचीवर घेऊन जाईल.

आता खऱ्याअर्थाने म्युच्युअल फंड सही है..

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हि बाजार जोखिमेच्या अधीन असते , योजने संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा

धन्यवाद.

निलेश तावडे

लेखक हे २० वर्ष म्युच्युअल फंड मध्ये कार्यरत होते सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत
[email protected]
९३२४५४३८३२
www.nileshtawde.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!