‘हो’ किंवा ‘नाही’ म्हणण्याचा प्राधान्यक्रम


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

आपण कोणत्याही चर्चेमधे हो म्हणायचं कि नाही म्हणायचं हे आधीच ठरवून गेलो असू तर आपण नेहमी त्याच दृष्टीने चर्चा करत असतो. आपण प्राधान्यक्रम ठरवत असतो. म्हणजे जर आपल्याला नाही पासून सुरुवात करायची असेल तर आपण शक्यतो प्रत्येक गोष्टीला नकार देण्याला प्राधान्य देतो, जर होकार देण्याचे ठरवलेले असेल तर आपण सुरुवातीपासूनच सकारात्मक प्रतिसाद देत असतो. नाकाराकडून होकाराकडे किंवा होकाराकडून नाकाराकडे असा प्राधान्यक्रम बऱ्याचदा ठरवलेला दिसून येतो.

उदाहरणादाखल…
सध्या लॉक डाऊन मुळे कुठेही बाहेर गावी जाण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी लागत आहे. आपल्याला अर्ज करावा लागतोय. इथे पोलिसांचा कल नाही म्हणण्याकडे आहे. म्हणजे अर्ज रिजेक्ट करण्याकडे आहे. अर्जाकडे पाहतानाच तो रिजेक्ट करायचंय हे प्राथमिक उद्दिष्ट आणि त्यानंतर जर त्यात काही योग्य वाटलं तर मंजूर करायचा असा नियम असल्यासारखी प्रश्नांची स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे पोलिसांचा प्राधान्य क्रम नाकाराकडून होकाराकडे आहे. म्हणजे जर अर्ज मंजूर करून घ्यायचा असेल तर असं काही सांगावं लागेल ज्यामुळे त्यांचा प्रतिसाद होकारात्मक येईल.

आपल्याकडे एखादा ग्राहक जेव्हा येतो तेव्हा तो नाही म्हणण्याच्या मानसिकतेमधेच असतो. आपण दाखवलेले प्रोडक्ट तो आधी नाकारण्याच्याच मूड मधे असतो. प्रत्येक प्रोडक्ट वर तो नकारात्मक प्रतिक्रिया देण्याला प्राधान्य देतो. पण याचवेळी आपण मात्र होकारात्मक प्रतिसादाच्या मानसिकतेमधे असतो. म्हणजे आपला प्रयत्न असतो तो कोणत्याही परिस्थिती ग्राहकाने आपले प्रोडक्ट घेण्याला. आपले प्राधान्य होकाराला असते, तर ग्राहकाचे प्राधान्य नाकारला असते. ग्राहकाचा प्राधान्यक्रम नकाराकडून होकाराकडे आणणे हे आपले कौशल्य असते. अशा परिस्थितीत ग्राहक त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याशी चर्चा करत असतो, आणि आपण आपल्या दृष्टिकोनातून.

आपण एखाद्या व्यक्तीसोबत एखादी डील करायला बसलो असू तर सुरुवातीपासून नकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आणि मग हळूहळू होकाराकडे वळायचं कि आधीपासूनच कोणत्याही परिस्थितीत डील क्लोज करायचीच याच उद्देशाने चर्चा करायला बसलो आहोत यावर आपली चर्चेची बाजू ठरते. म्हणजे होकाराकडून नाकाराकडे जायचे आहे, कि नाकाराकडून होकाराकडे जायचे आहे कि आत्ता काहीच न ठरवता परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा आहे हे आपण आधी ठरवत असतो. आणि त्यासनुसारच काय शब्द वापरायचे, हावभाव कसे ठेवायचे, चर्चेत कशा प्रकारे पुढेपुढे सरकायचे हे आपण बऱ्याचदा ठरवून त्यानुसार वागत असतो.

एखादा व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत एखादं काम करण्याचाच विचार करत असेल तर तो ते कसाही करून काम करतोच, एखाद्याला ते करायचच नसेल तर तो काहीही करून त्यात अडचणी शोधतो. हा प्राधान्यक्रम आहे.

आपण एखाद्या दुकानात गेलो, एखादी वस्तू ठरवली आणि बार्गेनिंग सुरु केले. आधी आपला कल नकाराचा असतो आणि दुकानदाराचा होकाराचा. तो आपल्याला बार्गेनिंग करूनही त्याला परवडणाऱ्या दरात ती वस्तू विकायला तयार असतो. पण आपण खूपच बार्गेनिंग केली आणि त्याला न परवडणारा दर मागितला तर त्याचा प्राधान्यक्रम होकारकडून नाकाराकडे वळतो. त्याच्या बोलण्याचा टोन बदलून जातो. या रेट मधे घ्यायचं तर घ्या किंवा नका घेऊन अशा परिस्थितीकडे त्याचा प्रतिसाद सुरु होतो.

बऱ्याचदा सुरुवातीला खडूस वाटणारा एखादा नवीन व्यक्ती कालांतराने एकदम चांगला वाटतो. तोही नकार ते होकार अशा प्राधान्यक्रमाने झालेला बदलच असतो.

आपल्याला व्यवहार करायचा असला तरी नाकारापासून होकाराकडे असा आपला बऱ्याचदा दृष्टिकोन असतो. आधी नाही म्हणायचं, आणि आपल्या बाजूने काही वाटलं तर हो म्हणायचं. सकारात्मक दृष्टिकोन असेल तर सुरुवातीला होकाराच्या दृष्टीने चर्चा करायची पण जर योग्य वाटत नसेल तर नकार द्यायचा असाही दृष्टिकोन असू शकतो.

समोरचा कोणता प्राधान्यक्रम ठरवून आपल्याशी चर्चा करत आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जर आपण विक्रेते आहोत आणि ग्राहकाशी डील करत आहोत तर तो नाकारापासून होकाराकडे असा प्राधान्यक्रम ठरवून आलेला आहे हे आपण लक्षात घ्यायचं असतं. म्हणजे त्याचा आधी नाही म्हण्याकडेच कल असणार आहे, आपल्याला कौशल्याने त्याचा कल नाकाराकडून होकाराकडे वळवायचा आहे.

म्हणून प्रत्येक चर्चेमधे समोरच्याची मानसिकता लक्षात घेऊन चर्चा करावी. शक्यतो कोणत्याही परिस्थितीत लगेच मुख्य मुद्द्यावर व्यक्त होऊ नये किंवा समोरच्याच्या सुरुवातीच्याच बोलण्याने त्याच्याविषयी लगेच काही अंदाज बांधू नये.
एखादा कदाचित आधी नकारत्मक मानसिकता दाखवून आपल्याला त्याच्या चर्चेत अडकवून मग होकाराकडे वळण्याचा विचार करत असेल, किंवा एखादा आधी होकारार्थी दृष्टिकोन दाखवून आपल्याला भुलवून मग नाकाराच्या दृष्टीने विचार करत असेल.

या हो किंवा नाहीच्या प्राधान्यक्रमामधे आपल्याला सुवर्णमध्य काढायचा असतो. आपला आणि समोरच्याचा प्रतिसाद होकारार्थी असेल अशा ठिकाणी दोघांनाही यायचं असतं, किंवा समोरच्याला त्या ठिकाणी आणायचं असतं.

समोरचा कोणत्या स्थानी आहे त्यानुसार हा प्राधान्यक्रम ठरत असतो. हा प्राधान्यक्रम ओळखायची सवय लावा. चर्चेमधे, व्यवहारामधे, एखाद्या डील मधे, करारामधे याचा चांगला फायदा होतो. आणि सुरुवातीच्या चर्चेवरून एखाद्याचा दृष्टिकोन ठरवण्याचे प्रमाणही कमी होते, ज्यामुळे व्यवहारात फायदाच होतो.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!