महानगरांबाहेरील इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

मागील काही वर्षांपासून पुणे मुंबई ठाणे नाशिक अशी काही महानगरे वगळता महाराष्ट्रातील इतर शहरातही इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी वाढली आहे. बहुतांश व्यावसायीक हे २५-३० वयातील आहेत. पुणे मुंबईला शिक्षण करून पुन्हा आपल्या गावाकडेच काहीतरी करायचं अशा उद्देशाने आपापल्या शहरात जाऊन इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय सुरु करत आहेत. यात मुलींची संख्या सुद्धा कौतुकास्पद आहे. पण पुण्या-मुंबईत असताना या व्यवसायाचं जे स्वरूप पाहिलं होतं, त्यानुसार आपल्या गावाकडे कशा प्रकारे काम करायचं याच नियोजन केलं होतं ते काही अपक्षेप्रमाणे होताना दिसत नाहीये. मला महिनाभरात सरासरी एक तरी अशा व्यावसायिकाचा कॉल असतो. व्यवसाय सुरु केलाय पण अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नाहीये. पुण्यात एवढी मागणी असताना आमच्या शहरात लोकांचा प्रतिसाद एवढा कमी का मिळतोय असे प्रश्न असतात.

या प्रश्नांची उत्तरे शोधणं हे काही खूप अवघड टास्क नाहीये.

  • आपण ग्राहकांची मानसिकता ओळखायला कमी पडतोय, आणि सोबतच आपण सुरुवातीलाच खूप मोठी अपेक्षा करतोय. ग्राहकांच्या मानसिकतेचं आपण सरसकटीकरण करतोय. पुणे-ठाणे-मुंबईतील ग्राहकांची मानसिकता आणि महाराष्ट्रातील इतर भागातील ग्राहकांची मानसिकता सारखीच असायला हवी असा आपला विचार असतो. पण तसे नाहीये. या महानगरांत आणि इतर भागात खूप मोठा फरक आहे. इतर शहरात अजूनही इव्हेंट मॅनेजमेंट चा प्रसार झालेला नाही. पण हे खूप मोठं मार्केट आहे हेही तितकेच खरे आहे. परंतु सध्या या संकल्पनेचा प्रसार मर्यादित असल्या कारणाने ग्राहकांची मोठ्या कार्यक्रमासाठी स्वतःच काम करण्याची मानसिकता अजूनही टिकून आहे.
  • तसेच इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे जास्त खर्च असाही समज प्रचलित आहे, त्यामुळे पैशाचा खोलात जाऊन विचार करणारा वर्ग सध्यातरी इव्हेंट मॅनेजमेंट चा विचार करताना दिसून येत नाहीये. खर्च जास्त येतो कि नाही हा विषय वेगळा आहे, पण तो जास्त येतो हा विचार प्रचलित आहे.
  • आपल्याकडे अजूनही लग्नकार्यात स्वतःच लक्ष देणे हि संकल्पना टिकून आहे. महत्वाचे काम इतरांच्या हातात सोपवण्याची गरज नाही असा विचार असतो. किंवा बऱ्याचदा माझ्या मुलांचे लग्न मॅनेज मारण्यासाठी मी सक्षम आहे, इतरांची गरज नाही असाही विचार केला जातो. यामुळेच महानगरांसारखा इतर शहरात या व्यवसायाला मिळणार प्रतिसाद कमी दिसून येत आहे.

पण आता हळूहळू परिस्थिती बदलत आहे. महानगरांच्या जवळ असणाऱ्या शहरात याचा प्रसार वाढताना दिसून येत आहे. महानगरांत शिकून पुन्हा आपल्या गावाकडे गेलेली तरूणाई कार्यक्रमासाठी इव्हेंट मॅनेजर ला प्राधान्य देताना दिसून येत आहे.

या व्यवसायात काम करताना या ग्राहक वर्गाची मानसिकता बदलणे हे आपले पहिले टास्क आहे. त्यासाठी त्यांना इव्हेंट मॅनेजर कशा प्रकारे काम करतात हे प्रत्यक्ष समोर दिसणे आवश्यक आहे. आणि यासाठी काहीतरी काम हाती असणे आवश्यक आहे. म्हणजेच आपल्या व्यवायची सुरुवात होणे आवश्यक आहे.

  • व्यवसाय सुरु केल्यानंतर सर्वप्रथम काम करा ते म्हणजे तुमच्या सर्व ओळखीच्या लोकांपर्यंत तुमचा व्यवसाय पोहोचेल याची काळजी घ्या. ऑफिस च्या उदघाटनाच्या माध्यमातून असेल, किंवा प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यातून असेल, त्यांच्यापर्यंत तुमचा व्यवसाय पोचला पाहिजे.
  • सुरुवातीला लहान लहान कामे घेण्यावर भर द्या. वाढदिवस, बारसे, डोहाळ जेवण अशा प्रकारच्या लहान लहान कामांकडे सुरुवातीला कल ठेवा. लहान कामांमधे इव्हेंट मॅनेजर नियुक्त करण्याचा विचार मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण यात तर खर्च मर्यादित असतो, तुम्ही २-५% जास्त घेतले तरी जास्त फरक पडत नाही असा विचार केला जातो. आणि कार्यक्रमाचा आनंद घ्याल मिळेल असाही विचार केला जातो.
  • जाहिरातीसाठी सोशल मीडिया जाहिरात, पॉम्पलेट्स वाटणे, स्पॉन्सरशिप अशा माध्यमातून जाहिरात करू शकता. पण ती सतत करत रहा. जाहिरातींमधे कोणकोणती कामे केली जातात हे सांगा. फक्त इव्हेंट मॅनेजमेंट लिहू नका, त्यात काय केलं जातं हेही सांगा.
  • सुरुवातीला काही डेमो प्रोजेक्ट म्हणून आपल्या घरातील किंवा जवळच्या लोकांचे कार्यक्रम स्वतः मॅनेज करा. भले त्यासाठी पैसे नाही मिळाले तरी चालेल पण अनुभव मिळेल, आपण काम योग्य प्रकारे करतोय का, काही चुकतंय का, काही सुधारणा हव्या आहेत का अशा गोष्टींचा अंदाज येतो. तसेच आपण किती मोठा कार्यक्रम सांभाळू शकतो याचाही अंदाज येतो. तसंही कोणताही अनुभव नसताना २०-३०-५० लाखाचं बजेट असणाऱ्या एखाद्या कार्यक्रमाचं काम आलं तर ते तुम्ही मॅनेज करू शकत नाही. गेट वरच्या स्वागतापासून जेवणावळी, डेकोरेश, राहण्याची व्यवस्था, टीम मॅनेजमेंट, इव्हेंट मधील छोटेछोटे इव्हेंट, अशा सगळ्या गोष्टी अनुभवाशिवाय एका झटक्यात मॅनेज करणे शक्य नसते. त्यामुळे अनुभव महत्वाचा आहे.
    प्रत्येक कामात स्वतः हजर रहा आणि आपले व्हिजिटिंग कार्ड जमेल तेवढ्या लोकांना देण्याचा प्रयत्न करा. लहान कार्यक्रमात पुरेसा वेळ मिळतो. या वेळेत तुम्ही पाहुण्यांशी थोड्याफार गप्पा मारू शकता, त्यातून ओळखी वाढवू शकता.
  • प्रत्येक कामावर स्वतः लक्ष देणे आवश्यक असते, नुसते आलेले काम दुसऱ्याकडे देऊन आपण निवांत बसून राहू शकत नाही. त्यामुळे दुसऱ्यांना कामे वाटून आपण फक्त बसून राहून काम करू शकतो असा विचार करत असाल तर आत्ताच त्यात बदल करा. आऊटसोर्सिंग आवश्यक असले तरी त्यावर लक्ष आवश्यक असते. या व्यवसायात लहानशी चूक सुद्धा महागात पडू शकते. कार्यक्रम हे कधीतरी येत असतात, काही कार्यक्रम तर एकदाच येत असतात, ते चांगलेच झाले पाहिजेत.
  • लोकांमधे या व्यवसायाचा विचार करण्याची मानसिकता निर्माण करणे हे तुमचे महत्वाचे काम आहे. इव्हेंट मेनेजमेंट कंपनीकडे काम दिल्याने वेळ वाचतो, ऊर्जा वाचते, पाहुण्यांकडे लक्ष देता येते, सगळी काम स्वतः बघण्याचा ताण नसल्याने ऐन कार्यक्रमात चिडचिड होत नाही असे वेगवेगळे फायदे लोकांच्या लक्षात येणे आवश्यक आहे.
  • या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांना, किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांना जेव्हा हे लहान लहान कार्यक्रम तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत असे लक्षात येईल तेव्हा ते तुमचा मोठ्या कामांसाठी विचार करतील.

लग्नकार्ये घरगुती कार्यक्रम हा या व्यवसायातील सर्वात मोठा भाग आहे. पण यासोबतच कॉर्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंट हा यातील एक महत्वाचा भाग आहे. इतर शहरात तेवढं कॉर्पोरेट कल्चर नाहीये, पण तरीही यासाठी बऱ्यापैकी स्कोप आहे. सेमिनार, मेळावे, एक्स्पो असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कामे मिळू शकतात. त्यानुसारही विचार करावा.

राजकीय कामांसाठी सुद्धा आता इव्हेंट मॅनेजर्स आवश्यक असतात. सभा आयोजित करणे, लहान लहान कार्यक्रम आयोजित करणे, त्यांचे योग्य प्रमोशन करणे अशा कामांसाठी आता इव्हेंट मॅनेजर्स ची आवश्यकता भासायला लागली आहे. फुकट राबणारे कार्यकर्ते आता कमी झालेत, मग पैसेच द्यायचे तर चान्गल्या इव्हेंट मॅनेजर ला देऊन चांगला कार्यक्रम करू असा विचार केला जात आहे.

हि संस्कृती आपल्या भागात रुजवण्यासाठी त्याच सतत प्रमोशन करणे आवश्यक आहे. लोकांना तुमचा व्यवसाय सतत दिसला पाहिजे, इव्हेंट मॅनेजमेंट का आवश्यक आहे हे लोकांच्या लक्षात आले पाहिजे, त्यातील सेवा सतत समोर दिसल्या पाहिजेत, तुमचे यशस्वी प्रोजेक्ट दिसले पाहिजेत, प्रत्यक्ष कार्यक्रात येणाऱ्या पाहुण्यांना इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे काम देणे किती फायद्याचे आहे हे लक्षात येणे आवश्यक आहे.

सध्या या व्यवसायाला महानगरांसारखा लहान शहरात प्रतिसाद मिळत नाहीये, पण म्हणून इथे आत्ता याची गरज नाहीये असे नाही किंवा ज्यांनी व्यवसाय सुरु केलेले आहेत त्यांनी निराश होण्याची गरज नाही. या व्यवसायाला चांगले भविष्य आहे. उलट सध्या ग्राहकांचा ओढा कमी आहे म्हणजे अजून खूप मोठं मार्केट शिल्लक आहे, जे व्यापण्याची तुम्हाला संधी आहे.
हा व्यवसाय चांगला आहे. महानगरांव्यतिरिक्त इतर शहरातही या व्यवसायाला चांगले भविष्य आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीचं तसंही महत्व वाढत आहे. लहान शहरात सुद्धा या व्यवसायाला बऱ्यापैकी मार्केट आहे. मध्यम आणि मोठ्या शहरात मार्केट सेट होत आहे, आणि महानगरात असेल तर चिंताच नाही, तिथे आधीच मार्केट सेट झालेलं आहे.

त्यामुळे सुरुवात करण्याच्या विचार असाल तर नक्कीच करा, आणि सुरुवात केली असे तर टिकून रहा…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!