लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
नवउद्योजकाने नेहमी लहान बाळासारखं असावं
सुरुवातीला शांतपणे निरीक्षण करावं. लोक कसे असतात, कसे वागतात, कसे बोलतात, काय बोलतात, मार्केट कसं असतं, व्यवहार कसे चालतात, व्यवसाय कसा चालतो अशा गोष्टी आधी शांत राहून निरीक्षणातून शिकून घ्याव्यात. तुम्ही नवीन आहात, तुम्हाला जमेल का अशा विचाराने उगाच त्रास करून घेऊ नये, टेन्शन घेऊ नये.
काही काळाने हातपाय मारायला सुरुवात करावी. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत रहावा. आपल्या आसपासच्या लोकांशी मिळून मिसळून रहायला सुरुवात करावी. व्यवसाय शिकून घ्यावा. व्यक्त व्हायला सुरुवात करावी. व्यवसायाची भाषा शिकायला सुरुवात करावी. व्यवसायाच्या या प्रवासात रांगायला सुरुवात करावी.
काही काळाने धडपडत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा. उभं राहण्याचा प्रयत्न करावा, मग धडपडावं, पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करावा, पुन्हा पडावं, असं करत करत स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहून चालायला सुरुवात करावी. म्हणजेच व्यवसायातील यशापयशाचा सामना करावा, मंदी-तेजीचा सामना करावा आणि चुका कराव्यात, त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा असं करत करत व्यवसाय आता पूर्ण क्षमतेने करायला सुरुवात करावी.
चालायला लागल्यांनंतर सगळीकडे बागडायला सुरुवात करावी, जग बघायला सुरुवात करावी, बडबड करायला सुरुवात करावी. म्हणजेच व्यवसायात वाढ करण्यासाठी नियोजन आखणी सुरु करावी, मार्केटचा पसारा वाढवावा, नवीन मार्केटमधे प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरु करावा. नवनवीन प्रयोग सुरु करावेत. मार्केट्मधे स्थिरस्थावर व्हावे. आणि आता पुढच्या टप्प्यावर मोठी उडी घेण्यासाठी सिद्ध व्हावे.
बालपणाचे पाच-सहा वर्ष आणि व्यवसायाचे पहिले तीन-चार वर्ष सारखेच असतात. या काळात तुम्हाला शिकायचं असत. पुढच्या प्रवासासाठी तयार व्हायचं असतं. जन्मल्या जन्मल्या पळता येत नाही, वेळ लागतो, व्यवसायातही असाच वेळ लागतो. या वेळेत तुम्ही व्यवसाय शिकून घेणे, त्यातील अंतर्गत गोष्टी शिकून घेणे, नियोजन करणे, तेजीमंदी ला सामोरे जाणे, अडीअडचणींना सामोरे जाणे, कोणत्याही परिस्थिती टिकून राहणे अशा गोष्टी करणे महत्वाचे असते. यात एकदा तुम्हाला बऱ्यापैकी अनुभव आला कि मगच तुम्ही पुढच्या प्रवासाला तयार होत असता.
अजून चालताच येत नसताना पळण्याचा हट्ट आपण धरू शकत नाही. पळण्यासाठी पायात जी ताकद आवश्यक असते त्यासाठी आधी काही काळ रांगावंच लागतं.
रांगण्याची, धडपडण्याची तयारी ठेवली तरच पळता येईल, काहीच न करता पळण्याचा प्रयत्न केला तर चालण्याचीही क्षमता राहणार नाही.
म्हणून अनुभव नसलेल्या नवउद्योजकाने नेहमी लहान बाळासारखं असावं… आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतंही टेन्शन न घेता या सुरु केलेल्या प्रवासाचा आनंद घ्यावा… अगदी या लहानग्यांसारखा…
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Nice article
सर आपण दिलेल्या मार्गदर्शना मुळे व्यवसाय व्यवस्थापन कण्यासाठी खूप मदत होते 🙏👌💯