जगातलं सगळ्यात मोठं मार्केट हि कौतुकाची नाही तर खटकणारी बाब आहे.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

आपण चीन चे ५९ App बॅन केले. बरीच चर्चा झाली, व्हायलाही पाहिजे. पण कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली? चीन ला फरक पडत नाही, त्यात काय शौर्य आहे, खंबीर निर्णय वगैरे वगैरे… एक मुद्दा मात्र दुर्लक्षितच आहे. आपले किती App जे जगभर गाजले आहेत? एखादं तरी माहितीये? आठवावं लागेल ना? पण कितीही आठवलं तरी सापडणार नाही.

आपल्याकडे उद्योजकांची, तरुणांची मानसिकता खूप सुरक्षिततेची आहे. जास्त डोकं लावायचं नाही. जे आहे त्यात आपलं हित साधून घ्यायचं बघायचं. नवीन काही करायचं नाही, नवीन शोध लावायचे नाही, काही सुचलं तरी त्यावर काम करायचं नाही.

आपल्याच देशात पेटंट मधे आपल्या देशी कंपनी टॉप १० मध्येसुद्धा नाहीत. बाहेरच्याच कंपन्या आपल्याकडे सर्वात जास्त पेटंट रजिस्टर करतात. नवीन काही संकल्पना असेल तर त्यातील बहुतांशी संकल्पना बाहरेच्याच कंपनीने आणलेल्या असतात.

मला आठवड्यातून पाच दहा मेसेज, ‘काही नवीन संकल्पना असतील सांगा’, असेच असतात. अरे भाऊ मला जर नवीन संकल्पना सुचली तर ती मीच अमलात आणेल ना? तुला कशाला सांगू? तुला काहीच सुचत नाहीये का? आणि काहीच सुचत नसेल तर इतरांकडून उधारीच्या संकल्पना घेऊन काय दिवे लावणार आहे? स्वतः काहीच करायचं नाही. दुसऱ्याकडून मात्र भरपूर अपेक्षा करायच्या, अशाने आपण उद्योगक्षेत्रात कसे पुढे जाणार?

App बॅन केल्याने चीन ला काय फरक पडेल माहित नाही पण यातल्या कित्येक App च उत्पन्न अब्जावधींच्या घरात असतं. टाईमपास म्हणून कुणी ते बनवत नाही. आणि यांचा मेंटेनन्स खर्च अगदीच नाममात्र असतो. आपल्याकडे असं काय आहे ज्यावर जगभरातील करोडो लोक गुंतलेले आहेत, ज्यातून आपल्याकडे अब्जावधींचा रेव्हिन्यू मिळतोय? एकही App सापडत नाही. आपली मानसिकताच अशी झालेली आहे कि आपल्याला नवीन काही जमू शकत नाही. जे चालू आहे ते फक्त फॉलो करायचं. यातून आपण स्वतःसाठीच दुय्यम दर्जाचं स्थान निश्चित करून घेतलेलं आहे.

आपण स्वतःला कधीच सर्वोत्तम दर्जाचं समजत नाहीत. याच समजातून आपल्याकडून कधीही सर्वोत्तम कलाकृती जन्माला येत नाहीत. कारण आपण त्यांना शोधायच्या भागडीतच पडत नाहीत. चीन सोडा, (सारखं सारखं चीन चा उल्लेख केला तर मूळ मुद्दा बाजूला राहून लोक राजकारणाच्याच मुद्द्याकडे वळतील) पाश्चिमात्य कंपन्यांना टक्कर देईल असे कोणतेही App आपल्याकडे नाही. एक न एक गोष्ट बाहेरची आहे. नुसतं App च्याच बाबतीत नाही तर प्रत्येक गोष्टीत आपण या देशांचं मार्केट झालो आहोत. पण मार्केट नेहमी लुबाडण्यासाठीच असतं. आपण जगातील सर्वात मोठं मार्केट आहोत हे वाक्य बोलायला भारी वाटतं पण याचा दुसरा अर्थ असा होतो कि आपण यांना फक्त पैसे देण्याचं काम करतो, यांच्याकडून कमवण्याचं नाही. आपण आपल्या देशात काहीच आणत नाही आहोत, आपण फक्त देशाबाहेर सगळं पाठवण्याचं काम करत आहोत.

आपण जसे चीन चे App बॅन केले, तसं त्यांनी आपलं काही बॅन करायला, आपलं असं काहीच नाहीये हि प्रचंड खटकणारी गोष्ट आहे. आपण दुय्यम ठरतोय त्यांच्यासमोर. थोडंसं अनौपचारिक किंवा गमतीने बोलायचं म्हटलं तर काहीतरी आपलंही असायला पाहिजे जे आपल्या शत्रू राष्ट्रांनीही म्हटलं पाहिजे कि यांचे एखादे उत्पादन बॅन करा, एखाद्या कंपनीवर नियंत्रण ठेवा.

ऑलम्पिक मध्ये सर्वात जास्त पदके मिळवणारे देश आपोआपच भारी वाटतात. ते महासत्ता असल्याचा फील येतो. खरं तर खेळांचा आणि देश भारी किंवा मोठा असण्याचा काही संबंध नाही. पण तरीही आपल्याला खेळातील विजय त्या देशांचा सर्वच क्षेत्रावरील विजय वाटत असतो. आपोआपच त्या देशाचं वर्चस्व आपण मान्य करायला लागतो. हा माईंड गेम आहे. हा माईंड गेम चीन ने मागच्या तीस वर्षांपासून खेळायला सुरु केला आहे पण आपण या माईंड गेम मध्ये अजून खूप मागे आहोत. महासत्तेच्या वाटचालीत माईंड गेम महत्वाचा असतो आणि आपण त्यात नेहमीच कमी पडतो हि निराशेची बाब आहे.

आपल्याला हे दुय्यम स्थान सोडायचं आहे. आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं आहे. लाखात एक जरी हुशार, शार्प माईंडेड, क्रिएटिव्ह व्यक्ती असेल असा जरी हिशोब केला तरी देशात किमान १३-१४ हजार जण आहेत जे काहीतरी नवीन करू शकतात. असं काही घडवू शकतात जे जगावर राज्य करू शकेल. आपण आपली ताकद ओळखायलाच कमी पडतोय.

सामान्य माणसासाठी देशप्रेम व्यक्त करण्याचा सर्वात मोठा मार्ग असतो तो म्हणजे आपल्या देशाला सर्वोत्तम बनवण्यासाठी प्रयत्न करणं, पण आपण सोशल मीडियावर पोस्ट कारण्यापुढे सरकतच नाही…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!