‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : निलेश अभंग
======================
व्यवसायात येऊन तो यशस्वीपणे राबवणं तितकंसं सोपं नसतं. त्यातल्या त्यात ब्रॅण्डिंगचा बिझनेस सुरू करणे अन मुंबईत उभा करणे विनोदाचा भाग नाहीये. शहरी मुलांना तसे किमान वातावरण, भोवताल मिळतो, पण अगदीच मुंबई शहरापासून ४५० किलोमीटर दूर असलेल्या अंबेजोगाई येथून आपले शिक्षण घेऊन मुंबईत आपली व्यवसायिक कारकीर्द सुरू करून व्यवस्थितपणे चालवणे मोठे जिकिरीचे काम असते. प्रवास खडतर असतो, वाटेत खाचखळगे असतात, मात्र त्या अडचणी लीलया दूर करत यशस्वीपणे जाहिरात आणि ब्रँडिंग क्षेत्रात घोडदौड करणाऱ्या अर्जुन थोरात ह्या युवकाची कथा प्रेरणादायी आहे. अर्जुन अगदीच तरुण म्हणजे तीस वर्षाचा युवक असल्याने संपूर्ण लेखभर त्याचा उल्लेख एकेरीत येणार आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
थोरात कुटुंबातील अर्जुन हा पहिल्या पिढीचा बिझनेसमन. सध्या तिशीत असलेला, शेतकरी कुटुंबातला. वडील मूळचे शेतकरी. त्याचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण अंबेजोगाई येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणही तिथल्याच यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे झाले.
बालपण अगदीच हलाखीचे नसले तरी फारशी चंगळही नव्हती. घरी दुभती जनावरं म्हणजेच गाई-म्हशी होत्या. तेव्हा गावात दुधा-दह्याचा रतीब घालण्याचे काम करावे लागते असे. शिवाय ऊसाची शेती असल्याने ‘ऊसाचे वाढे’ विकण्याचे काम करावे लागे. पाच रुपये पेंडीप्रमाणे माल विकला जात असे. तसे त्याचे बालपण गमतीचे, आनंदाचे, थोडेफार कष्टाचे राहिलेले आहे.
भले अकरावीला विज्ञान शाखेला अर्जुनने ऍडमिशन घेतले असले तरी सुरुवातीपासून त्याचा विशेष कल कलाक्षेत्राकडे राहिला. अगदी अकरावीत असताना ई- टीव्ही मराठी वाहिनीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत त्याचा मराठवाडा विभागातून प्रथम क्रमांक आला होता. पुढे चित्रकलेची आवड त्याने पुरेपूर जोपासली. त्यातील बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या.
तसेच आजोबा, काका देखील चित्रकार असल्यामुळे चित्रकला मुळ रक्तातच होती त्यामुळे कलाक्षेत्राकडे विशेष कल राहिला.
साल 2008 मध्ये अर्जुनला ग्राफिक डिझाईन, ऍनिमेशन, 2डी, 3डी, VFX इत्यादींची माहिती झाली. त्याला त्या क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. त्यात करियर वगैरे असे काही डोक्यात नव्हते पण ऍनिमेशन क्षेत्राबाबतीत असलेले कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नसे.
तेव्हा 2008 साली त्याने कुटुंबियांशी चर्चा करून ऍनिमेशन शिकण्यासाठी अंबेजोगाई सोडलं अन पुण्याला आला.
तिथे Arena नावाच्या ऍनिमेशन इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेतले. त्याने ऍनिमेशन, Graphics संबंधी व्यवस्थित ज्ञान मिळवले. तिथे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ह्या कोर्सचा आपल्या जॉबमध्ये कसा उपयोग करून घेता येईल, याची ईत्थंभूत माहिती अर्जुनने मिळवली.
आता कुठल्याही छोट्या-मोठ्या ऍड एजन्सीमध्ये काम करण्याकरता आवश्यक असलेली कौशल्ये अर्जुनने मेहनत करून आत्मसात केली होती. पुण्यात राहत असलेल्या रूमवर तो क्लास आवरल्यानंतर इतर मुलांसारखा इकडे-तिकडे टंगळमंगळ करत न भटकता रूमवर येऊन लॅपटॉपवर तासनतास सराव करत असे. त्यामुळे ग्राफिक्सवर त्याचा बऱ्यापैकी हात बसला होता.
आता नोकरी करण्याची वेळ आली होती. विकसित केलेली कौशल्ये वापरण्याची आवश्यकता अर्जुनला जाणवू लागली. मुंबईला जाण्याचे ठरले. त्यानुसार त्याने आपले कळंबोली, पनवेल येथे राहणारे आपले मावस काका यांना संपर्क केला, त्यांनी त्याला बोलावून घेतले. तो तिथेच मावस काकांच्या घरी राहू लागला.
जॉब पोर्टलवरून नोकरीसाठी अर्ज करणे सुरू झाले. काहीच दिवसात अर्जुनला Privilege Commercial Communication ह्या ऍड एजन्सीमधून फोन आला. त्याला मुलाखतीकरिता बोलावण्यात आले. त्यांचे ऑफिस वाशीच्या पाम बीच येथे होते. अर्जुनचे काम आणि संवादकौशल्य याचा अंदाज घेऊन एजन्सीने त्याची निवड केली. ही त्याची जाहिरात क्षेत्रातील पहिलीवहिली नोकरी. वाशीचा रघुलीला मॉल एजंसीचा Client होता. तिथे ग्राहकांची गरज पाहून कशा पद्धतीने सेवा देता येईल, उत्तम प्रकारे Cient च्या कंपनीची ब्रँडिंग कशी करता येईल, याबाबत शिकायला मिळाले. आपल्या मिळवलेल्या ज्ञानाला कामात आजमावता आले. एजन्सीतील वरिष्ठांशी सल्लामसलतीत सहभागी झाल्याने जाहिरात क्षेत्रातील विविध कंगोरे कळाले. उत्तम अनुभव आला.
पुढे त्या कंपनीतून राजीनामा देत जिली (Gili) ह्या गीतांजली ग्रुपच्या कंपनीमध्ये Visual Merchandiser ह्या पदावर अर्जुनने नोकरी स्वीकारली. तिथे जिलीसाठी काम करताना ब्रँडिंग मिडियाबद्दल विस्ताराने माहिती झाली. त्यामध्ये नवीन सुरू होणाऱ्या स्टोअरचं ब्रँडिंग करायचे असे. त्यासाठी लागणारे ब्रँडिंग मटेरियल बनवावे लागे, ब्रॅण्डिंग, प्रिंटिंग आणि मर्चंडायजिंग या सर्व गोष्टी शिकून घेण्याची अर्जुनला संधी मिळाली. तिथे तो Pan इंडिया स्तरावर ब्रॅण्डिंगची कामे हाताळत असे. त्यातून भारतभर ब्रँडिंगचा अनुभव घेता आला.
दीडेक वर्षे नोकरी केल्यावर वाशी येथे असलेल्या Micro Technologies India Ltd. या कंपनीमध्ये Graphic Designer ह्या पदावर काम सुरू केले. येथे अर्जुनला नवीन सुरू होणाऱ्या मायक्रो शॉपीच्या ब्रॅण्डिंग चे काम अतिरिक्त जबाबदारी म्हणून देण्यात आली. त्याने ती आनंदाने स्वीकारली. कंपनीला भारतभरातील Client चे काम सांभाळावे लागे. स्टोअरच्या ब्रँडिंगचे काम पाहावे लागे. जबाबदारी असल्याने त्याला देशाच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या मॅनेजरशी बोलावे लागे, त्यांच्या गरजा समजून घ्याव्या लागत. गरजांची पूर्तता करून द्यावी लागे. ह्या प्रक्रियेमुळे अर्जुन स्वतः अनेक गोष्टी शिकत गेला. संवादकौशल्य आले, शिवाय भारतभर स्वतःचे नेटवर्क उभे राहिले. पॅन इंडिया जबाबदारी असल्याचा हा मात्र मोठा फायदा असतो.
शिवाय समांतरपणे त्याने फ्रीलांसिंगची कामे करायला सुरुवात केली होती. ग्राफिक डिझाईनमध्ये हातखंडा असल्याने कामामध्ये एक कॉर्पोरेट एस्थेटिक सेन्स आला होता. त्यामुळे क्लाएंटना काम विशेष आवडत असे. हळूहळू फ्रीलांसिंगची कामे वाढतच गेले. बाहेरून जोरदार कामे मिळू लागली. नोकरी करून फ्रीलांसिंगची कामे संपवणे अशक्य होऊ लागले. दोन्ही कामे पार पाडणे जड जाऊ लागले. नवीन कामाचा ओघ वाढतच होता. त्यामुळे त्याला करत असलेली नोकरी सोडण्याशिवाय उपाय उरला नाही. त्याने राजीनामा दिला अन इथून पुढे अर्जुनने व्यवसायात पदार्पण केले.
आजपर्यंत नोकरी करताना मिळालेल्या ज्ञानाचा, ओळखीचा त्याला स्वतःचा व्यवसाय करताना पुरेपूर उपयोग होणार होता. त्याने डिसेंबर 2013 मध्ये ‘Magic Mouse Design’ नावाने व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यासाठी नवी मुंबई येथील एका बिझनेस कॉम्प्लेक्समध्ये प्रशस्त ऑफिस घेतले. छान इंटेरिअर बनवलं, टीम रिक्रुट केली. अन काम सुरू केले.
Magic Mouse Design मध्ये क्लायंटना ब्रॅण्डिंग, Advertising, Printing, Corporate Gifting इत्यादी सेवा द्यायला सुरुवात केली.
अर्जुनने अल्पावधीतच आपल्या नेटवर्कचा उपयोग करत अनेक Clients मिळवले. ज्यामध्ये पनवेल महानगरपालिका, महाराष्ट्र स्टेट डेंटल कौन्सिल, झायकॉम्, बरेच नवउद्योजक, परभणी जिल्ह्यातील प्रतिष्ठित उद्योगपती श्री. प्रफुल पाटील यांच्या महाविद्यालयाचे प्रोस्पेक्टस आणि इतर ब्रॅण्डिंगचे साहित्य बनवण्याचे काम अर्जुनला अगदी सुरुवातीलाच मिळवले. त्या प्रोस्पेक्टसचे संबंधित लोकांकडून फार कौतुकही झाले. प्रफुल्ल पाटील यांनाही अर्जुनचे काम विशेष आवडले. कॉलेजचे बरेचसे काम आता अर्जुनलाच मिळते. शिवाय इतर Clients चे काम सुरुच असते. कामाच्या दर्जाबाबत Magic Mouse Design कधीही समझोता करत नाही, असे अर्जुन सांगतो. ग्राहकांना समाधान मिळणे अधिक आवश्यक आहे, अशी अर्जुनची धारणा आहे. आता मुंबई, ठाणे, नवीन मुंबईमध्ये अनेक Client मिळवले असून त्यांच्या व्यवसायीक वाढीसाठी अधिकाधिक उत्तम पद्धतीने ब्रँडिंग करून देण्याकरता Magic Mouse Design कटिबद्ध आहे. ते ब्रँडिंगमध्ये नावापासून, कंपनीचा लोगो, क्लायंटना ब्रँड नेमनुसार उत्पादनांचं पॅकेजिंग डिझाईन करून देतात. शिवाय अतिशय कल्पक आणि नाविन्यपूर्ण Creatives बनवून देतात.
अंबेजोगाईमध्ये अर्जुनचे तळमजला अधिक दोन मजल्याचे प्रशस्त घर आहे. कुटुंबातील लोकांकरिता राहण्यासाठी गरजेपेक्षा खूप मोठी जागा आहे. तर जास्तीच्या असलेल्या जागेचा व्यवसायिक उपयोग करण्याच्या अनुषंगाने त्याने रीडिंग रूमची संकल्पना प्रत्यक्षात आणली. राहत्या घराच्या भोवताली चार महाविद्यालयं आहेत, तेथील मुलांना निवांतपणे अभ्यास करण्यासाठी शांत, निसर्गरम्य जागेची आवश्यकता होतीच, ती गरज ओळखून अर्जुनने रीडिंग रूम प्रकल्प सुरू केला. स्वच्छता, प्यायला फिल्टरचे पाणी, Wifi ची सुविधा, इन्व्हर्टर, प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कंपार्टमेंट, अशा साऱ्या आधुनिक सुविधांनी संपन्न असलेलं ‘ज्ञानपीठ अभ्यासिका’ ही अंबेजोगाईतील पहिली आधुनिक सुविधांनी संपन्न असलेली रीडिंग रूम आहे. भोवतालच्या गावांतील अनेक विद्यार्थी, स्पर्धा परिक्षा, बँकिंगच्या परीक्षांच्या तयारी करण्यासाठी इथे अभ्यासाला येतात. तेथील देखरेखीची सारी जबाबदारी त्याचे आई-वडील दोघे पार पाडतात. व्यावसायीक संधी कशा निर्माण कराव्यात अन अमलात आणाव्यात, याचा हा ‘ज्ञानपीठ अभ्यासिका’ म्हणजे उत्तम नमुना.
अर्जुनच्या व्यावसायिक कल्पकतेबद्दलची अजून एक प्रेरणादायी गोष्ट, ज्या उपक्रमातून त्याला टक्केटोणपे खाऊन बरेच काही शिकायला मिळाले. तसे पाहिले तर अर्जुन अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा. फक्त एकरभर जमीन. पाण्याची मुबलक उपलब्धता आहे, इतकीच काय ती जमेची बाजू. त्याने स्वतःच्या घराभोवती असलेल्या एकरभर जमिनीचा व्यावसायिक उपयोग करण्याचे ठरवले. फार विचार केल्यानंतर त्याने तिथे फुड मॉल टाकण्याचा विचार केला. त्यानुसार पुढील मोर्चेबांधणी केली. गेल्या पाच वर्षांपासून आई वडिलांनी मेहनत घेत झाडे लावलेली आहेत, तिथे आंब्याची, नारळाच्या झाडांची लागवड, देखभाल ते करत होते. झाडांमुळे परिसर अगदीच छान दिसत आहे. व्यवस्थित कंपाउंड घातले. स्टेज बनवून घेतले. लॉन तयार केला. फुड मॉलसाठी गाळे बांधण्याचा मोठा खर्च येणार होता. त्यासाठी फार कष्टाने पैशांची जुळवाजुळव केली. गुंतवणूकदार मिळवले, फुड मॉल चालू करण्यामागचा हेतू म्हणजे प्रशस्त आणि कल्पक हॉटेलचा नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते, त्यामुळे फारसे कोणी मोठे हॉटेल सुरू करण्यासाठी धजावत नसे. त्यामुळे फॅमिलीला बाहेर घेऊन जाण्यासाठी लातूरशिवाय पर्याय नव्हता. ह्या दोन्ही बाबींचा उपाय म्हणून हा प्रकल्प सुरू केला. हा लातूर आणि बीड जिल्ह्यातील पहिला फुड मॉल असून तिथे 250 पेक्षा जास्त लोक एकत्र जमू शकतात. तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा असून कार्यक्रम, पार्टीसाठी स्टेजची सुविधा उपलब्ध आहे.
अर्जुनने ह्या प्रकल्पाच्या अनुषंगाने गाळे बांधून घेतले, फुड मॉल तयारच झाला होता, त्यासाठी भाडेकरूही मिळाले. मुंबईतील मॉल्समध्ये जसे फूड कोर्ट असतात, तसे बिझनेस मॉडेल होते. भोवताली चार कॉलेजं असल्याने, शिवाय जागा तालुक्याच्या ठिकाणी असल्याने फुड मॉलसाठी भाडेकरू तसे लवकर मिळाले. अर्जुनने रीतसर व्यवहार करत त्यांच्याबरोबर आवश्यक कायदेशीर करारनामें करून घेतले. अगदी उद्घाटन करण्याचे ठरवायचे असताना ऐन वेळेस माशी शिंकली.
काही लोकांना गावातील माणसाची प्रगती झालेली आवडत नसते. विघ्नसंतोषी लोकांनी फुड मॉलविरोधात अर्जफाटे करायला सुरुवात केली. अर्जुनला त्रास देण्याचा विडाच त्यांनी उचलला. अगदी दोनेक महिने प्रकरण वादात होते. ह्या प्रकल्पात अर्जुनने बराच खर्च केला होता, शिवाय वेळही दिला होता. त्यामुळे अशा त्रासातून जाणे त्याला वेदनादायी होते, काही स्थानिक टोळभैरव लोकांचा त्रास वाढत होता, मात्र अर्जुनने सदर प्रकरणाचा कायदेशीर अंगाने सविस्तर अभ्यास केला होता. त्यात त्याला स्वतःची बाजू अगदीच नीट आहे, याचा अंदाज आला होता. मात्र समोरच्या व्यक्ती नगरपालिकेत अर्ज-विनंत्या करतच होते, फुड मॉलचे बांधकाम पाडून टाकण्यासाठी त्यांनी पूर्ण ताकद लावली होती. ह्या प्रकारणात अर्जुनला प्रचंड मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागले.
शेवटी अर्जुनला तिथलीच काही स्थानिक माणसं मदतीला आली. त्यांनी त्याला मानसिक आधार दिला. आपले वजन वापरत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अर्जुनची बाजू समजून सांगितली.
त्याला ह्या साऱ्या प्रकारणात आई वडील, काका, काकी, दोघी बहिणी व भाऊजी, मित्र परिवार आणि कॉम्रेड बब्रुवाहन पोटभरे यांची विशेष मदत झाली. ह्या लोकांशिवाय त्याला इतका मोठा झगडा करणे शक्यच झाले नसते. मित्र परिवाराचा आणि कॉ. बब्रूवाहन पोटभरे यांचा विषय निघताच अर्जुन भरभरून बोलू लागतो. त्यांच्याबद्दल बोलताना त्याच्या मनात सुहृदांबद्दल असलेली कृतज्ञताच जाणवते.
ह्या सर्व मंडळींमुळे, शिवाय काही हितचिंतकांमुळे अर्जुनला नगरपालिकेला आपली बाजू नीट समजावून सांगता आली अन त्याच्या प्रकल्पाचा विषय शेवटी स्थानिक पातळीवर निकालात निघाला. अर्जुनच्या त्यामुळे कुटुंबीयांसहित सर्व हितचिंतकांना विशेष आनंद झाला.
Saturday Club Global Trust नावाच्या मराठी व्यावसायिकांच्या क्लबमध्ये आधीपासूनच अर्जुन कार्यरत होता. तिथे त्यांना मुंबईतील अनेक व्यावसायीक मित्रांची ओळख करून घेता आली. व्यवसाय समजून घेता आल्या. बऱ्याच Training प्रोग्रामना हजर राहता आले. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा व्यवसायात उपयोग करता येईल की नाही, याचा पडताळा घेता आला. आपल्या गावतील उद्योजकांना देखील ह्या सर्व गोष्टी समजल्या पाहिजेत, म्हणूनच मुंबईपासून 450 किमी अंतरावर असलेल्या अंबेजोगाई येथे महिन्याला प्रवास करत Saturday Club चा अंबेजोगाई येथे चॅप्टर सुरू केला व त्या chapter चा चेअरमन म्हणून एक वर्ष पदभार स्वीकारत काम पाहिले. कितीही दूर गेला तरी गावातील व्यवसायिक मित्रांसाठी कष्ट घेण्याची त्याची तयारी कौतुकास्पद आहे.
तसेच आता सध्या अर्जुन व्यवसायात नवनवीन गोष्टी आजमावू पाहतोय. अंबेजोगाई येथील फुड मॉलचे लवकरच उद्घाटन होणार आहे.
शिवाय त्याने फेब्रुवारी २०२० मध्ये Idy Tech Private Limited ही कंपनी स्थापन करून IDy हि संकल्पना Launch केली आहे. प्रत्येक व्यावसायिक तसेच उद्योजकाला त्याच्या व्यवसायाची डिजिटल ओळख निर्माण करण्यासाठी IDy मदत करेल. त्यामध्ये IDy ची सेवा घेणारा व्यवसायीक आपली माहिती म्हणजे नाव, पत्ता, फोन नंबर, व्हाट्सअप्प नंबर, इमेल आयडी, इत्यादी वीसपेक्षा जास्त डिटेल्स एखाद्या व्यवसायिकाला पाठवताना एका click सरशी पाठवू शकणार आहे. त्याकरिता समोरच्या व्यक्तीची माहिती सेव्ह करण्याची आवश्यकता नसणार आहे. फार कल्पक पध्दतीने हे App बनवण्यात आले आहे. व्यवसायिकाला असे चौफेर खेळावे लागते. फार सजग राहावे लागते.
अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा ते इथवरचा अर्जुनचा व्यावसायिक प्रवास अगदीच प्रेरक आहे.
__
निलेश अभंग
८९७६६२५६९५
लेखक कल्याण (ठाणे जिल्हा) स्थित व्यावसायिक आहेत.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील