लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
मंदीचा सिझन आला कि इंडस्ट्रिअल सेक्टरमधे उधाऱ्या थकवण्याचं प्रमाण वाढतं. इंडस्ट्रीमधे उधारीचे व्यवहार सामान्य बाब आहे. पण मंदीच्या काळात हीच उधारी थकवण्याचे प्रमाण वाढते. हा प्रकार बहुतांशी दोन व्यावसायिकांची ग्राहक विक्रेता अशी जिथे रिलेशनशिप आहे अशा सेक्टरमधे घडतो. इंडस्ट्रिअल सेक्टरमधे हि समस्या मोठी आहे, कारण पेमेंट खूप मोठे असतात. दोन तीन कंपन्यांनी पेमेंट थकवले तरी व्यवसाय ठप्प होतो.
मंदी आहे, पैसेच नाहीत, समोरून पेमेंट येत नाहीये असे सांगून देणी लांबवली जातात. एक दोन महिन्याची पेमेंट टर्म असली तरी सहा सात महिने पेमेंट केलंच जात नाही. ता थकवल्या जाणाऱ्या पेमेंट मुळे अनेक उद्योग अडचणीत येतात तर कित्येक बंद करण्याची वेळ येते
काहींकडून ते खऱ्यानेच आर्थिक संकटात असल्यामुळे पेमेंट थकलेले असू शकते, काहीजण जाणूनबुजून पेमेंट लांबवण्याचा प्रयत्न करत असतात. व्हेंडरचे पेमेंट लांबवून त्या पैशातून आपल्या इतर गुंतवणुकी वाढवणे, इतर कामे करून घेणे असले प्रकार सर्रास केले जातात. पण कोणत्याही परिस्थितीत आपले पैसे अडकलेलेच असतात, ते वसूल होणे महत्वाचे असते.
अशावेळी आपण काय करू शकतो, आपल्याकडे उधारी वसुलीचे कोणकोणते मार्ग आहेत याचा थोडा आढावा घेऊ…
१. सर्वात पहिला मुद्द्दा धरून चालूया तो म्हणजे आपला ग्राहक असलेला व्यावसायीक सुद्धा आर्थिक अडचणीत असू शकतो. अशावेळी त्याची अडचण समजून घेऊन त्याला एकगठ्ठा पेमेंट करण्याचा आग्रह न धरता थोडेथोडे करून तरी पेमेंट देण्याचा पर्याय देऊन पहावा. जर ग्राहक प्रामाणिक असेल तर तो थोडेथोडे करून पेमेंट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. यांचा उद्देश वाईट नसतो, ते खऱ्यानेच अडचणीत असतात, अशावेळी आपणही थोडी समंजस भूमिका घेणे कधीही उत्तम.
२. काहीवेळेस अडकलेले पेमेंट वसूल करण्यासाठी थोडा डिस्काउंट देऊन पाहावा. आपल्या प्रॉफिट मधे थोडाफार डिस्काउंट करून जर पेमेंट निघत असेल तर पेमेंट लांबण्यापेक्षा ते कधीही चांगलेच. पण हा डिस्काउंट तात्पुरता आणि फक्त त्या वेळेपुरता असावा. त्याचा पुढं वापर केला तर तुमचा ग्राहक तुम्हाला डिस्काउंट रेट मधे परवडतंय असा ग्रह करून घेईल.
२ अ. जर ग्राहकाची अडचण खरी असेल तर, त्याला इतर कुठून पेमेंट येणार असेल तर ते वळते करता येऊ शकते का ते पाहावे. त्याच्या संमतीने तसे काही करता आले तर काही प्रमाणात वसुली होऊ शकते.
किंवा त्याला इतर काही काम मिळवून देऊन त्यातून येणारे पेमेंट वळते करता येऊ शकते का पहा.
किंवा त्याच्या मालासाठी तुमच्याकडे ग्राहक असेल तर त्याच्याकडून घेऊन पूढे विकून पैसे मोकळे करता येऊ शकतात का पहा.
पण अशा पर्यायांकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहावे. कुठूनच काही होऊ शकत नसेल आणि समोरचा वाईट वृत्तीने पैसे थकवत नसेल तर असे काही मार्ग वापरता येऊ शकतात.
३. एखादा पेमेंट विनाकारण लांबवत असेल तर पहिला मार्ग असतो तो म्हणजे सतत पाठपुरवठा करणे. कॉल करणे, समोर जाऊन प्रत्यक्ष भेटणे, पेमेंटसाठी सारखा आग्रह धरणे, पूर्ण पेमेंट करू शकत नसाल तर किमान काहीतरी पेमेंट आज कराच अशा शब्दांचा वापर करून त्याला पेमेंट साठी तयार करणे असा प्रयत्न करू शकता.
या टप्पपर्यंत गोड बोलणे सोडू नका. शांत राहून, संयमी शब्दात पेमेंटची मागणी करत राहा.
४. यानेही काही फरक पडला नाहीतर थेट त्याचा ऑफिसमधे, व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन दिवसदिवस बसणे असाही मार्ग बरेच व्यावसायिक किंवा त्यांचे कर्मचारी वापरतात. यात कुठेही ग्राहकाशी वाद घातले जात नाहीत, पण पेमेंटसाठी आग्रह केला जातो. याचा उद्देश असा असतो कि आपण सतत करत असलेली मागणी पाहून त्याला थोडीफार तरी स्वतःची लाज वाटावी, आणि त्याने काहीतरी पेमेंट करावे. यामुळे संबंध तुटत नाहीत, तुम्ही फक्त टोकाची भूमिका घेऊन पेमेंट काढता. बहुतेक ग्राहकांना पेमेंट द्यायचं असतं पण लांबवायचं असत. तो पैसे वापरायचा असतो. त्यामुळे तुमच्या पाठपुरवठ्यामुळे तो नाराज होतो असे नाही, तुम्ही ते करणार हे त्याने गृहीत धरलेले असते.
या टप्प्यावर तुम्ही थोडे त्रासदायक भाव दाखवू शकता. ती एक ताकीद असते कि ‘माझा संयम सुटत चालला आहे’.
५. सारखा फॉलोअप घेऊनही फरक न पडल्यास थोडे रागात बोलण्याचा मार्ग अवलंबून पहावा. थोडे वाद घालणे, रागात बोलणे, सतत टॉर्चर करणे असे मार्ग वापरून पहा. एखादा न देण्याच्या मानसिकतेतच असेल तर इथे तुमचा संयम तुटला आहे असा विचार करून तो पेमेंट करण्याचा विचार करू शकतो. या टप्प्याला बहुतेकांचे पेमेंट होऊ शकते.
६. शक्य झाल्यास जुने पेमेंट येईपर्यंत नवीन काम करणार नाही असा आग्रह धरावा. जर तुमच्याशी व्यवहार ग्राहकाला परवडणारा असेल तर तो तुम्हाला सोडू शकत नाही. अशावेळी तुम्ही पुढचे काम थांबवल्यामुळे तो पेमेंट क्लिअर करण्याचा विचार करू शकतो.
या टप्पयापर्यंत संबंध तुटतील असे वागू नका. शब्दांवर नियंत्रण ठेवा. संबंध सुरळीत करण्यासाठी थोडी जागा ठेवा. जर सगळे सुरळीत झाले तर काम पुन्हा चालू होऊ शकते.
७. बहुतेक वेळा ग्राहक पेमेंट लांबवतोच पण बोलताना इतका गोड बोलतो कि आपण विरोध करू शकत नाही. एक महिन्याचे तीन चार सहा महिने कधी होऊन जातात ते कळतही नाही, पण त्याचे बोलणे ऐकून, पाहून आपण विरोध करण्याचा विचार सोडून देतो. इतका चांगला बोलतोय खरंच काही प्रॉब्लेम असेल असा विचार केला जातो. पण चार – सहा – सात महिने पेमेंट जर लांबत असेल, आणि तो थोडसुद्धा पेमेंट करत नसेल तर त्याचा विचार पेमेंट करण्याचा नाही असाच अर्थ निघतो. त्यामुळे फक्त गोड बोलण्यावर भुलून पेमेंट लांबवण्यासाठी सूट देऊ नका.
ठरलेल्या पेमेंट टर्म पेक्षा जास्त चार सहा महिने लांबूनही पेमेंट मिळत नसेल तर समोरच्याची पैसे देण्याची बिलकुल इच्छा नाही असाच अर्थ होतो. म्हणजे जर असाच पाठपुरवठा चालू राहिला तर कितीही वर्षे पेमेंट मिळणारच नाही हे निश्चित असते. थोडक्यात पैसे बुडालेत हे निश्चित असते. अशावेळी कायदेशीर प्रक्रिया हाच मार्ग राहतो.
८. इतकं करूनही पेमेंट झालं नाही तर पुढचा टप्पा थोडा टोकाचे निर्णय घेण्याचा असावा. कारण आता तो पेमेंट करण्यात इच्छुकांचे नाहीये हे जवळजवळ निश्चित झालेले असते. जर ग्राहकांकडून अॅडव्हान्स सेक्युरिटी चेक घेतलेले असतील तर ते बँकेत जमा करण्याचा मार्ग अवलंबावा. किंवा जर चेक नसतील तर त्याच्याशी थोडे गोड बोलून चेक घेण्याचा प्रयत्न करावा. उदा. बहुतेक वेळा ग्राहक आज पैसे नाहीत पुढच्या महिन्यात देतो म्हणतो, तर अशावेळी तुम्ही साहेब पुढच्या महिन्याची काय गॅरंटी ? किमान चेक तरी द्या म्हणजे मला तुमच्यावर विश्वास बसेल, असं काहीतरी बोलून चेक घेण्याचा प्रयत्न करावा.
महिनाभराने पेमेंट मिळाले नाही तर चेक जमा करावा. जर चेक बाउंस झाला तर तुम्हाला त्याविरोधात कायदेशीर कारवाई करता येते. पण त्याआधी संबंधित व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठवून पेमेंट करण्याची संधी द्यावी लागते. बहुतेकदा अशावेळी ग्राहक आपले पैसे देऊन टाकतो. जर त्याने तसे केले नाही तर पुढे कायदेशीर प्रोसेस चालू करता येते.
कायदेशीर प्रोसेस हि लांबणारी असते. प्रकरण लवकर निकालात निघत नाही, पण चेक बाउंस मधे पेमेंट मिळते म्हणजे मिळतेच. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही महिन्यांनी तो तुम्हाला तडजोडीच्या चर्चेची ऑफर देण्याचा प्रयत्न करतोच. कारण त्याला प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहावे लागत असते, वकिलाला फी द्यावी लागत असते, अशावेळी मनस्ताप, व्यवसायाकडे दुर्लक्ष, खर्च आणि सोबत निकालानंतर पैसे द्यावे लागणारच हे त्याच्या लक्षात आलेले असते. तो माघार घेतो.
या टप्प्यावर आपले पेमेंट मिळूच शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया लांबवण्यापेक्षा जर चर्चेची ऑफर असेल तर थोडेफार कमी जास्त करून पैसे घेण्यालासुद्धा प्राधान्य द्या. पूर्ण पेमेंट आणि सोबत खर्च असाच आपला आग्रह असायला हवा, पण जर खूपच ताणाताणी झाली, तो थोडेफार कमी करून पैसे द्यालयाला तयार होत असेल तर थोडी माघार घेण्याचीही तयारी दाखवावी. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी हाती असणे महत्वाचे असते. असे प्रकार मी बऱ्याचदा पाहिलेले आहेत. माझ्या काही मित्रांची अशी प्रकाराने मी स्वतः हाताळलेले आहेत. नुकसान कमी करणे हाच इथे उद्देश असतो. बऱ्याच ओळखीच्यांचे पैसे याच प्रोसेस मधून निघालेले आहेत.
पण कायदेशीर प्रक्रिया लांबण्याची तयारी ठेवली तर मात्र पूर्ण मैसे मिळण्याची खात्री असते. त्याला दंडही होतो आणि तुरुंगाची हवाही खावी लागू शकते. त्यामुळे चेक बाउंस च्या मॅटर मधे आपल्या बाजूने काहीतरी निकाल लागतो हे नक्की.
९. जर चेक नसेल तर तुम्ही संबंधित कंपनीविरुद्ध, किंवा व्यक्तीविरुद्ध स्थानिक न्यायालयात (तुमच्या लोकेशनच्या न्यायालयात) वसुलीसाठी दिवाणी दावा दाखल करू शकता. या दाव्यात थकलेल्या पैशांसाठी मागणी करता येते. अशावेळी संबंधीत व्यक्तीच्या प्रॉपर्टी सील करण्यासाठी सुद्धा न्यायालय आदेश देऊ शकते. तसेच दर तारखेला खर्च, मनस्ताप या गोष्टी मागे लागतातच. दिवाणी दावा बरीच वर्षे चालू शकतो. मोठे पेमेंट असेल तर वरच्या कोर्टापर्यंत सुद्धा प्रकरण जाऊ शकते. बऱ्याचदा हे आपल्यालाच त्रासदायक ठरते. लढण्याची आर्थिक ताकद नसेल तर बहुतेक व्यावसायिकांना इथे आपले पेमेंट सोडून द्यावे लागते.
दिवाणी दावा पीडितासाठीच त्रासदायक असतो. पण फौजदारी दाव्यात मात्र तुम्हाला त्रास देणाऱ्याला त्रास होत असतो.
१०. पैसे तर गेलेच आहेत, पण समोरच्याला नीटच करायचं असा विचार असेल तर तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनमधे संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी तक्रार करू शकता. आर्थिक फसवणुकीची तक्रार होऊ शकते. रक्कम मोठी असेल तर जास्त परिणामकारक.
फौजदारी तक्रारीमधे पैशाची मागणी करता येत नाही, पण त्या व्यक्तीला जमीन घेणे, त्यासाठी खर्च करणे, प्रत्येक तारखेला न्यायालयात हजार राहणे, प्रत्येक तारखेला वकिलाला हजारोंनी फी देणे असला त्रास आणि खर्च लगेच सुरु होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे मनस्ताप खूप होतो.
फौजदारी तक्रार सुद्धा लांबणारीच असते, पण त्याचा त्रास त्याला चांगलाच होत असतो. आपल्याकडे पुरावे असतात, बिलं असतात, त्याची पर्चेस ऑर्डर असते, पाठपुरवठ्याचे पुरावे असतात, अशावेळी न्यायालये आरोपीला सहजासहजी सोडत नाहीत.
या टप्प्यावर पुढे होणारा त्रास पाहता तो तडजोडीसाठी चर्चेला बसायची तयारी दाखवतो. चेक बाउंस प्रकरणात जस म्हटलं तसंच इथेही प्रकरण लांबण्यापेक्षा जर तडजोडीने मिटत असेल तर त्यालाच प्राधान्य देणे योग्य.
११. या कायदेशीर गोष्टी टाळायच्या असतील तर थोडे सामाजिक, राजकीय वजन वापरून पाहू शकता. त्याच्या संबंधातील कुणी व्यक्ती आपल्या ओळखीचा असेल तर त्याच्या माध्यमातून प्रयत्न करता येतील, किंवा राजकीय वजन वापरून त्याला आपले पेमेंट करण्यासाठी प्रवृत्त करता येऊ शकते. पण राजकीय वजन ओळखीच्यांचेच वापरावे. इतर राजकीय लोकांना प्रकरणात सहभागी करून घेतले तर आपले पेमेंट बाजूलाच राहते आणि बाकीचीच लफडी सोडवत बसावी लागतात.
१२. वसुलीसाठी माणसे पाठवणे, दमदाटी करणे, हिंसक कृती करणे अशा कृती कधीही करू नका. मागच्या वर्षी माझ्या ओळखीचा एक व्यावसायिक अशा बेकायदेशीर प्रकारांत अडकला होता, हाफ मर्डर, विनयभंग अशा बऱ्याच प्रकरणात सहा महिने तुरुंगात होता. व्यवसाय पूर्णपणे संपला, आणि बाकीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे बेकायदेशीर कृत्ये करू नका. त्याने तुम्हालाच त्रास होईल. पैसे तसेही गेलेत असेही जाणारच आहेत, उलट बाकीची लफडी मागे लागतील आणि कामधंदे सोडून त्यांनाच सोडवत बसावे लागेल.
अडकलेले पेमेंट सोडवण्याचे हे काही मार्ग आपल्याकडे आहेत. तुमचा कस्टमर सध्या कोणत्या टप्प्यावर आहे याचा अंदाज घ्या आणि पुढे काय कृती करायची ते ठरवा.
इंडस्ट्रिअल सेक्टरमधील तसेच मोठ्या व्यवसायांतील उधारी आणि इतर लघुद्योग आणि लहान व्यवसायातील उधारी यात फरक असतो. हा लेख मुख्यत्वे इंडस्ट्रिअल सेक्टरमधील उधारीसंबंधी आहे, परंतु इतर क्षेत्रातील व्यावसायिकांना सुद्धा यातील माहितीचा उपयोग होईल. उधारीविषयी मी “व्यवसायात उधारीचे नियोजन कसे करावे” या लेखात व्यवसायातील उधारी विषयी बरीच सविस्तर माहिती दिली आहे. उधारीचे नियमावलीचा आहे. ती वाचून घ्यावी.
धन्यवाद
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील