लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
नवीन व्यवसाय सुरु करतेवेळी बऱ्याच जणांना त्यांचे नातेवाईक, मित्र, ओळखीचे लोक हेच त्यांचे ग्राहक वाटत असतात. त्यांच्या दृष्टीने यांना आपलं ग्राहक बनवलं तरी खूप झालं. मग व्यवसाय सुरु झाला कि या जवळच्या लोकांवर आपले प्रोडक्ट, सेवा घेण्यासाठी दबाव टाकला जातो. तुम्हाला वाईट वाटायला नको म्हणून त्यापैकी बरेच जण तुमचे ग्राहक होतातही. पण तेवढ्यापुरतेच. ते मनाने तुमच्यापासून लांब जातात. तुम्ही ओळखीचा, नात्याचा दबाव टाकून त्यांना खर्च करायला लावलाय याची बोच त्यांच्या मनात कायम राहते. काही जण तर तुम्ही दिसलात कि दुसरीकडे तोंड वळवायला लागतात. एक वेळ असं समजूयात कि हे सगळे जवळच लोक आपले ग्राहक झाले… पुढे काय ? दहा वीस जवळचे असणारे लोक संपले, आता पुढचा ग्राहक कुठून मिळवायचा? ओळखीचे लोक संपले आता अनोळखी लोकांना ग्राहक कसं बनवायचं?
आत्तापर्यंत एकदम छान वाटणारा व्यवसाय आता अचानक ठप्प झाल्यासारखा होतो. तुमचे जवळचे लोक वाईट वाटायला नको म्हणून खरेदी करतात, पण त्यापुढे जाऊन इतरांना तुमचा रेफरन्स देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. म्हणजेच माऊथ पब्लिसिटी होत नाही. साहजिकच नवीन ग्राहक मिळविण्यात अडचणी निर्माण व्हायला लागतात. व्यवसाय सुरु केल्यानंतर एकदम वर गेलेला विक्रीचा ग्राफ एकदम खाली येतो. ग्राहक मिळविण्याच्या या सोप्या पद्धतीमुळे ग्राहक नक्की कसा जोडला जातो या प्रोसेसचा आपल्याला अनुभवच मिळत नाही. त्यामुळे पुढे ग्राहक कसे मिळवायचे हेच सुधरत नाही.
आपले जवळचे लोक आपले ग्राहक नाहीत हे आधी लक्षात घ्या. ते स्वतःहून तुमच्याकडे येत असतील तर उत्तम पण त्यांना बळजबरी ग्राहक बनवून आपल्यापासून लांब नेऊ नका. त्यांच्याशी व्यावसायिक संबंध निर्माण करण्यापेक्षा प्रेमाचेच संबंध राहू द्या. हा जवळचा मित्र, नातेवाईक परिवार आपला ग्राहक नसतो तर चांगला प्रचारक असतो. जवळच्या दहा लोकांना बळजबरी ग्राहक बनवण्यापेक्षा तुमचा व्यवसाय त्यांच्या दहा ओळखीच्या लोकांपर्यंत पोचवायला सांगा, ते काम ते आवडीने करतील, आणि कायमस्वरूपी करतील.
व्यवसायात सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे अनोळखी लोकांपर्यंत पोचणे. आपले ओळखीचे लोक असे असून असून किती असतात ? १०-२०५-१०० यापेक्षा जास्त नाही. एवढ्यांवर व्यवसाय होत नसतो. तुम्ही आजपर्यंत ज्याला कधी भेटलेलाही नाहीत अशा हजारो लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचणे महत्वाचे असते. त्यांना तुमचे प्रोडक्ट सांगणे, ते घेण्यासाठी तयार करणे हे तुमचे महत्वाचे काम असते. हे काम सोपं खरंच नाहीये. तुम्हाला शिकावं लागतं. सतत वेगवेगळ्या लोकांशी बोलून तुम्हाला तुमचे संभाषण कौशल्य डेव्हलप करावे लागते. काहीही झालं हा अनोळखी वर्गच तुमचा खरा ग्राहक असतो.
व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला अनोळखी लोकांपर्यत पोहोचावेत लागते. तुमच्या जवळच्या लोकांना तुमचे हक्काचे ग्राहक समजू नका, त्यांना हक्काचे प्रचारक समजा. तुमच्या व्यवसायाची माहिती त्यांच्या संपर्कात पोचवण्याची हक्काने मागणी करा. हे काम ते आवडीने करतील…
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Beauty and Body Spa industry sathi kahe mahate asel ter mahete sanga.
१no
माहिती दिली आहे